दोन दिवसांपूर्वीच आमचे वकीलमित्र गणेश सोवनी यांनी सव्वा सात वाजता पाठवलेला एक मेसेज पाहून मी हादरलोच! मेसेज छायाचित्रासह असल्याने त्याचे गांभीर्य लगेचच लक्षात आले व सकाळची सर्व कामे आटोपल्यावर ठाण्यातीलच गावदेवी मार्केट परिसरात जाण्याचे पक्के केले. वकीलसाहेबांनी पाठवलेल्या मेसेजमध्ये गावदेवी येथील महापालिकेचे फळ -भाजी मार्केट जळून खाक, अशी बातमी हॊती. तो परिसर लगेचच डोळ्यासमोर आला. ठाणे रेल्वेस्थानकापासून जेमतेम दोन मिनिटांच्या अंतरावरील हा परिसर सकाळ सुरु होताच देर राततक गर्दीचाच असतो. जणू हा बाजाराचाच परिसर असल्याची जाणीव अधिकाधिक घट्ट होत जाते.
आगीबाबत संशयच जास्त
गावदेवी मार्केट हे जरी फळ-भाजीसाठी ओळखले जात असले तरी गेल्या सात-आठ वर्षांपासून कपडा मार्केटने येथे हातपाय पसरायला पद्धतशीरपणे प्रयत्न सुरु केले होते. गेल्या आठवड्यापर्यंत कपडेवाल्यांचे बहुमत जवळजवळ पूर्ण होत असल्याचे जाणवत होते (जाणवत नव्हते ते महापालिका प्रशासनाला व काही राजकीय नेत्यांना..) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास या परिसरास भेट दिली असता आगीची भीषणता लगेचच लक्षात आली व मनात संशयाची पाल चुकचूकलीच! (पत्रकारच ना..) मध्यरात्रीनंतर अडीच वाजता आग लागली असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. खरेतर यावेळी मार्केट बंद असते. सुरक्षारक्षक जाळी लावून मार्केट कुलूपबंद करतो, असा रिवाज असल्याचे समजले. त्याचबरोबर मार्केटमधील काही गाळ्यात चारपाच माणसे राहत होती, अशीही कुजबुज कानावर आली.
खरेतर या मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या दादागिरीमुळे ठाणेकर या मार्केटवर बरेचसे नाराजच होते. पाहिजे तर घ्या, नाहीतर पुढे चला असा काहीसा अरेरावीचा फंडा होता. याचे कारणही तसेच असावे, कारण फळ-भाजी मार्केटमधील अनेक गाळे हे परप्रांतीय मालकांनी चालवायला घेतल्याने व समस्त स्टेशन परिसरात आपलेच भाऊबंद फेरीवाले असल्याने विकत घेणारे उडत गेले तरी काही फरक न पडणारा एक वर्ग गेल्या वर्षांपासून या मार्केटवर कब्जा करून बसला होता, असा आरोपही अनेकांनी केला.
कपडेवाल्यांची बजबजपुरी
खरंतर महापालिकेच्या कागदोपत्री हे मार्केट फळ-भाजी मार्केट असेच आहे. मग हे कपडेवाले येथे कसे घुसले, अशी विचारणा करताच महापालिकेतील सत्तारूढ पक्षाच्या कृपेने, असे क्षणात उत्तर मिळाले! मार्केटचा काही भाग कपडेवाल्यांना देण्यात गैर नाही. पण तसा अधिकृत ठराव पालिकेच्या बाजार केला आहे काय? असे विचारले असता ‘नाही’ असेच उत्तर आले. या कपडेवाल्यांनी जवळजवळ मार्केटवर कब्जा केल्याचे चित्र निर्माण झाले होते. आणखी एक-दोन वर्षांनी फळ-भाजीवाले या मार्केटमधून हद्दपार झालेले दिसतील, असे भाकीत एका ज्येष्ठ नागरिकांने व्यक्त केले.
कळव्याच्या बिल्डरचे गाळे
या मार्केटमधील गाळेवाटपात प्रचंड गैरव्यवहार झाल्याच्या चर्चा गावदेवी परिसरात दबक्या आवाजात करण्यात येत आहेत, ज्यांचा भाजी मार्केटशी सूतराम संबंध नाही. अशा कळवा येथील एका बिल्डरला या मार्केटमध्ये तब्बल पाच गाळे देण्यात आले आहेत, अशी खात्रीलायक माहिती आहे. आता बोला!! या कपडेवाल्यांच्या बदमाशीचे किस्से बरेच आहेत. आपल्या विक्रीच्या वस्तू त्या जमिनीपर्यन्त पसरून ठेवतात, जागा तर घेतातच! वर बदमाशीही.. महिलांची वस्त्रे जमीनीपर्यंत लटकावून ठेवल्याने व ती अनेकांनी तशी ठेवल्याने आयताच ‘आडोसा’ निर्माण झाल्याचे मी अनेक गाळ्यात पाहिलेले आहे. तेथे एक फळ्या लावलेला छोटा जिना दिसत आहे. त्याच्या दोन्ही बाजूला महिलांच्या कपड्याची दुकाने आहेत. त्या दोन्ही दुकानांचे सामान अर्थात दोन्ही बाजूला थोडे थोडे ठेवून ती आत जाण्याची जागा जेमतेम एक वितभर उरते. अशी स्थितीत बदमाशांच्या ‘हस्त लाघव्याला’ ऊत येतो. काहींना त्याचा प्रसादही मिळालेला आहे. सत्तेत कुणीतरी ‘देवपिता’ असल्याशिवाय हे शक्य आहे काय? खरेतर गावदेवी परिसरातच तसेच राम मारुती रोड व गोखले रोडला तयार कपड्यांची अनेक दुकानें असताना या मार्केटमध्ये हे कपडा मार्केट कशाला, असा प्रश्न खरेतर येथील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीनी विचारायला हवा! माझी तर मागणी आहे या मार्केटमधील कपडा विभाग हटवला गेलाच पाहिजे! येथील लोकप्रतिनिधींनी ही मागणी केली नाही, तर मी स्वतः मुख्यमंत्री देवाभाऊंच्या कानावर ही माहिती घालीन.
“एक असावे.. मेख असावे
मखराच्या जाळीत नसावे
फकिराच्या झोळीत वसावे
नेक असावे.. मूक असावे” (महेश)
या एकाच हेतूने मुख्यमंत्र्यांना मी भेटीन. नेहमीप्रमाणे सरकार, पालिका प्रशासन, अग्निशमन विभाग या आगीबाबत चौकशी करेलच. पण इतक्या रात्री मार्केट बंद असताना व जवळजवळ सर्व लाईट्स बंद असतातना शॉर्टसर्किट होईलच कसे, अशी जनतेच्या मनात शंका आहे. या आगीत एक सुरक्षारक्षक व अग्नीशामक दलाच्या एका जवनाचा हकनाक बळी गेला आहे. त्यांना आदरांजली वाहून नियमाप्रमाणे जे द्यावे लागेल ते द्यावेच, पण त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत त्यांच्या घरी त्यांचे वेतन जाईल, अशी व्यवस्था सरकारने करावी अशी मागणी आहे. पाहूया ती पूर्ण होते का?
(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

