महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपात असला तर त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही थराला जाऊन दंडित करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आणि रोहित पवार यांच्या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले.
अजित पवार यांच्या विमानअपघातातील मृत्यूनंतर त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी वारंवार काही आरोप केले आहेत. या सर्व बाबींवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिल्यांदाच विस्तृत निवेदन करताना गुरुवारी विधानसभेत या घटनेची सविस्तर माहिती दिली. तसेच, थेट शब्दांत न सुनावता त्यांनी आमदार रोहित पवार यांना राजकारण करू नका, हे सांगून गेल्या सात-आठ वर्षांत आपल्यापेक्षा अन्य कोणाही राजकारण्याशी अजितदादांची मैत्री नव्हती, असेही ठासून सांगितले. अजित पवार तुमचे काका होते आणि तुम्हाला तीव्रतेने या घटनेबद्दल वाटते, हे योग्यच आहे. पण इतरांची तीव्रता कमी आहे, असे समजण्याचे कारण नाही, असे सांगताना फडणवीस यांचा आवाज चढला. ते पुढे म्हणाले की, गेल्या सात-आठ वर्षांत तर अजितदादांची जितकी मैत्री माझ्याशी होती तितकी अन्य कोणत्याही राजकीय व्यक्तीशी नव्हती, असे मला वाटते.

राज्याच्या सीआयडीमार्फत तपास सुरू आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले की, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अपघातविषयक चौकशीचा अहवाल आला की त्याचा समावेश करून घेत सीआयडीचा तपास पूर्ण केला जातो. रोहित पवारांच्या प्रयत्नांना आमचे सगळ्यांचे समर्थन आहे. पण इतर कोणाला या अपघाताबद्दल देणेघेणे नाही, असे समजणे योग्य नाही. त्यांनी आणि जितेन्द्र आव्हाड यांनी एफआयआरचा मुद्दा मांडला. पण अशा कोणत्याही अपघाताच्या घटनेनंतर एडीआर म्हणजे अकस्मात मयत असाच दाखल केला जातो. तपासानंतर त्या घटनेत काही घातपात किंवा कारस्थानादी बाबी आढळल्या तर एफआयआर केला जातो. काही वेळा एफआयआरमध्ये राजकीय व्यक्तींची नावे जाणूनबुजून दिली गेली आणि त्या तपासात काही निष्पन्न झाले नाही तर आरोपपत्रात ती नावे येत नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे.
कर्नाटकमध्ये जाऊन झिरो एफआयआर दाखल करून घेतल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवार यांच्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. कर्नाटक सरकारच्या पोलिसांना असा झिरो एफआयआर दाखल करून घेण्याचा अधिकारच नाही, हे सांगताना फडणवीस म्हणाले की, पीडित व्यक्ती किंवा व्हिक्टिम एफआयआर दाखल करण्याच्या स्थितीत नसेल तर झिरो एफआयआर केला जातो. पण कर्नाटकच्या पोलिसांनी असा झिरो एफआयआर घेतला आणि त्या राज्य सरकारने महाराष्ट्रात जणू काही तपासयंत्रणा कुचकामी आहेत, असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ही गोष्ट महाराष्ट्राची मानहानी करण्यासाठी केली असून ते सर्वस्वी अयोग्य आहे, असेही फडणवीस म्हणाले.

वैमानिक, सहवैमानिक यांच्या सर्व तपासण्या झाल्या होत्या. विमानाची स्थिती, विमानात स्वतंत्रपणे इंधन नेलेले नसणे, विमानाच्या संदर्भातील तसेच कंपनीशी संबंधित प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती देत रोहित पवार यांनी केलेले आरोप फडणवीस यांनी खोडून काढले. अजित पवार यांच्या अपघातानंतर शवविच्छेदन अहवाल, इतर मृतांच्या संदर्भातील शवविच्छेदन अहवाल, विमान उड्डाणाच्या वेळची स्थिती हे सर्व सांगतानाच फडणवीस यांनी या सर्व बाबतीत कोणत्याही प्रकारच्या घातपाताची शक्यता नसल्याचे सूचित केले. या विमानात इंधनाचा स्वतंत्र कँन नेण्यात आला नाही, असेही निष्पन्न झाल्याचे त्यांनी सांगितले. बारामतीच्या विमानतळावर अद्ययावत यंत्रणांचा अभाव आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले आणि २०१६नंतर बारामतीच्या विमानतळाची सुरक्षाविषयक तपासणी झालेली नाही, याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने केलेली सीबीआय चौकशीची मागणी राज्य सरकारनेही केंद्र सरकारकडे केलेली आहे. तसेच, आपण स्वतः केंद्रीय गृहमंत्र्यांशी बोललो असून नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानंतर केंद्रीय गृहविभाग त्याविषयी निर्णय घेणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

तर लिंबू-मिरचीनेच जिंकले असते युद्ध…
भोंदूबाबा अशोक खरात यांच्यासंदर्भात यापूर्वीच निवेदन करून आपण माहिती दिली आहे, हे सांगतानाच फडणवीस म्हणाले की, जादूटोणा करून प्रश्न संपले असते तर या भोंदू खरातला आपण ट्रम्पचा सल्लागारच नेमला असता आणि द्रोणऐवजी लिंबू मिरचीने युद्ध लढले गेले असते. सीमेवर सैनिकांऐवजी पाच-दहा भोंदूबाबा पाठवले असते. प्रचारसभा न घेता एकाच ठिकाणहून सर्व निवडणुका जिंकल्या असत्या. पण अध्यात्म म्हणजे आणि श्रद्धा म्हणजे जी दुसऱ्याचे अहित करणार नाही अशी गोष्ट. त्यामुळे या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल. सुरस कथा चौकशी तपास पूर्ण होईपर्यंत चालूच राहतील.
(लेखक शैलेंद्र परांजपे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

