Homeबॅक पेजवाढतं वय स्वीकारणं,...

वाढतं वय स्वीकारणं, खरंच असतं का कठीण?

​कधीतरी सहज आरशासमोर उभं राहिलं की, आता स्वतःचीच नव्याने ओळख करून घ्यावी लागते. डोळ्यांच्या कडांना दिसणाऱ्या बारीक रेषा आणि कानाशी रेंगाळणारी रुपेरी झालेली बट पाहताना मनात एकच प्रश्न येतो- “हे सगळं कधी झालं? मी तर अजूनही आतून तोच आहे.. तीच आहे.” ​वाढतं वय स्वीकारणं खरंच खूप कठीण असतं. कारण वय म्हणजे फक्त कॅलेंडरवर बदलणारे आकडे नसतात, तर ते आपल्या मनाच्या गाभाऱ्यात होणारे खोलवरचे बदल असतात. लहानपणी आपल्याला वाटायचं की ‘मोठं’ होणं म्हणजे खूप स्वातंत्र्य मिळेल. पण आता कळतंय की मोठं होणं म्हणजे स्वातंत्र्यापेक्षा तडजोड जास्त असते. आपली निरागसता, तो निष्पाप भाव कुठेतरी हरवून जातो. एकेकाळी ‘कट्टी’ झाली की दोन मिनिटांत विसरून जाणारे आपण, आता साध्या साध्या शब्दांचेही अर्थ काढू लागतो. नात्यांमधला तो जुना ओलावा आटल्यासारखा वाटतो.

मित्र-मैत्रिणी भेटतात, पण त्यात पूर्वीची ती धून नसते; उरते ती फक्त औपचारिक चौकशी. ​यात सर्वात जास्त वेदना देणारी गोष्ट म्हणजे, आपल्या सुरक्षित विश्वाचा ढासळणारा आधार- आपले आई-बाबा. खरं सांगू? माणसाचं वय त्याच्या जन्मतारखेवरून ठरत नाही. जोपर्यंत आई-बाबा आपल्यासोबत असतात, तोपर्यंत आपण ‘लहान’ असतो. जगासाठी आपण कितीही मोठे साहेब झालो असू, पण उंबरठा ओलांडून घरात आलो की, आईच्या मायेपुढे आणि बाबांच्या आधारापुढे आपण पुन्हा बाळ होतो. ते असेपर्यंत जगाचे चटके आपल्याला लागत नाहीत, कारण ते आपल्यासाठी ढाल बनून उभे असतात. ​पण जेव्हा ही ढाल निसटते, किंवा जेव्हा ते म्हातारे होतात, तेव्हा अचानक आपल्याला जाणीव होते की, आता आपल्या डोक्यावरचं छप्पर उडालं आहे. ती जाणीव आपल्याला खऱ्या अर्थाने आणि एका झटक्यात ‘म्हातारे’ करून जाते.

वय

तो पोरकेपणा, ती पोकळी भरून काढणं कठीण असतं. ​मग या वाढत्या वयाला, या रितेपणाला सामोरं कसं जायचं? स्वतःला कसं बदलायचं? ​त्याचं उत्तर निसर्गातच दडलेलं आहे. नदी उगमस्थानाजवळ खळाळती असते, उड्या मारत असते. पण जसजशी ती सागराकडे जाते, तसतशी ती शांत, गंभीर आणि अथांग होत जाते. आपणही आता त्या नदीसारखं शांत व्हायला शिकायला हवं. बालपण आणि तारुण्यात शरीराचा वेग होता, आता वयाच्या या टप्प्यावर मनाची खोली असायला हवी. ​स्वतःला बदलणं म्हणजे आपलं अस्तित्त्व पुसणं नव्हे, तर आपली भूमिका बदलणं (Role Reversal). ​अपेक्षांचं ओझं कमी करणं, हाच आनंदाचा मार्ग आहे.

लोक बदलणार, नाती बदलणार, हे कटू सत्य पचवणं म्हणजेच परिपक्वता. शरीराच्या तक्रारींकडे कुरबुर करत पाहण्यापेक्षा, त्याला एका जुन्या, विश्वासू मित्रासारखं जपणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, वाढत्या वयात एकटं वाटणं स्वाभाविक आहे. पण त्या एकटेपणाला ‘एकांता’त बदलता आलं पाहिजे. स्वतःच्याच सहवासात रमायला शिकलो, तर बाहेरची बदललेली दुनिया आपल्याला त्रास देऊ शकत नाही. ​शेवटी, हे वय म्हणजे आयुष्याची सांजवेळ नाही, तर ती एक नवी सुरुवात आहे- जास्त समजूतदारपणे, जास्त शांतपणे जगण्याची. आरशातल्या त्या सुरकुत्यांकडे पाहून आता हसून म्हणायचं, “या खुणा आहेत माझ्या अनुभवाच्या, माझ्या प्रवासाच्या.”

मनातल्या त्या लहान मुलाला जपा. वास्तवातल्या या मोठ्या माणसालाही आता प्रेमाने कवटाळा. ​कारण, पिकलेलं फळच जास्त गोड लागतं!

(लेखक मनिषा रेगे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Continue reading

स्वतःलाच मिळवावी लागते मनाची शांतता!

​आयुष्यात कमालीची धावपळ चाललेली असते. याच धावपळीत मनात विचारांचे काहूर आणि ताण सतत जमा होत राहतो. कसलीतरी अज्ञात भीती आणि चिंता माणसाला आतून पोखरत असते. अशावेळी मनात एकच तीव्र इच्छा असते- थोडी शांतता मिळावी आणि शरीर निरोगी राहवे. ​ही...

आयुष्याच्या संध्याकाळी…

माणसाचं आयुष्य म्हणजे अनुभवांच्या मण्यांनी ओवलेली एक सुंदर माळ असते. लहानपणी आपण भविष्याची स्वप्ने पाहतो, तारुण्यात वर्तमानातील शर्यतीत धावतो, पण जसजसे आपण आयुष्याच्या संध्याकाळी पोहोचतो, तसतसे आपले पाय आपोआप भूतकाळाच्या वाटेने वळू लागतात. वयानुसार जुन्या आठवणींना उजाळा देण्याची, बालपणीच्या...

डिजिटल युगाचे नवे तारे!

आजच्या डिजिटल युगात करमणुकीची व्याख्या पूर्णपणे बदलली आहे. एकेकाळी आपण फक्त चित्रपट किंवा टीव्हीवरील कलाकारांना 'सेलिब्रिटी' मानत होतो, पण आज सोशल मीडियाच्या क्रांतीमुळे 'सेलिब्रिटी व्लॉगर्स' आणि 'इन्फ्लुएंसर्स' (Influencers) नावाचा एक नवा वर्ग उदयाला आला आहे. स्मार्टफोन आणि स्वस्त इंटरनेटमुळे...
Skip to content