Homeब्लॅक अँड व्हाईटआजीने दूर सारलेल्या...

आजीने दूर सारलेल्या फुलराणीनेच पुढे बॅडमिंटन गाजवले!

भारतीय महिला बॅडमिंटनविश्वाला नवी झळाळी‌ मिळवून‌ देण्यात मोठा हातभार लावणारी भारताची जिगरबाज स्टार महिला बॅडमिंटनपटू, ३५ वर्षीय सायना नेहवालने गुडघ्याची गंभीर दुखापत आणि शरीर पहिल्यासारखे साथ देत नसल्यामुळे अखेर अधिकृतपणे आपली बॅडमिंटन रॅकेट खाली ठेवण्याचा निर्णय घेतला. तिच्या निवृत्तीमुळे एका प्रेरणादायी युगाची समाप्ती झाली असे म्हटले तर ‌वावगे ठरू नये. हरियाणामधील हिस्सार येथे तिचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर तिची आजी महिनाभर छोट्या सायनाला बघायलादेखील गेली नव्हती. घरात खंत व्यक्त केली गेली. कारण मुलगा हवा होता. पण दुसरीदेखील मुलगीच झाली. ज्या मुलीला सुरूवातीला घरच्यांनी नाकारले, त्याच मुलीने पुढे देशासाठी गौरवास्पद कामगिरी करुन मुलगी म्हणजे ओझे, या सामाजिक मानसिकतेला, आपल्या खेळाने चोख उत्तर दिले. तिच्या आई-वडिलांनी मात्र तिला सुरूवातीच्या काळात भक्कम साथ दिली आणि या जुनाट वातावरणापासून दूर ठेवले. त्यामुळेच ही फुलराणी भारताला लाभली.

डॉ. हरवीर सिंह नेहवाल आणि उषा रानी नेहवाल तिचे आई-वडिल. वडिल कृषी खात्यात होते तर आईला बॅडमिंटनची आवड होती. तिने राज्यस्तरीय स्पर्धांपर्यंत मजल मारली होती. मोठी बहिण चांगली व्हॉलीबॉल खेळाडू होती. त्यामुळे सायना खेळाकडे वळली नसती तर नवलच. सुरूवातीला आईकडूनच या खेळाचे बाळकडू सायनाने घेतले. वयाच्या आठव्या वर्षी सायनाने बॅडमिंटन खेळण्यास सुरूवात केली. मग तिने मागे वळून बघितलं नाही. पुढे वडिलांची बदली हैद्राबाद येथे झाली. इथेच तिच्या जीवनाला मोठी कलाटणी मिळाली. सुरूवातीला आर्थिक चणचण, अपुरी साधने, पहाटे चार वाजता सुरु होणारा खडतर सराव, या साऱ्यावर मात करीत ती महिला बॅडमिंटनविश्वात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचली. मोठे बॅडमिंटन खेळाडू होण्याचे अधुरं राहिलेले आईचे स्वप्न सायनानै आपले ध्येय बनवले. भारतीय महिला बॅडमिंटनला एक नवे वळण देण्यात ती यशस्वी ठरली. सायनाने संघर्षातूनच स्वत:ची वाट शोधली. सायनाच्या यशामुळे त्या काळात मग अनेक मुली बॅडमिंटन खेळाकडे वळल्या. भारतीय महिला बॅडमिंटनमध्ये ती यशाची एक-एक शिखरे सर करत गेली. सात्यतपूर्ण शानदार कामगिरी करत तिने भारतीय बॅडमिंटनप्रेमींची मने जिंकली.

पुलेला गोपीचंद यांनी सुरूवातीच्या काळात सायनाच्या खेळात सफाई आणली. त्यानंतर कारकिर्दीतील दुसऱ्या टप्प्यात विमल कुमार यांनी तिचा खेळ आधिक फुलवला. १५ वर्षांपेक्षा जास्त काळ तिने भारतीय महिला बॅडमिंटनची खिंड सर्मथपणे लढवली. विश्व ज्युनिअर स्पर्धा जिंकणारी आणि जागतिक महिला क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. एकूण २४ आंतरराष्ट्रीय स्पर्धांत तिने विजयाची मोहोर उमटवली. त्यात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या १० सुपर सिरीज स्पर्धांचा समावेश आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत २ सुवर्णपदके जिंकणारी ती एकमेव भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे. ऑलिंपिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. आक्रमण आणि बचाव याचा सुंदर मिलाफ तिच्या खेळात बघायला मिळायचा. वेगवान सर्विस, जोरदार फोरहॅन्ड, बॅकहॅन्डचे फटके आणि हलक्या ड्रॉपच्या फटक्यांचा सुरेख वापर करून ती प्रतिस्पर्धी खेळाडूना नामोहरम करत असे. केंद्र सरकारने अर्जुन, राजीव गांधी खेलरत्न, पद्मश्री, पद्मभूषण पुरस्काराने सायनाला सन्मानित केले आहे. ती उत्तम कराटेपटू असून तिच्याकडे ब्लॅक बेल्टदेखील आहे. शाहरुख खान, प्रभास तिचे आवडते कलाकार‌ आहेत. २०२३ साली ती शेवटची सिंगापूर आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली. त्यानंतर दुखापतीने तिला त्रस्त केले. भावी काळात स्वतःची अकादमी सायना सुरु करणार असून तिथे चांगले खेळाडू तयार करण्याचे तिचे स्वप्न आहे. तिच्या निवृत्तीमुळे एका युगाची समाप्ती झाली आहे. सायनाच्या भारतीय महिला बॅडमिंटनमधील योगदानासाठी तिला सलाम करावाच लागेल.

(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

Continue reading

क्रिकेट, कुस्तीसारखे खेळ वगळल्यानंतरही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची बाजी!

ग्लासगो येथे संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरी‌च्या जोरावर भारताने पदकतालिकेत ऑस्टेलिया, इंग्लंड, कॅनडापाठोपाठ चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. भारताने या स्पर्धेत १३ सुवर्ण, १७ रौप्य,९ कांस्य, अशी एकूण ३९ पदकांची कमाई केली. १३पैकी ८...

एक-एक बोट छाटून काढणाऱ्या सर गॅरी सोबर्सना सलाम!

वेस्टइंडीज क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सर गारफिल्ड सोबर्स यांच्या निधनामुळे क्रिकेटविश्वाने २०व्या शतकातील एक सर्वोतम अष्टपैलू खेळाडू गमवला आहे. एक आर्कषक, शैलीदार फलंदाज, प्रभावी गोलंदाज आणि चपळ, दक्ष क्षेत्ररक्षक या खेळाच्या तीनही प्रमुख अंगात सोबर्स यांनी स्वतःचा एक वेगळा...

अशी घातली स्पेनने फुटबॉल विश्वविजेतेपदाला गवसणी!

गेले सव्वा महिना सुरु असलेला फुटबॉलचा विश्वचषकाचा महाकुंभ आता संपला आहे. फुटबॉलविश्वाला आता स्पेनच्या रुपाने पुन्हा फुटबॉलसम्राट मिळाले. २०१० साली आपल्या पहिल्याच प्रयत्नात ही स्पर्धा जिंकणाऱ्या स्पेनने तब्बल १६ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. या...
Skip to content