Homeमाय व्हॉईसरोहित शेट्टींच्या बंगल्यावरचा...

रोहित शेट्टींच्या बंगल्यावरचा गोळीबार, एक स्टंट?

काही महिन्यांपूर्वी वा सुमारे वर्षांपूर्वी प्रसिद्ध सिनेअभिनेता सलमान खान यांच्याही बंगल्याच्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा तर बांद्रा पूर्व येथे भररस्त्यात गोळ्या घालून खून करण्यात आला. यानंतरही कुणाकुणाला कोट्यवधी रुपयांच्या खंडणीसाठी बिष्णोई टोळीकडून घमकावण्यात आले होते. गेल्या दीड-दोन वर्षांतील ठराविक अंतराने घडलेल्या या गंभीर घटना आहेत. त्यातच अवघ्या तीन दिवसांपूर्वी जुहू येथील एरवी शांत असलेल्या भागात मध्यरात्रीच्या सुमारास रोहित शेट्टी यांच्या ‘शेट्टी टॉवर’, या बंगल्याच्या दरवाजात गुंडांकडून खुलेआम गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर अवघ्या पाच-दहा मिनिटांमध्येच समाजमाध्यमावर गोळीबाराची क्लिप प्रस्तृत करून ‘ही तर झलक होती.. पुरा सिनेमा अभी बाकी है.. और आईंदा रास्तेपर नहीं तो घर में घुसके फायरिंग करेंगे.. खोपडीमे घुसा लेना ये बात..’ असा मेसेजही रोहितसाठी पाठवला. गुंडगिरी कुठल्या थराला गेली आहे तेच ही क्लिप दर्शवत आहे. ‘घुसके मारेंगे..’ ही राजकीय नेत्यांची भाषा आता गुंडही वापरूलागले आहेत हेच दिसून येत आहे.

सलमान खान यांच्या बंगल्यावरील गोळीबार व सिद्दीकीच्या खुनाचे संशयित आरोपीही मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने काही दिवसांतच पकडले होते. यावेळी तर पोलिसांनी कमालच केली. अवघ्या काही तासांत पुण्यापर्यंत कूच करून चार संशयितही जेरबंद केले! पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले की, हल्ली गुन्हा घडला त्या परिसरात नवीन कोण कोण माणसे आली आहेत ते त्यांच्या फोनच्या सहाय्याने शोधता येते व यादी शॉर्टलिस्ट करून संशयित पकडता येतात. मी फक्त मान हलवली व मनात म्हटले चारपाच जण तर होते ते कशाला पुण्याला पळून जाण्याचा त्रास घेतील? उलट पोलिसांना कामाला लावून हे चौघेही दोन-तीन बाईक्सवरून जुहू भागातीलच कुठल्यातरी पबमध्ये आयटम घेऊन पेग मारत बसलेच असणार.. शेट्टी टॉवरपासून जवळच असे बरेच पब आहेत. पोपो, बोजो, स्टारलिंक, येडा अशी अनेक नावे आहेत. येडा नावाचा पबही आहे जिथे वेडा बनून पेढा खाणाऱ्यासाठी याहून चांगले ठिकाण कुठले असू शकते का? तुम्ही शंका व्यक्त कराल की सिंगलला पबमध्ये कसे घेतील? तर ते काहीही करू शकतात. त्यांनी बाऊंसरच्या कानपट्टीला घोडा लावला की सर्व झाले असते. पण, आज ते कामगिरीवर होते.

जुहू भागात ‘आयटम’ पैदा करणे कठीण आहे का भाय… पैसा फेको तो दस आयटम कमर हिलाएगी भाय.. तर पुण्याला जाऊन पोलिसांनी तीर मारला वगैरे काही नाही. फार तर कुठल्यातरी आकाने ही पोर हजर केली असावीत. पोलीस जो सूत्रधार शुभम लोणकर म्हणून सांगत आहेत तो तर सिद्दीकी केसमध्ये आत होता. जामीनावर असताना त्याने जामीन ‘जम्प’ कसा केला याचीच खरंतर उच्चस्तरीय चौकशी होण्याची गरज आहे. हाय प्रोफाइल केसमधील आरोपी पोलिसांना गुंगारा कसा देऊ शकतो हा गंभीर प्रश्न आहे. त्याच्यामागे कुणाची ड्युटी होती की शुभमने सर्वांनाच मॅनेज केले होते, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. स्कूटर विकून पैसे आले.. वगैरे पत्रकारांना सांगण्यासाठी ठीक आहे. पण कोर्टात त्याला किमंत शून्यच!

चित्रपटसृष्टीतील अनेकांचे गुंड टोळयांच्या म्होरक्याशी संबंध आहेत, असे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. पूर्वी दाऊद व छोटा राजन तसेच गवळी टोळीचाही फिल्म जगताशी संबंध असल्याचे जाहीर झाले होते. रोहित शेट्टी कितीही सांगत असले की मला यापूर्वी बिष्णोई टोळीचा फोन आलाच नव्हता, यावर त्यांच्याजवळचे पोलीस अधिकारीही विश्वास ठेवणार नाहीत. सलमाननेही आपले कधीच बोलणे झाले नसल्याचे सांगतले होते. परंतु गुन्हेगारी वर्तुळातील सुत्रानुसार एका मध्यस्थामार्फत सलमानने बिष्णोईशी बोलणे केले होते. सलमान वा सिद्दीकीच्या घरातील व्यक्तींनी पोलिसांना याबाबत काय सांगितले ते पोलिसांनी सविस्तर जाहीर करण्याची गरज आहे. असे केल्याने कोण किती पाण्यात आहे हे जनतेला समजेल. दाऊदसंबंधी आरोप झाल्यानंतरही अनेकांचे जाबजबाब झाले होते. ते तरी पोलिसांनी कुठे जाहीर केले? रोहित शेट्टी यांच्या बंगल्याबाहेरील गोळीबाराबाबत गुजरातच्या साबरमती जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या लॉरेन्स बिष्णोईचे जबाब घेण्यासाठी मुंबई पोलीस तेथे जाणार असल्याचे जाहीर झाले आहे.

जुहू परिसरात सुमारे दोन-तीन तास घालवल्यानंतर या गोळीबार कथेत तसा काही दम नसल्याचे अनेकांनी सूचित केले. स्टंटमास्तरच्या मुलाने (रोहित यांचे पिताश्री एन बी शेट्टी यांनी चित्रपटात नेहमीच खलनायकाच्या साथीदाराची भूमिका साकारलेली होती तसेच ते स्टंटमास्तरही होते.) हा स्टंटच केला असल्याचे गुन्हेगारी वर्तुळाचा कानोसा घेतला असता काहींनी बोलून दाखवले. हा स्टंट तरी असावा किंवा पूर्वी कधीतरी रोहित त्याच्याशी वा त्याच्या साथीदाराशी बोलला असल्याची दाट शक्यता चित्रपटसृष्टीशी संबंधित व्यक्तींनी माझ्याशी बोलताना व्यक्त केली. बंगल्यावर गोळ्या झाडल्या असल्याने आता साहजिकच रोहितला पोलीससंरक्षण मिळेल व यामुळे पोलिसांशी घसट वाढवून तो आपल्या चित्रपटासाठी ‘खोटी काडतूसे’ मिळवण्याचा प्रयत्न करेल असेही म्हटले जाते. रोहित यांच्याकडेही स्वतःची सुरक्षा आहे, बाऊंसरही आहेत. त्यांच्याकडे पिस्तुलेही आहेत. तर मग अशा आणीबाणीच्या वेळी त्यांच्याकडून एकही गोळी का सुटली नाही? गोळी सोडणे सोडा, हा प्रकार झाल्यानंतर कुणीही बंगल्याबाहेर आले नाही, पोलीस येईपर्यंत!

“जितनी कसमे थी, सब थी शर्मिंदा

जितने वादे थे सर झूकाये थे” (राहत इंदोरी)

नकळत या ओळी आठवल्या आणि मी स्तब्धच झालो.

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Continue reading

मुंढेंच्या कारवाईविरूद्ध न्यायालयाचे अर्थशून्य ताशेरे! बहोत नाइंसाफी है यह…

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाचे आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून संपूर्ण राज्यभर एकच हलकल्लोळ माजला आहे. भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. औषध नियंत्रण नियमावलीचे पालन न करणाऱ्यांचे तर आता पितळ उघडे पडत आहे. अधूनमधून कारवाईचा दणका बसलेली...

शिवसेनाप्रमुखांची अटक हे पोलीस कर्तव्याचे फलित! संबंध मधुरच!!

पोलीस आयुक्त नियम आणि कायद्याच्या चौकटीतच काम करत असतो, नव्हे त्याला तसे करावेच लागते. म्हणूनच सत्तारूढ राजकीय नेत्यांनी 'आवडता-नावडता' अधिकारी असे शिक्के कुणावरही मारू नयेत, अशी स्पष्टोक्ती मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम. एन. सिंग यांनी येथे केली. ज्येष्ठ पत्रकार...

दिल्ली पोलिसांचे आता ‘बेटी जरा धीरे से’…

अहो, ऐकलं का, दिल्ली पोलीस म्हणे त्यांची 'प्रतिमा' बदलणार! दरवेळेस 'पिछवाडा' काढणारे आता नमस्ते जी.. बोलणार. हे वाचून चकित झालात ना? आम्ही तर थेट चक्रावूनच गेलो. खरंतर विश्वासच बसेना. इतकी वर्षे 'पिछवाडा', 'मादxxx', 'घुसा देंगे', 'दादीके मय्यतमे नहीं आये...
Skip to content