आगामी सप्टेंबर महिन्यात जपान येथे होणाऱ्या आशियाई टेबल टेनिस स्पर्धेसाठी अखिल भारतीय टेबल टेनिस महासंघाने दहा खेळाडूंच्या भारतीय संघाची नुकतीच घोषणा केली. या निवडलेल्या भारतीय संघातून भारताची बुजूर्ग स्टार महिला टेबलटेनिसपटू मनिका बत्राला अखिल भारतीय टेबल टेनिस महासंघाने वगळल्याने भारतीय टेबल टेनिस वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मनिकाला चक्क राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे. दोन दशकांपेक्षा जास्त काळ भारतीय टेबल टेनिसची सेवा करणाऱ्या मनिकाला राजकारणामुळे डावलले जात असेल तर भारतीय क्रीडाविश्वासाठी ही गोष्ट निश्चितच चांगली नाही. आपल्याला नक्की कोणत्या कारणामुळे संघातून डावलण्यात आले आहे, याचा खुलासा अखिल भारतीय टेबल टेनिस महासंघाने करावा, अशी मागणी मनिकाने केली आहे. याबाबत तिने थेट पंतप्रधान, केंद्रीय क्रीडा मंत्री, केंद्रीय क्रीडा मंत्रालय, भारतीय ऑलिंपिक संघटना यांच्याकडेदेखील दाद मागितली आहे. आपल्याला न्याय मिळाला नाही तर आपण न्यायलयातदेखील जाऊ, असेदेखील मनिकाने स्पष्ट केलेय.
जागतिक क्रमवारीत मनिका सध्या ५१व्या स्थानावर आहे. यंदाच्या मोसमात मनिकाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना बलाढ्य चिनी, कोरियन, जपानच्या खेळाडूंना नमवण्याचा पराक्रम केला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील जास्त सहभागामुळे देशात होणाऱ्या विविध स्पर्धांत मनिकाचा सहभाग कमी होता. त्यामुळे भारतीय क्रमवारीत तिची घसरण झाली. संघ निवडताना भारतीय क्रमवारीबरोबरच, जागतिक क्रमवारीत अव्वल ५० क्रमांकात असलेल्या खेळाडूंचा विचार केला गेला, असे निवड समितीचे म्हणणे आहे. संघनिवड करत असताना नक्की कुठला कालावधी धरण्यात आला हे मात्र गुलदस्त्यात आहे. जागतिक क्रमवारीत आठवडय़ात होणारे बदल, खेळाडूचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील व्यस्त वेळापत्रक, आंतरराष्ट्रीय प्रवास, व्हिसा, ताण या सर्वांचा विचार होणे गरजेचे आहे. संघनिवड केली तेव्हा मनिका विश्व क्रमवारीत ५१व्या स्थानावर होती. केवळ एका क्रमांकाने आठवडय़ात तिची घसरण झाली म्हणून थेट संघातून वगळणे हे नक्कीच त्या खेळाडूवर अन्यायकारक आहे.

विदेशी स्पर्धांतील जास्त सहभागामुळे भारतातील स्पर्धांत मनिकाला जास्त खेळता आले नाही. युवा, क्रीडा मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार खेळाडूची निवड करताना त्याचा करंट फाॅर्म विचारात घेणे अनिवार्य आहे. यंदाच्या वर्षी मनिकाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी करुन आपला फाॅर्म सिद्ध केलाय. आणखी मनिकाने काय करायला हवे, अशी निवड समितीची अपेक्षा आहे. भारतीय संघात श्रीजा अकुला, दिव्या चितळे, सुतीर्था मुखर्जी, सिंड्रेला दास, यशस्वीनी घोरपडे यांचा समावेश आहे. अखिल भारतीय टेबल टेनिस महासंघाने निवडीची अधिकृत कारणे, निकष, मिनिट्स, आपल्या संकेतस्थळावर टाकून निवडीमधील पारदर्शकता दाखवून द्यावी. एखादा खेळाडू आपले काही आयुष्य देशासाठी देतो तेव्हा त्याला का डावले गेले, हे जाणून घेण्याचा अधिकार त्याला नक्कीच आहे. निवड समितीच्या किती सदस्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे, असा सवालदेखील मनिकाने उपस्थित केला आहे. याअगोदरदेखील मनिकाने आपल्यावर झालेल्या अन्याविरुद्ध आवाज उठवला होता. तेव्हादेखील त्याची किंमत तिला चुकवावी लागली होती. मनिकाचा आताचा हा लढा तिच्या एकटीचा नसून भविष्यात इतर खेळाडूंनादेखील न्याय मिळावा, यासाठी आहे. मनिकासारख्या ज्येष्ठ खेळाडूबाबत असे होत असेल तर नवोदित खेळाडूंचे काय, हादेखील मोठा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
मनिकासारखाच अन्याय काही महिन्यांपूर्वी भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार, नामवंत गोलरक्षक आणि भारतीय ज्युनिअर हॉकी संघाचा प्रशिक्षक श्रीजेशबाबतदेखील झाला. आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यातुन श्रीजेशने निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याने युवा खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितले होते. हॉकी इंडियाने त्याची लगेचच दखल घेऊन ज्युनिअर भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली. त्याची निवड झाल्यानंतरच्या पाच आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांत भारतीय संघ सहभागी झाला. विशेष म्हणजे या सर्व स्पर्धांत भारतीय संघाने चांगली कामगिरी करताना कुठले ना कुठले पदक मिळवले. त्यामध्ये ज्युनिअर विश्वचषक हॉकी स्पर्धेचादेखील समावेश होता. असे असतानादेखील केवळ भारतीय वरिष्ठ हॉकी संघाच्या विदेशी प्रशिक्षकांनी ज्युनिअर संघासाठी विदेशी प्रशिक्षक हवा असल्याची मागणी केली. मागचापुढचा विचार न करता त्यांच्या मागणीप्रमाणे लगेचच श्रीजेशला हटवून त्याचाजागी विदेशी प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात आली.

वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षकांचे म्हणणे काय तर ज्युनिअर संघाचादेखील विदेशी प्रशिक्षक असेल तर ज्युनिअर हॉकी संघातील खेळाडूंना वरिष्ठ संघात दाखल होण्यास फारशी अडचण येणार नाही. त्यांच्या होला लगेचच हॉकी इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दाखवला आणि काही कारण नसताना श्रीजेशला बाहेरचा रस्ता दाखवला. ज्युनिअर संघाची कामगिरी श्रीजेशच्या कार्यकाळात सुधारत असताना हॉकी इंडिया हे धाडस कसे काय करु शकते, हे न सुटणारे कोडं आहे. संघाची कामगिरी सातत्याने खराब होत असेल तर प्रशिक्षक हटवला, हे बरोबर आहे. पण, इथे संघाची कामगिरी चांगली सुधारतेय. संघ पदके मिळवत असतानादेखील श्रीजेशचा बळी का घेतला याचा रितसर खुलासा हॉकी इंडियाचे पदाधिकारी करु शकले नाहीत. हा तर सरळ भारतीय प्रशिक्षकावर अन्याय आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी श्रीजेशसारख्या प्रशिक्षकाची दीर्घकाळ गरज असल्याचे सांगितले होते. पण श्रीजेशप्रकरणी सध्या ते गप्प आहेत. एकीकडे आम्ही आत्मनिर्भर भारत बनवण्यावर जोर देतोय, स्वदेशी प्रतिभेला वाव देण्याची भाषा करतोय तर हॉकी इंडिया विदेशी मानसिकतेतून बाहेर पडायला तयार नाही, हे भारतीय क्रीडाविश्वाचे दुर्देव!
(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

