राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत, ‘इंडियाज इंटरनॅशनल मुव्हमेंट टू युनायटेड नेशन्स’ या कार्यक्रमात जेन झी व जेन अल्फा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नव्या पिढीतील युवकांना संबोधित केले. नीता आंबानी इंटरनॅशनल कल्चरल सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ही देशातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था आहे. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री तसेच केंद्र सरकारमधील भाजपाचे बहुतेक मंत्री व देशातील विविध राज्यांतील मुख्यमंत्री व असंख्य मंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून घडले आहेत. संघाचे स्वयंसेवकच देशाचा व देशातील बावीस राज्यांचा कारभार चालवत आहेत. सरकारमध्ये सर्वोच्च पदावर संघस्वयंसेवक असताना व भाजपा सत्तेवर असताना जेन झीच्या आंदोलकांवर पोलिसांनी निर्घृण लाठीमार केला. खिळे ठोकलेल्या लाठ्यांनी विद्यार्थ्यांवर प्रहार केला. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात शेकडो जणांची तोंडे रक्तबंबाळ झाली. हातपाय फ्रॅक्चर झाले. मुलांवर अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या. दिल्लीत पॅलेट गन्समधून तर पाटण्यात एके-४७मधून पोलिसांनी जेन झीवर गोळीबार केला. मुलींना पोलसांनी वाईट वागणूक दिली. त्यांचे कपडे फाडले. त्यांच्या मागून काठ्या घुसविण्याचे प्रकार घडले. विद्यार्थी आंदोलकांवर पाण्याचे फवारे मारले.
दिल्ली, पाटणा व मुंबईत आंदोलन करणाऱ्या जेन झी मुलामुलींवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. रात्री-अपरात्री घराचे दरवाजे ठोठावून मुलांना खेचून पोलीसठाण्यावर नेले. दिल्ली, पाटणा किंवा मुंबई तिन्ही ठिकाणी भाजपाची सत्ता आहे. दिल्लीचे पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. महाराष्ट्र, बिहारमध्ये मुख्यमंत्री भाजपाचे आहेत. पोलिसांनी जेन झीवर बळाचा वापर करून त्यांना झोडून काढले. त्यांचे भविष्य पोलीस डायरीत बंद करण्याचा प्रयत्न केला. याला कोण जबाबदार आहे? तेव्हा जेन झी अँटीनॅशनल नाही, असे कोणीही म्हणाले नाही? जेन झीचे आंदोलन चालू असतानाच सरसंघचालकांनी सत्तेवर बसलेल्या आपल्या स्वयंसेवकांना नीट समजावून सांगितले असते तर मुलांवर बंदुका रोखल्या गेल्या नसत्या. तेव्हाच सरसंघचालकांनी सत्ताधारी स्वयंसेवकांना पोलिसांना बळाचा वापर करायला सांगू नका, असे म्हटले असते तर पोलिसांनी काठ्या उचलल्या नसत्या. जेन झीवर पोलिसांनी केलेली कारवाई योग्य होती का, या प्रश्नावर सरसंघचालकांनी मौन पाळले. जंतरमंतरवर नेमके काय घडले हे त्यांना ठाऊक नसावे. पोलिसांच्या कारवाईत शेकडो मुलांना जखमा झाल्या. मुंबई, दिल्ली, पाटण्यातील शेकडो मुलांवर गुन्हे दाखल झाले. जेन झी आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाला द्यावे लागले. त्यानंतर सरकारचे डोळे उघडले. नोंदवलेले एफआयआर काही एका रात्रीत रद्द करता येत नाहीत, त्यासाठी प्रक्रिया आहे. तोपर्यंत जेन झी आंदोलकांवर पोलीस कारवाईची टांगती तलवार कायम आहे.

जेन झीच्या प्रखर आंदोलनाने केंद्रातील शिक्षणमंत्र्यांना राजीनामा देणे भाग पडले. आंदोलकांनी जिद्द, चिकाटी व हिम्मत दाखवली म्हणून सरकारला जेन झीपुढे झुकावे लागले. जगाने भारतातील जेन झी आंदोलनाची दखल घेतली. त्यानंतर सरसंघचालकांनी मुंबईत जेन झी व जेन अल्फाशी संवाद साधताना आंदोलकांच्या जखमांवर फुंकर मारण्याचा प्रयत्न केला. उशिरा का होईना, सरसंघचालकांनी जेन झी अँटीनशनल (राष्ट्रविरोधी) नाही हे ठामपणे सांगितले. हीसुद्धा सरकारला मोठी चपराक आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेन झीबद्दल मांडलेल्या भूमिकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अभिजीत म्हणतात- सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेन झी अँटीनॅशनल नाही, असे स्पष्ट सांगितले आहे. मोहन भागवत हे भाजपाचे मार्गदर्शक आहेत. नरेंद्र मोदींचे गॉडफादर आहेत. त्यांनी त्यांना स्पष्ट सांगावे की, जे युवक आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांना अँटीनॅशनल समजू नये. भाजपाशी संबंधित असलेले लोकच जेन झीला अँटीनॅशनल म्हणत होते. माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तर जेन झीला दहशतवाद्यांची बी टीम, असे संबोधले होते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी जेन झीला वायरस म्हटले होते. यापुढे तरी भाजपाला सरसंघचालकांची भूमिका ऐकावी लागेल. सत्तेवर बसलेले भाजपाचे लोक सरसंघचालकांचे म्हणणे ऐकणार नसतील तर संघाला गंभीरपणे विचार करावा लागेल….
भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी जेन झीला अराजक निर्माण करायचे आहे, असा आरोप केला होता. जेन झीला भारताचा नेपाळ करायचा आहे, असेही आरोप केले गेले. जेन झीला पाकिस्तान, अमेरिका आणि चीनमधून मदत मिळते, असेही काहींनी तारे तोडले. जेन झीला बदनाम करण्याचा व जेन झीमध्ये फूट पाडण्याचा भरपूर प्रयत्न केला गेला. तेव्हा सत्ताधारी पक्ष किंवा त्यांच्या मातृसंस्थेतील कोणीही जेन झीला समजून घेण्यासाठी पुढे आले नव्हते. मोहन भागवत यांनी मुंबईत जेन झीशी संवाद साधताना म्हटले आहे की, जनरेशन झेडमधील आंदोलक देशविरोधी नाहीत, तसेच लोकशाहीमध्ये आंदोलन हे एकमत घडवून आणण्याचे साधन असते. विविध मतं समोर येतात व चर्चेनंतर एकमत साधलं जातं. चर्चा संवादानेच होऊ शकते. एखाद्याची मते ऐकूनच घेतली गेली नाहीत, तर आंदोलन सुरू होऊ शकते. मात्र समाजात फूट पाडणे हा उद्देश नसून एकमत घडवून आणणं हा उद्देश असला पाहिजे. जेन झीचा विचार करता, अलिकडच्या घटनांबाबत त्यांच्या तक्रारी रास्त आहेत. भारताच्या शिक्षण व्यवस्थेत खूप काही करणे आवश्यक आहे. ते केलं जात नाही म्हणून हे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यासाठीच संवाद आवश्यक आहे. जेन झी आपलेच आहेत. पुढच्या पिढीला आपलेपणाची भावना वाटेल असे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. जेन झी व जेन अल्फा यांची मानसिकता आधीच्या पिढीपेक्षा वेगळी आहे.आम्ही त्यांच्या वयाचे होतो, तेव्हा मोठ्यांचे म्हणणं आम्ही ऐकायचो. आताची पिढी प्रश्न विचारते व तार्किक उत्तर शोधण्याचा प्रयत्न करते. जेन झी केवळ निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन करीत नाही तर विशिष्ट मुद्द्यांवर ते आपली मते मांडत आहेत. त्या मुद्यांची दखल घेणे आवश्यक आहे.

येत्या पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी तरूण पिढीला डोळ्यासमोर राहून संबोधित करावे, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केंद्र सरकार कोणती पावले उचलत आहे, याची स्पष्ट माहिती द्यावी असे आवाहन अभिजीत दीपके यांनी केले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील निवासस्थानी अभिजीत यांना कोण भेटायला येते यावर पोलिसांची बारीक नजर आहे. संजय शिरसाट यांच्या भेटीनंतर शिवसेना कॉक्रोच जनता पार्टीशी जवळीक साधते, म्हणून भाजपा नाराज असल्याच्या बातम्यांना उधाण आले. त्यावर बोलताना अभिजीत म्हणाले- एका तीस वर्षांच्या मुलापासून तुम्हाला एवढी भीती का वाटते? संजय शिरसाट हे मला वैयक्तिक पातळीवर भेटायाला आले होते. मी भाजपाला एवढेच सांगू इच्छितो, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. पोलीस, इडी, सीबीआय सर्व काही तुमच्याकडे आहे. आमच्याकडे काहीच नाही. लोक वैयक्तिकरित्या भेटायला येतात व चांगल्या कामासाठी शुभेच्छाही देतात…
(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत.)

