गेले सव्वा महिना सुरु असलेला फुटबॉलचा विश्वचषकाचा महाकुंभ आता संपला आहे. फुटबॉलविश्वाला आता स्पेनच्या रुपाने पुन्हा फुटबॉलसम्राट मिळाले. २०१० साली आपल्या पहिल्याच प्रयत्नात ही स्पर्धा जिंकणाऱ्या स्पेनने तब्बल १६ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत विजेत्या संघाला साजेसा खेळ त्यांनी सुरूवातीपासून शेवटपर्यंत केला. त्यामुळे स्पेनचाच संघ या जेतेपदाचा खरा दावेदार होता, असे म्हटले तर वावगे ठरू नये. स्पर्धेच्या सुरूवातीला स्पेन संघ विजेतेपदाच्या शर्यतीत फारसा नव्हता. पण त्यांनी जेतेपदला गवसणी घालून या खेळातील सर्वच जाणकारांचे अंदाज फोल ठरवले. अंतिम सामन्यातदेखील गतविजेत्या अर्जेटिनालाच बऱ्याच जणांनी विजयाची पहिली पसंती दिली होती. पण सांघिक खेळाचे सुरेख प्रात्यक्षिक दाखवत आणि बचाव, आक्रमण याचा सुंदर मिलाफ साधत स्पेनने मेस्सीच्या अर्जेटिनाचे सलग दुसऱ्या विजयाचे स्वप्न धुळीस मिळवले. भक्कम बचाव, संयम, योजनाबद्ध पासिंग आणि सांघिक कामगिरी हेच त्यांच्या जेतेपदाचे गमक आहे.
सामन्याच्या सुरूवातीपासून शेवटपर्यंत स्पेनने सामन्यावर पूर्ण नियत्रंण ठेवून अर्जेटिनाला विजयाची बिल्कुल संधी दिली नाही. स्टार खेळाडू मेस्सीला रोखण्यात स्पेनला यश आले, तिथेच त्यानी अर्धी लढाई जिंकली. सामन्यातील एकमेव विजयी शानदार गोल जादा वेळेत बदली आलेल्या फेरान टोरसने निको विल्यम्सनच्या सुरेख पासवर केला. अर्जेटिनाला अवघी दोन वेळा गोल करायची संधी मिळाली, तर स्पेनला त्या तुलनेत तब्बल २० वेळा ही संधी मिळाली. त्यावरुन स्पेनच्या या निर्णायक लढतीमधील वर्चस्वाची कल्पना येते. अर्जेटिनाचा गोलरक्षक मार्टिनेझने स्पेनची बरीच आक्रमण थोपवली. नाही तर ५-६ गोलांच्या फरकाने स्पेनने विजय मिळवला असता. संपूर्ण स्पर्धेत स्पेनविरुद्ध अवघा एक गोल झाला. या विजयाबरोबरच स्पेनने १९६६ साली या स्पर्धेत झालेल्या पराभवाचा बदला घेतला. गेल्या ३९ आंतरराष्ट्रीय सामन्यात स्पेन अपराजित आहे. २८ मार्च २०२३मध्ये स्पेन शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात स्कॉटलंडकडून पराभूत झाले होते. युरो आणि विश्वचषक स्पर्धा दोन वेळा जिकणारा स्पेन पहिला संघ ठरला. त्यांचा महिला संघदेखील जग्गजेता आहे. अशीदेखील कामगिरी करणारा स्पेन एकमेव संघ आहे. आणखी एक योगायोग म्हणजे स्पेनने २०१० साली पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकली होती तेव्हादेखील त्यांनी जादा वेळेतच विजय मिळवला होता. हॉलंडविरुद्ध झालेल्या तेव्हाच्या अंतिम लढतीत स्पेनच्या एंडेस इनिएसने जादा वेळेत सामन्यातील एकमेव विजयी गोल केला होता.

ब्राझिल, इटली, या दोन देशांचा अपवाद वगळता इतर कुठल्याच देशाला या स्पर्धेत विजेतेपद राखता आलेले नाही. विशेष म्हणजे मेस्सी, रोनाल्डो, एम्बापे, केन, नेमार यांच्यासारखे कोणी स्टार खेळाडू स्पेनच्या संघात नव्हते. तरीदेखील त्यांनी जेतेपदावर कब्जा केला ही गोष्ट निश्चितच कौतुकास्पद आहे. संघातील प्रत्येक खेळाडूने आपले शंभर टक्के योगदान दिले. प्रत्येकाला दिलेली जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पार पाडली. एखाद्या वाद्यवृदांचे उदाहरण स्पेन संघासाठी नक्कीच देता येईल. त्यांच्या विजयात मिकेल, रोड्रो, पेट्रो, कुकुरेया यांचा मोठा वाटा होता. मुख्य प्रशिक्षक लुईस फुएंते यांनी संघाला नवी दिशा दिली. खेळांडूंमध्ये नवा विश्वास निर्माण केला. तुम्ही जिंकू शकता हा मंत्र दिला. २०२२मध्ये त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. तेव्हा कतर येथे झालेल्या याच स्पर्धेत स्पेनला उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. मोरोक्कोकडून त्यांना पेनल्टी शुटआऊटमध्ये पराभव पत्करावा लागला होता. यंदाच्या स्पर्धेत सलामीच्या लढतीत स्पेनला कॉबो वर्दे, या नवख्या संघाला नमवता आले नाही. सामना गोलशून्य अवस्थेत बरोबरीत सुटला. पण त्यानंतर प्रत्येक सामन्यात स्पेनने आपला खेळ उंचावला आणि पाहतापाहता चक्क जेतेपदावर कब्जा केला.
स्पेनमध्ये फुटबॉल संस्कृती खूप मोठी आहे. त्यांच्या गेल्या विजयी संघात बलाढ्य बार्सिलोना क्लबचे ७ खेळाडू होते. यंदा तीच संख्या दहा होती. तेथे फुटबाल मार्गदर्शकांसाठीदेखील चांगल्या अकादमी आहेत. त्याच अकादमीतून यावेळचे संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले फुएंते तयार झाले. या स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात कुठल्याही विदेशी प्रशिक्षकाला आपल्या संघाला जेतेपद मिळवून देता आले नाही. तो आगळा विक्रम यंदाच्या स्पर्धेतदेखील कायम राहिला. अंतिम सामन्यात स्टार खेळाडू मेस्सीवर अर्जेटिना संघ जास्त अवलंबून राहिला. सुरूवातीपासून त्यांनी काहीसा बचावावर भर दिला. त्यातच दुसऱ्या सत्रात दुसरे पिवळे कार्ड मिळाल्यामुळे अर्जेटिनाच्या एंजो फर्नांडेझला मैदान सोडावे लागले. त्यामुळे दहा खेळाडूंसह खेळण्याची पाळी अर्जेटिना संघावर आली. या साऱ्याचा फटका अर्जेटिनाला बसला. मेस्सीच्या हातून विश्वचषक निसटला, तसेच गोल्डन बुटाचा पुरस्कारदेखील गेला. तो मान स्पर्धेत सर्वाधिक १० गोल करणाऱ्या फ्रान्सच्या एम्बापेला मिळाला. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत इंग्लंडने फ्रान्सचा पराभव केला.

उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात स्पेनने माजी विजेत्या फ्रान्सचा रंगतदार लढतीत २-० गोलांनी पराभव करुन तब्बल १६ वर्षांनंतर परत एकदा अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनाने इंग्लंडचा पिछाडीवर पडूनदेखील २-१ गोलांनी पराभव करत सलग दुसऱ्या वर्षी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यामुळे १९६६ साली ही स्पर्धा जिंकणाऱ्या इंग्लंडचे पुन्हा ही स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. या विजयाबरोबरच अर्जेटिनाने सातव्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठून ब्राझिलच्या विक्रमाची बरोबरी केली. आफ्रिका खंडातील ९ देश स्पर्धेसाठी पात्र ठरले होते. त्यातला आठ देशांनी बाद फेरीत प्रवेश करुन नव्या विक्रमाची नोंद केली. नाॅर्वेने बलाढय़ ब्राझिलचे पॅकअप केले, तर माजी विजेत्या जर्मनीला पेराग्वेने दुसऱ्याच टप्प्यात बाहेरचा रस्ता दाखवला. कुरासाव या जेमतेम आठ ते दहा लाख लोकवस्ती असलेल्या छोटय़ा देशाने बाद फेरीत प्रवेश करुन स्पर्धेत खळबळ माजवली, तर काबो बर्डेने पहिल्याच सामन्यात स्पेनला बरोबरीत रोखण्याचा पराक्रम केला. बलाढ्य हाॅलडंला मोरोक्कोने चकित करुन उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. या स्पर्धेत पहिल्यांदा जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या चार संघांनी उपांत्य फेरी गाठली. स्पर्धेतील विजेत्या संघातील एकूण तीस जणांना पहिल्यांदाच चषकाची आकृती असलेली अंगठी भेट देण्यात आली. अमेरिकेच्या एका खेळाडूला देण्यात आलेले रेड कार्ड मागे घेण्यासाठी थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या कार्यालयाकडून हस्तक्षेप झाल्याने हे प्रकरण चांगलेच गाजले. व्हिडीयो असिस्टंट रेफरी, व्ही. ए. आर. ए. ही नवी प्रणाली स्पर्धेत प्रथमच वापरण्यात आली. परंतु त्याचा फारसा फायदा झाला नाही. अनेक पंचांचे निर्णय वादग्रस्त ठरले. यावर टिकेची झोड उठली. या २३व्या स्पर्धेत अनेक नवनव्या विक्रमांची नोंद झाली. त्या सर्व विक्रमांची मोजणी करणे कठीण आहे. आता विश्वविजेत्या स्पेनची ही विजयी दौड आणखी किती दिवस कायम राहते ते बघायचे.
(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

