Homeएनसर्कलडिजिटल लॉकर सुविधा...

डिजिटल लॉकर सुविधा असलेली ॲक्सिस बँकेची पहिली शाखा कार्यरत

भारतातल्या खासगी क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने नवी दिल्लीतल्या कॅपिटल ग्रीन, डीएलएफ मिडटाउन प्लाझा येथे डिजिटल लॉकर सेवांवर लक्ष
केंद्रित करणारी आपली पहिली शाखा नुकतीच सुरू केली. प्रगत स्वयंचलित प्रणाली (ऑटोमेशन), उत्कृष्ट सुरक्षाव्यवस्था आणि अत्याधुनिक लॉकर सेवांच्या माध्यमातून ग्राहकांना एक वेगळा तसेच वैशिष्ट्यपूर्ण अनुभव देऊन, सुरक्षित बँकिंगची संकल्पना नव्याने साकार करण्याच्या बँकेच्या प्रयत्नांमधले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. या शाखेचे उद्घाटन केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू आणि व्यावस्थापकीय संचालक अशोक त्यागी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य
कार्यकारी अधिकारी अमिताभ चौधरी आणि कार्यकारी संचालक मुनीश शारदा आदी मान्यवर उपस्थित होते.

भारतामध्ये, विशेषतः दाट लोकवस्ती असलेल्या शहरी केंद्रांमध्ये, सेफ-डिपॉझिट लॉकरच्या उपलब्धतेमध्ये तफावत दिसते आहे. उद्योग क्षेत्राच्या अंदाजानुसार, 2030पर्यंत सुमारे 6 कोटी सधन भारतीयांना बँक लॉकरची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे. सध्या उपलब्ध असलेल्या लॉकरची संख्या केवळ 60 लाख इतकीच आहे. ही तफावत मोठ्या शहरांमध्ये अधिकच प्रकर्षाने जाणवते, जिथे शहरी जीवनशैली अधिकाधिक सुरक्षित आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या निवासी संकुलांभोवती केंद्रित होत चालली आहे. डिजिटल लॉकर सेवांवर केंद्रित असलेली ॲक्सिस बँकेची शाखा, एका सुटसुटीत आणि तंत्रज्ञानसज्ज स्वरूपाद्वारे या बदलत्या गरजेची पूर्तता करते. याद्वारे उच्चभ्रू निवासी संकुलांमध्ये सुरक्षित आणि स्वयंचलित लॉकर सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. शाखेची रचना आणि सेवा देण्याच्या पद्धतींचा नव्याने विचार करून, ही बँक दाट लोकवस्तीच्या शहरी भागांमध्ये आपली प्रत्यक्ष उपस्थिती अधिक भक्कम करते. त्याचवेळी ती ग्राहकांची गोपनीयता जपण्यासोबतच त्यांना मोठ्या प्रमाणावर सोय उपलब्ध करते.

या प्रस्तावाचा गाभा खालीलप्रमाणे:

प्रगत सुरक्षा: बहुस्तरीय सुरक्षा आणि सेन्सर-आधारित संरक्षणासह, मध्यवर्ती यंत्रणेचे लक्ष असणारी तिजोरी.

24×7 प्रवेश: शाखेतील कर्मचाऱ्यांवर अवलंबून न राहता, बायोमेट्रिक आणि चावीविरहित प्रवेशाची सुविधा.

संपूर्ण गोपनीयता: खासगी कक्षात स्वयंचलित लॉकरची उपलब्धता; ज्यामुळे गोपनीयता आणि वापराची सुलभता सुनिश्चित होते.

उद्घाटनप्रसंगी ॲक्सिस बँकेचे मॅनेजिंग डिरेक्टर आणि सीईओ अमिताभ चौधरी म्हणाले की, ग्राहककेंद्रित दृष्टिकोनामुळे ॲक्सिस बँकेत एक अशी संस्कृती निर्माण होते, जिथे आम्ही आमच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजांचा अंदाज घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपाययोजना तयार करतो. ग्राहक त्यांच्या मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करण्यासाठी त्यावर अधिक नियंत्रण, पारदर्शकता आणि सोयीची अपेक्षा करत असतात. आमची डिजिटल लॉकर सुविधा देणारी शाखा नेमके हेच करते. प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रवेश, गोपनीयता आणि
सुरक्षितता ग्राहकांच्या हातात देऊन आम्ही या अनुभवाला एक नवीन रूप देतो. आधुनिक, शहरी आणि उच्चभ्रू जीवनशैलीशी सुसंगत असे अधिक सर्वसमावेशक, परिसंस्थेवर आधारित बँकिंग मॉडेल तयार करण्याच्या आमच्या हेतूचे हे प्रतिबिंब आहे.

Continue reading

दहावीतल्या निधी पावसकरचाही दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात

संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते, याचा आदर्श नुकताच मुंबईत पाहायला मिळाला. दहावीत शिकणाऱ्या निधी पावसकर या मुलीने आपल्या पिगी बँकेत साठवलेली १०,००० रुपयांची पुंजी मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ निधीसाठी नुकतीच सुपूर्द केली. 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी...

आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत खालसा कॉलेज चमकले!

महाराष्ट्रातल्या रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत माटुंगा येथील गुरु नानक खालसा महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत ७ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य अशी एकूण १३ पदके पटकावली. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर...

पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या उपस्थितीने रंगला ‘आशाताई आणि मी’!

मुंबईतल्या बोरीवली पश्चिम येथील स्वररंग प्रतिष्ठान, या संस्थेने आयोजित केलेला भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा 'आशाताई आणि मी' हा कार्यक्रम नुकताच प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरिवली येथे संपन्न झाला. यावेळी नव्वदीच्या घरात पोहोचलेले पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीने रसिकांच्या तुडूंब...
Skip to content