ग्लासगो येथे संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारताने पदकतालिकेत ऑस्टेलिया, इंग्लंड, कॅनडापाठोपाठ चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. भारताने या स्पर्धेत १३ सुवर्ण, १७ रौप्य,९ कांस्य, अशी एकूण ३९ पदकांची कमाई केली. १३पैकी ८ सुवर्णपदकं भारतीय महिला खेळाडूंनी मिळवली आहेत. तसेच आणखी ४ रौप्य, ४ कांस्यपदकाची कमाईदेखील भारतीय महिलांनी केली. त्यामुळेच गेल्या स्पर्धेप्रमाणेच यावेळीदेखील चौथा क्रमांक कायम ठेवण्यात भारताला यश आले. गेल्या स्पर्धेत भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्यपदके मिळवली होती. तेव्हा भारतीय चमू २१० खेळाडूंचा होता. यंदा मात्र भारतीय संघात अवघे १२६ खेळाडू होते. यंदा या स्पर्धेत नेमबाजी, तिरंदाजी, कुस्ती, बॅडमिंटन, क्रिकेट, स्क्वॅश, टायथलॉन हे खेळ वगळण्यात आले. त्या खेळात भारताने भरघोस पदकांची कमाई केली होती. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघाची बरीच पदके कमी होतील आणि पदकतालिकेतदेखील भारतीय संघाची मोठी घसरण होईल, अशी शक्यता काही जाणकार व्यक्त करीत होते. परंतु भारतीय महिलांनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यामुळे भारतीय संघाने आपले पदकतालिकेतील चौथे स्थान कायम ठेवण्यात यश मिळवले.

भारतीय मुष्टियोद्ध्यांनी यंदाची स्पर्धा आपल्या जोरदार पंचेसनी गाजवली. भारताने मुष्टियोद्ध्यात ७ सुवर्ण, ३ कांस्यपदके मिळवून नवा इतिहास रचला. या स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात एकाच खेळात एव्हढी १० पदकांची कमाई कुठल्याच एका देशाने केली नव्हती. यापूर्वी इंग्लंड, कॅनडाने सर्वाधिक ६-६ पदके एकाच खेळात मिळवण्याचा पराक्रम केला होता. पण यंदा भारतीय बॉक्सिंग चमुने त्या दोन्ही देशांना मागे टाकले. महिला गटात प्रीती पवारने भारताच्या सुवर्णपदकाचे खाते उघडले. त्यानंतर साक्षी चौधरी, जस्मिना लम्बोरिया, प्रिया घांघसने सुवर्ण पंच लगावला. पुरुष गटात सचिन सिवास, अंकुश पंघालनेदेखील अंतिम लढती जिंकल्या. ऑलिंपिक कांस्यपदकविजेत्या लवलिना बोरगोला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. जादुमणी सिंग, नरेंदर बेरवालचेदेखील सुवर्णपदक हुकले. वेटलिफ्टिंगमधील भारतीय क्विन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मीराबाई चानूने या स्पर्धेतील सुवर्णपदकाची शानदार हॅटट्रिक पूर्ण केली. ज्युदोमध्ये अस्मिता डे आणि हर्ष सिंहने भारतासाठी पहिल्यांदा सुवर्णपदक जिंकुन नवा इतिहास रचला. लष्करात असलेल्या गुलवीर सिंहने पुरुष गटात १० हजार मीटरमध्ये रौप्य आणि ५ हजार मीटरमध्ये कांस्यपदक मिळवून दोन पदके जिंकण्याचा पराक्रम केला. आफिका देशाच्या धावपटूंना मागे टाकून गुलवीर सिंहने मिळवलेले यश निश्चित कौतुकास्पद आहे.

बॉक्सिंगमध्येदेखील युरोपमधील काही बड्या खेळाडूंना नमवून मिळवलेल्या पदकाला तोड नाही. अर्जेटिनाचे सॅटिगो निव्हा संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांची दुसरी टर्म आहे. याअगोदर २०१७ ते २०२१दरम्यान भारतीय बॉक्सिंग संघाचे ते हाय परफॉर्मन्स संचालक होते. भारतीय संघाच्या यशात त्यांचेदेखील मोठे योगदान होते. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेतदेखील भारतीय मुष्टियोद्धे चागली कामगिरी करतील असा विश्वास निव्हा यांनी व्यक्त केला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काही बड्या बाॉक्सर्सना भारतीय खेळाडूंनी नमवले, ही भारतीय खेळाडूंची मोठी कामगिरी असल्याचे निव्हा यांनी स्पष्ट केले. तेजस्विनी शंकरने या स्पर्धेत भारताला डेकथलॉनमध्ये पहिले कांस्यपदक मिळवून दिले. ऑलिंपिक स्पर्धेत भालाफेकमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राला इथे मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पॅरा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ३ सुवर्णपदके मिळवली. शर्मिला धनखडने गोळाफेकमध्ये, दिलीप गावीतने १०० मीटरमध्ये आणि सोहन राणाने गोळाफेकमध्ये अव्वल क्रमांक मिळवला. लांब उडीत श्री शंकरने सलग दुसऱ्या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. आतापर्यंत झालेल्या स्पर्धांचा विचार केला तर भारताने या स्पर्धेत २०३ सुवर्ण, १९० रौप्य आणि १०१ कांस्य, अशी एकूण ५६४ पदकांची कमाई करुन पदकतालिकेत चौथा क्रमांक मिळवला आहे. २०१०मध्ये भारत यजमान असताना भारताने आपली सर्वोतम कामगिरी नोंदवली होती. नवी दिल्लीत झालेल्या या स्पर्धेत भारतीय चमूने ३८ सुवर्ण, २७ रौप्य, ३६ कांस्य, अशी एकूण १०१ पदकांची कमाई केली होती. आता पुढील स्पर्धा २०३०मध्ये अहमदाबाद येथे होणार आहे. यजमान भारत यात आपली सर्वोतम कामगिरी करेल, अशी आशा करुया. आता सप्टेंबरमध्ये जपानमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिळवलेल्या यशाचा फायदा भारतीय संघ कसा घेतो, तेदेखील बघणे महत्त्वाचे ठरेल.

(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

