Homeब्लॅक अँड व्हाईटमॅटमुळे रया गेली...

मॅटमुळे रया गेली कबड्डीची! कांदळगावकरांची खंत!!

महाराष्ट राज्य कबड्डी असोसिएशनने नुकताच सन‌ २०२५-२६चा श्रमजीवी स्व. रमेश देवाडीकर कबड्डी कार्यकर्ता हा मानाचा पुरस्कार ६७ वर्षीय दीपक कांदळगावकर यांना देऊन कबड्डी खेळातील एका सच्च्या सेवकाचा उचित गौरव केला आहे. जवळजवळ ‌५ दशके दीपक सरांनी या खेळाची निस्पृहपणे सेवा केली. खेळाडू, पंच, प्रशिक्षक, संघटक, कार्यकर्ता, स्पर्धा आयोजक, निवड समिती सदस्य, पंच समिती सदस्य ते अगदी मैदान तयार करण्यापर्यंत, अशा या खेळातील विविध जबाबदाऱ्या त्यांनी उत्तमप्रकारे सांभाळल्या. त्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना त्यांनी आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवून या खेळातील जाणकार मंडळीची दाद मिळवली. त्यामुळे या खेळातील एक अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणून सरांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.

त्यांचे बालपण गेले मुंबईतल्या घाटकोपर पूर्व येथे स्टेशनजवळ असलेल्या पंत नगरात. तेथे या खेळाला पोषक‌‌ असे वातावरण होतेच. पण त्यांच्या घरीदेखील‌ कबड्डी खेळाचा मोठा माहोल होता. त्यांचे काका राम ‌कांदळगावकर चांगले खेळाडू तर दीपक सरांचे मोठे बंधु अरविंद (भाई) उत्तम कबड्डी खेळायचे. त्यांनीच पुढाकार घेऊन २६ जानेवारी १९६८मध्ये घाटकोपर पूर्व येथे सन्मित्र कबड्डी संघाची स्थापना केली. याच संघातून तेव्हा चौघे कांदळगावकर बंधु खेळत‌ असत. काही वर्षांत सन्मित्र कबड्डी संघाने आपला चांगला दबदबा निर्माण केला. पुढे याच संघातुन काशिनाथ घाडी, शरद कांदळगावकर, तुकाराम सुर्वे, नागेश भावे, प्रकाश चव्हाण, शिवराम उत्तेकर, दिपेश‌ चिकणे, महादेव दळवी, अक्षय वर्णेकर, अंकुश आमटे, सोहम पुंदे, ग्रेटा डिसुझा, वैशाली महाडिक, सुजाता चव्हाण, भारती मोहिते, अस्मिता विरमुळे, पुनम झारुंजे, मयुरी मोहिते, निकिता उत्तेकर, सुविद्या विश्वासराव हे काही नावाजलेले खेळाडू प्रकाशात आले. दीपक यांच्या कबड्डी खेळाला खरी कलाटणी मिळाली तेव्हा, जेव्हा ते वडाळा येथील मुंबई शारीरिक शिक्षण मंडळात दाखल झाले. तेथे मंडळाचा महिला कबड्डी संघ तयार करण्याची आणि आंतरशालेय हिंद करंडक सामन्यांच्या आयोजनाची मोठी जबाबदारी त्यांचावर टाकण्यात आली. ते शिवधनुष्य त्यांनी यशस्वीपणे पेलले आणि त्यांच्यातील कबड्डीला मोठीच चालना मिळाली.

तब्बल १६ वर्षं मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचा महिला कबड्डी संघ सरांनी चालवला. मग सरांनी मागे वळून बघितलं नाही. मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ आणि सन्मित्र कबड्डी संघातून सर बरीच वर्षे खेळलेदेखील. या खेळातील नवनवी आव्हाने त्यांनी स्वीकारली. त्या सर्वच गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करुन, नवनव्या गोष्टींचा स्वीकार करून ते ‌अंमलात आणण्याचा शंभर टक्के प्रयत्न त्यांनी केला म्हणूनच ते या खेळात ठामपणे टिकून राहिले. मधील काही काळ सन्मित्र संघ बंद पडला होता. तो‌ १९९३पासुन‌ सरांनी परत सुरु केला. आज त्यांचा पुरुष संघ गेली कित्येक वर्षे मुंबई उपनगरात आपले “अ” गटातील स्थान टिकवून आहे. महिला संघानेदेखील आपला एक बलाढ्य संघ म्हणून लौकिक कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे मुंबईत मैदानाची‌ चांगलीच वानवा असताना सरांनी मात्र‌ संघाचे मैदान जीवापाड मेहनत करुन‌ टिकवून ठेवले आहे. मैदानाच्या आजुबाजूला टॉवर झाले आहेत. पण बिल्डर लॉबी मैदानापासून लांब आहे. पावसाळा वगळता येथे कायम कबड्डीचाच दम घुमताना तुम्हाला दिसेल. इतर काही संघाचा सराव याच मैदानात चालतो. नवरात्रात मात्र‌ देवीचा उत्सव जोरात असतो.

शिस्त आणि वेळ या दोन गोष्टीवर सरांचा मोठा कटाक्ष असतो. मैदानात सर्वात पहिले येणारे सर असतात. शेवटी जाणारेदेखील तेच असतात. वादविवादापासून‌ सर नेहमीच चार हात लांब ‌ राहिले आहेत. त्यामुळे कितीही काही झाले तरी पंचांचा निर्णय स्वीकारायचा आणि आपला सर्वोतम खेळ करुन सामने जिंकायचे हा मोलाचा मूलमंत्र सरांनी आपल्या खेळाडूंना दिलाय. सरांनी खेळाडूला त्याचा आहे तोच खेळ कायम ठेवून त्यामध्येच जास्तीतजास्त सुधारणा करुन अधिकाधिक सफाईदारपणा आणण्याचा नेहमी प्रयत्न केला. खेळाडूला पूर्ण मोकळीक ते देतात. त्यामुळे सरांचे खेळाडूंशी नाते कौटुंबिक होऊन गेले आहे. भवन्स कॉलेज, विद्यानिकेतन कॉलेज, एस.एन.डी.टी. कॉलेज, विद्याभवन मराठी विद्यालय, विद्याभवन हायस्कूल, घाटकोपर पूर्व, ज्ञानेश्वर विद्यालय, वडाळा, या संघांचे मुख्य प्रशिक्षक म्हणून दीपक कांदळगावकर यांनी काम पाहिले. २०१२ साली राष्ट्रीय मुलांच्या अंधांच्या कबड्डी स्पर्धेत सरांकडे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी दिली होती. नवी दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. विविध ठिकाणी कबड्डी शिबिराचे यशस्वी आयोजन सरांनी करुन दाखवले. १९९०पासून‌ आतापर्यत वडाळा येथील मुंबई शारीरिक शिक्षण मंडळात ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

१९९५ ते २००५दरम्यान मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारिणीत ते सदस्य होते. महाराष्ट्र शासनाने २००१ ते २००६पर्यंत विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची निवड केली होती. श्री साई स्पोर्ट्स क्लब, घाटकोपर हा त्यांचाच संघ किशोरी गटात मुंबई उपनगर जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत सलग तीन वर्ष विजेता होता. या संघातील पाच मुलींची कुमारी राज्य स्पर्धेसाठी निवड झाली होती. तसेच किशोरी संघात आठ तर महिला संघात तिघींची निवड झाली आहे. आतापर्यंत सन्मित्र संघाने बऱ्याच स्पर्धांत जेतेपदाचा मान मिळवला. त्यामध्ये शिवक्रांती क्रीडा मंडळ, संतोष क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धा, नगरसेवक, आमदार चषक या काही स्पर्धांचा समावेश आहे. आतापर्यंत ६०पेक्षा जास्त जणांना त्यांनी पंच होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन, सहकार्य केले जे पुढे चांगले पंच म्हणून तयार झाले. त्यांनी मार्गदर्शन केलेल्या स्मिता शिगवण, डॉ. माया गोकर्ण पुढे राष्ट्रीय पंच झाल्या. एमकेएल लिगमध्ये मैदान आणि खेळाडू शिबिराची जबाबदारी कांदळगावकर यांनी यशस्वीपणे संभाळली. राज्य कबड्डी संघटनेच्या अगोदर कांदळगावकर यांना ह्युमन वेल्फेअर सोशल ऑर्गनायझेशन, जोगेश्वरी, मासिक अनोखा विश्वासचा श्री शिवाजी महाराज पुरस्कार, स्वरमयी क्रीडा पुरस्कार, आयडियल स्पोर्ट्स अकादमीने पुरस्कार देऊन गौरवले.

कांदळगावकर यांच्या आजवरच्या या यशात मुंबईचे माजी महापौर बाबुराव शेट्ये, आबा नाईक, रामभाऊ कांदळगावकर, भगवान घाग, सो. श. प्रभु, किसनराव सकपाळ, चंद्रकांत दळवी, प्रभाकर अमृते, डॉ. शंकर चव्हाण, सुरेश सावंत, मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय शेट्ये, अनिल धुरी, कृष्णा शिगवण, बंडु कांबळे, जया शेट्टी, मीनानाथ धानजी‌‌, गणपत लाड, भरत संधाने‌, राजन प्रधान, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त लीलाधर चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. तेव्हाच्या आणि आताच्या कबड्डी खेळात खूप बदल झाला आहे. या खेळातील जुनी नजाकत, जादू संपली असून आता हा खेळ निव्वळ‌ ताकदीचा राहिला आहे. मॅटने या खेळाचे सारे तंत्रच बदलल्याची खंत कांदळगावकर व्यक्त करतात. कबड्डी हा सरांचा जणूकाही श्वास‌ आहे. जोपर्यंत शरीर साथ देईल तोपर्यंत कबड्डीची सेवा ते तशीच सुरुच ठेवणार आहे. त्यासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा!

(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

यंदाच्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेतही भारताची मदार सिंधुवरच!

येत्या १७ ऑगस्टपासून नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरु होत असलेल्या ३०व्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत यजमान भारताची मोठी मदार पदकाच्यादृष्टीने माजी जग्गजेती पी. व्ही. सिंधु, माजी कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन आणि पुरुष दुहेरीत माजी कांस्यपदक विजेती जोडी...

क्रिकेट, कुस्तीसारखे खेळ वगळल्यानंतरही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची बाजी!

ग्लासगो येथे संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरी‌च्या जोरावर भारताने पदकतालिकेत ऑस्टेलिया, इंग्लंड, कॅनडापाठोपाठ चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. भारताने या स्पर्धेत १३ सुवर्ण, १७ रौप्य,९ कांस्य, अशी एकूण ३९ पदकांची कमाई केली. १३पैकी ८...

एक-एक बोट छाटून काढणाऱ्या सर गॅरी सोबर्सना सलाम!

वेस्टइंडीज क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सर गारफिल्ड सोबर्स यांच्या निधनामुळे क्रिकेटविश्वाने २०व्या शतकातील एक सर्वोतम अष्टपैलू खेळाडू गमवला आहे. एक आर्कषक, शैलीदार फलंदाज, प्रभावी गोलंदाज आणि चपळ, दक्ष क्षेत्ररक्षक या खेळाच्या तीनही प्रमुख अंगात सोबर्स यांनी स्वतःचा एक वेगळा...
Skip to content