यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर, 10 लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांची निवड समिती विजेत्याची निवड करणार असून, समितीचे अध्यक्षपद प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक राकेश मेहरा भूषवतील. त्यांच्यासमवेत ग्रॅमी क्लिफर्ड (संकलक आणि दिग्दर्शक, ऑस्ट्रेलिया), कॅथरीना शूटलर (अभिनेता, जर्मनी), चंद्रन रुटनम (निर्माते, श्रीलंका) आणि रेमी अडेफारासिन (छायाचित्रण दिग्दर्शक, इंग्लंड) या समितीत असतील.
यंदा पदार्पण केलेले आणि निवड झालेले चित्रपटः
फ्रँक– एस्टोनियन चित्रपट दिग्दर्शक टोनिस पिल यांनी त्यांच्या भावी काळावर आधारित मार्मिक चित्रपटातून पदार्पण केले आहे. हा चित्रपट बाल आणि तरूण प्रेक्षकांसाठीच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात- श्लिंगेल 2025मध्ये प्रदर्शित झाला होता. तिथे त्याने FIPRESCI निवड पुरस्कारासह अनेक पुरस्कारांसाठी नामांकन मिळवले होते. कौटुंबिक शोषणाच्या क्रूर घटनेनंतर, 13 वर्षीय पॉल, स्वतःला एका नव्या शहरात पाहतो, जिथे आपलेपणाच्या शोधात तो अनेक चुकीच्या निर्णयांच्या साखळीत अडकतो. त्याचे भविष्य अधंःकारमय होऊ लागते. तेव्हा एका विक्षिप्त, दिव्यांग व्यक्तिशी जुळलेल्या अनपेक्षित बंधामुळे त्याच्या आयुष्याचा मार्गच बदलून जातो. या चित्रपटातून, मोडलेली कुटुंबे, बालपणीच्या जखमा आणि अशक्य मैत्रीच्या परिवर्तनीय ताकदीचा तरलपणे शोध घेण्यात आला आहे.
फ्युरी- मूळ शीर्षक- ला फुरिआ. स्पॅनिश चित्रपट निर्मात्या जेम्मा ब्लास्को यांचा हा पदार्पणातील चित्रपट, जो नव्या आणि साहसी आवाजाच्या आगमनाचा संकेत देणारे एक क्रूर नाट्य आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन SXSW चित्रपट महोत्सव २०२५ आणि सॅन सेबास्टियन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५मध्ये झाले आहे. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला, बलात्कार झाल्यानंतर अभिनेत्री अलेक्झांड्रा, मेडिया या व्यक्तिरेखेद्वारे तिच्या वेदना व्यक्त करते. तिचा भाऊ एड्रियन तिचे रक्षण करण्यात अपयशी झाल्याने अपराधगंड आणि क्रोधाशी झगडत असतो. हा चित्रपट हिंसा, पुरूषप्रधान समाजात, लैंगिक अत्याचारातून बचावलेल्या व्यक्तींना भेडसावणारी भीती, लाज, तिरस्कार आणि अपराधपणा यांच्याविषयी एक नवे स्त्रीवादी निरीक्षण समोर आणतो.
द प्रेसिडेंटस् केक- मूळ शीर्षक- ममलाकेत अल कसाब. इराकी लेखक, चित्रपट निर्माते आणि शिक्षक असलेले हसन हादी, द प्रेसिडेंट केक या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत . 2025च्या कान फिल्म फेस्टिवलच्या डायरेक्टर्स फोर्टनाईट विभागात या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला होता. या विभागाचा प्रेक्षकांचा पुरस्कार कॅमेरा डी’ओर या चित्रपटाने पटकावला होता. 98व्या अकॅडमी पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी इराकची प्रवेशिका म्हणून त्याची निवड झाली. 1990मध्ये घडणारा हा चित्रपट, 9 वर्षांच्या लामियावर चित्रित आहे. राष्ट्रपतींच्या वाढदिवसाचा केक तिला तयार करावा लागत असतो. राजकीय अस्थिरतेच्या काळात, संयुक्त राष्ट्रांच्या आहार निर्बंधांतर्गत जगण्यासाठी लोक दररोज संघर्ष करत असताना, तिला या सक्तीच्या कामासाठी साहित्य शोधण्यासाठी करावा लागणारा झगडा आणि त्यात अपयशी झाल्यास भोगावी लागणारी संभाव्य शिक्षा याची कथा सांगतो. सातत्याने होणाऱ्या उपासमारीच्या चित्रणातून, चित्रपट युद्ध आणि राजकीय गोंधळात अडकलेल्या मुलांची तीव्र असुरक्षितता उघड करतो. साध्या पीठाच्या शोधापासून सुरू होणारी ही गोष्ट अन्न, सुरक्षितता आणि बालहक्कांपासून वंचित ठेवणारी रुपककथा दाखवते.

द वेव्ह- मूळ शीर्षक- ला ओला. चिली चित्रपटसृ्ष्टीतील आघाडीचे चित्रपट निर्माते सबास्टियन लेलिओ यांचा हा पहिला सांगितिक चित्रपट. हा चित्रपट 2025च्या कान चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला होता. चिलीतील 2018मधील स्त्रीवादी निर्दशने आणि संप यामुळे प्रेरित झालेला हा चित्रपट, महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या जुलिया या विद्यार्थिनीचे चित्रण करतो, जी वाढत्या चळवळीच्या संदर्भात, अलीकडील लैंगिक अत्याचाराच्या वास्तवाला तोंड देत आहे. लेलिओ सांगितिक रूप आणि तत्कालिक राजकीय परिस्थिती यांचे धाडसी सादरीकरण करतो. यात नृत्यदिग्दर्शन, कोरस आणि भावनाविरेचन करणारे सादरीकरण यांचा एकत्रित वापर करून सामूहिक आक्रोश व्यक्त करण्यात आला आहे.
याकुशिमाज इल्युजन- मूळ शीर्षक-लइल्युशन डी याकुशिमा. जपानच्या प्रसिद्ध लेखिका नाओमी कावासे यांनी लक्झमबर्ग-जर्मन अभिनेता विकी क्रिप्ससमवेत या अस्तित्त्ववादी चित्रपटासाठी काम केले आहे. हा चित्रपट 2025च्या लोकार्नो चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला होता. गोल्डन लेपर्डसाठी त्याला नामांकन मिळाले होते. जपानमध्ये काम करणारी एक फ्रेंच प्रत्यारोपण समन्वयक तिच्या हरवलेल्या जोडीदाराचा शोध घेता घेता एका मुलाचा जीव वाचवते, जो देशातील हजारो वार्षिक ‘जोहात्सु’- गायब लोकांपैकी एक असतो. ट्रेडमार्क असलेल्या कावासे तंत्रानुसार, हा चित्रपट मृत्यू, त्याग आणि मानवी जीवनाला बांधून ठेवणाऱ्या अदृश्य धाग्यांवर सखोल चिंतनाच्या रूपात सादर करण्यात आला आहे.
तन्वी द ग्रेट- यशस्वी नाट्यप्रयोगानंतर, अभिनेता आणि दिग्दर्शक अनुपम खेर यांचे दिग्दर्शकीय पदार्पण असलेला तन्वी द ग्रेट चित्रपट इफ्फीमध्ये प्रदर्शित होत आहे . तन्वी रैना, या ऑटिझमग्रस्त महिलेला तिच्या भारतीय सैन्य दलातील दिवंगत वडिलांचे सियाचिन ग्लेशियर येथील ध्वजाला वंदन करण्याचे स्वप्न समजते. लष्करी सेवेत ऑटिझममुळे येणाऱ्या अडचणींना तोंड देत ती तिचे ध्येय पूर्ण करण्याचा निर्धार करते. तन्वीच्या प्रवासातून धैर्य, सहृदयता आणि दृढनिश्चय यामुळेच खरे नायक घडतात हे या चित्रपटात दिसते.
व्हाईट स्नो– राष्ट्रपती पुरस्कारविजेते आणि माजी आयसीएफटी-युनेस्को गांधी पदकविजेते प्रवीण मोरछाले यांचा नवीन चित्रपट व्हाईट स्नो उर्दू चित्रपट आहे. हा चित्रपट 21व्या हाँगकाँग-एशिया फिल्म फायनान्सिंग फोरम (HAF)च्या अनुदानासाठीही निवडण्यात आला होता. अमिर, एक तरूण चित्रपट निर्माता, त्याच्या चित्रपटावर पहिल्या खेळानंतर, प्रसुतीकाळातले रक्त, हा एक नैसर्गिक क्षण जो सामाजिकदृष्ट्या विघटनकारी आहे असे मानून, त्याचे चित्रण केल्याबद्दल डोंगराळ भागातल्या एका धार्मिक नेत्याने बंदी घातली आहे. कोणतीही आशा दिसत नसल्याने, अमिरचे कलास्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याची आई, फातिमा, जीव धोक्यात घालून दुर्गम गावांमध्ये एक छोटा टीव्ही आणि डीव्हीडी प्लेअर घेऊन प्रवास करते. हा चित्रपट दडपशाही आणि पितृसत्ताक नियंत्रणावर थेट टीका करतो.
विमुक्त- इंग्रजी शीर्षक- इन सर्च ऑफ द स्काय. जितंक सिंग गुर्जर यांचा हा चित्रपट टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला होता आणि त्याने प्रतिष्ठेचा नेटपॅक पुरस्कार जिंकला. त्यामुळे समकालीन स्वतंत्र चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांनी ओळख निर्माण झाली. ब्रज भाषेतील या भारतीय चित्रपटात, गरीब वृद्ध जोडप्याची कथा दाखवण्यात आली आहे, जे आपल्या बौद्धिकदृष्ट्या अक्षम मुलाला बरे करण्याच्या आशेने महा कुंभ तीर्थयात्रेला घेऊन जातात. हा चित्रपट श्रद्धा, हताशपणा, लवचिकता आणि दिव्यांगत्व/अक्षमतेविषयी संदर्भातील सामाजिक कलंक या विषयांवर प्रकाश टाकतो.

