जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी भावना शिवसेना (उबाठा) नेते खासदार अरविंद सावंत यांनी बोलून दाखविली.
मुंबईत जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेच्या ४४व्या वर्षाचा शुभारंभ ‘आठवणीतले बाळासाहेब’ या व्याख्यानाने झाला. त्यात अरविंद सावंत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या असंख्य आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरे यांचे अनेक विचार महत्त्वाचे आहेत. मराठी माणसाच्या न्याय्यहक्कांसाठी शिवसेनेची स्थापना केली. हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली. बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या सुंदर सिंह भंडारी यांनी हात वर केले आणि बाबरी मशीद शिवसैनिकोने गिरायी असे सांगितले तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी, जर ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान वाटतो, असे ठासून सांगितले, असे ते म्हणाले.
अरविंद सावंत यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्व अलौकिक होते. त्यांच्या जीवनात त्यांनी अनेकवेळा संघर्ष केला. शिवसेनेचा सुरुवातीचा काळ अत्यंत संघर्षाचा होता. नव्या पिढीला फक्त सुवर्णकाळ माहित आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः काहीही न घेता सामान्य शिवसैनिकाला मोठे केले. सामान्यांना भरभरून दिले. सामान्य शिवसैनिक जेवला का? त्याला काही त्रास होतो काय? सामान्य कार्यकर्त्यांच्या छोट्याछोट्या गोष्टींकडे त्यांचे लक्ष असायचे. त्यांचे व्यक्तिमत्त्व कनवाळू, दिलदार, अलौकिक होते. प्रसंगी ते कणखर वाटत, पण ते माया पण तेवढीच करीत असत.

बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय कुमार कदम यांनी ठाकरे यांच्या आठवणी सांगताना शिवसेना स्थापन होण्यापूर्वी आणि नंतरच्या घडामोडी सांगितल्या. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच होऊ शकले, याची आठवण सांगताना रा. सु. गवई शरद पवार मुख्यमंत्री असताना मातोश्रीवर कसे आले आणि काय काय घडामोडी घडल्या त्याची हकीकत सांगितली. डॉ. सुकृत खांडेकर यांनी आपल्या छोटेखानी भाषणात बाळासाहेब ठाकरे सामान्यातल्या सामान्य व्यक्ती तसेच पत्रकारांच्या पाठीशी कसे उभे राहत याचे किस्से सांगितले.
अरविंद सावंत, कुमार कदम आणि डॉ. सुकृत खांडेकर यांचा शाल, सन्मानचिन्ह, बॅनरांजली, योगेंद्र ठाकूर लिखित ठाकरे, विद्वत्तेचा महामेरू ही पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. आमदार प्रकाश सुर्वे, माजी आमदार विलास पोतनीस यांनाही सन्मानित करण्यात आले. वैशाली वैद्य, सचिन वगळ, श्याम पंडित, वैभव वैद्य, राजा खोपकर, अभिलाष कोंडविलकर, वनिता दळवी, रोहिणी चौगुले, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभाग संघटक शुभदा शिंदे, मागाठाणे मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, हेमंत पाटकर, उद्योजक विजय घरटकर, शिवभक्त राजू देसाई, विजय तारी, विजय घरटकर, दादासाहेब शिंदे, मनोहर देसाई आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. वायंगणकर साई स्पोर्ट्सच्या मुलींनी गायिलेल्या सरस्वती वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रा. नयना रेगे यांनी सूत्रसंचालन केले. रेखा बोऱ्हाडे आणि कांचन सार्दळ यांच्या राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रतिष्ठेचे पुरस्कार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते प्रदान
तीन दिवसांपासून सुरु असलेल्या जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेची रविवारी सांगता झाली. यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. गोपाळ शेट्टी यांनी पुरस्कृत केलेला पहिला विजय वैद्य उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ नाट्यसमीक्षक संजय डहाळे यांना, जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचा शारदा पुरस्कार ज्येष्ठ चित्रपटसमीक्षक दिलीप ठाकूर यांना, प्रेरणा पुरस्कार वायंगणकर साई स्पोर्ट्स क्लबच्या आधारस्तंभ पल्लवी वायंगणकर यांना, जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते विजय पडकिल यांना देण्यात आला. सुप्रसिद्ध गायक मंदार आपटे, श्रेयसी मंत्रवादी, अर्चना गोरे यांच्या ‘कितीदा नव्याने…’ या सुश्राव्य गीतांचा कार्यक्रम झाला.

