Homeहेल्थ इज वेल्थनितंब, मनगट, कण्यातले...

नितंब, मनगट, कण्यातले फ्रॅक्चर हे ठिसूळ हाडांचे लक्षण

जगभरात जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन साजरा होत असताना, आयुष मंत्रालयाने लाखो लोकांना त्रासदायक ठरणाऱ्या ऑस्टिओपोरोसिसच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी सुरुवातीपासूनच घ्यायची प्रतिबंधात्मक काळजी आणि जीवनशैलीच्या गंभीर गरजेवर भर दिला आहे. हाडांच्या आरोग्याबद्दल आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या आजाराला तोंड देण्यासाठी आयुर्वेद कसे उपयोगी ठरू शकते हे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तज्ज्ञांच्या मते, ऑस्टिओपोरोसिस ही एक हाडे कमकुवत करणारी स्थिती आहे. यात हाडे ठिसूळ बनतात आणि ती तुटण्याची शक्यता वाढते. हाडांची ताकद आणि घनता कमी झाल्यामुळे हा आजार हळूहळू विकसित होतो आणि त्याला अनेकदा “मूक आजार” (सायलंट डिसीज) म्हटले जाते. फ्रॅक्चर होईपर्यंत सहसा याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. बऱ्याच प्रकरणांमध्ये, पहिले लक्षण म्हणजे अनेकदा नितंब, मनगट किंवा पाठीच्या कण्यामध्ये झालेले हाडांचे फ्रॅक्चर. यामुळे वेदना, शरीराच्या स्थितीत बदल उदा. कुबड येणे आणि जखम बरी व्हायला विलंब यासारख्या समस्या उद्भवू शकतात. 

आयुर्वेदानुसार, ऑस्टिओपोरोसिस प्रामुख्याने वात दोषाच्या विकृतीशी संबंधित आहे. त्यामुळे हाडांची ताकद आणि हाडांची घनता कमी होते. त्यात हाडांमधील खनिजांची कमतरता आणि वयानुसार होणारे आणि हाडांच्या आरोग्यावर परिणाम करणारे हार्मोनल बदल ऑस्टिओपोरोसिसला कारणीभूत ठरतात. केंद्रीय आयुर्वेद संशोधन परिषदेचे महासंचालक प्रा. रबीनारायण आचार्य म्हणतात की, ऑस्टिओपोरोसिस सार्वजनिक आरोग्यासमोर वाढते आव्हान आहे, मात्र, आयुर्वेदाच्या प्रतिबंधात्मक उपायांद्वारे त्याचा प्रभावी मुकाबला करणे शक्य आहे. अस्थि सौषिर्य ही शास्त्रीय संकल्पना हाडांच्या ठिसूळपणाच्या आधुनिक समजुतीशी मिळतीजुळती आहे. आयुर्वेदाचा लवकर हस्तक्षेप, संतुलित आहार आणि अनुकूल जीवनशैलीवर असलेला भर मजबूत हाडे आणि निरोगी वृद्धत्वासाठी एक नैसर्गिक मार्ग दाखवतो.

मनगट

केंद्रीय आयुर्वेद संशोधन परिषदेने ऑस्टिओपोरोसिसच्या व्यवस्थापनात लक्ष गुग्गुळ आणि प्रवाळ पिष्टी यांसारख्या आयुर्वेदिक औषधांची वैधता तपासण्यासाठी आणि स्नायूअस्थिजन्य विकारांमध्ये आयुर्वेदाच्या भूमिकेवर ठोस पुरावे निर्माण करण्यासाठी वैज्ञानिक अभ्यास सुरू केला आहे.

हाडे मजबूत ठेवण्याकरीता परिषदेने खालील प्रमुख उपाययोजना अधोरेखित केल्या आहेत:

● रसायन चिकित्सा (कायाकल्प): रसायन सूत्रांचा लवकर अवलंब केल्याने अस्थिसंस्था मजबूत होते आणि वयानुसार होणारी झीज लांबणीवर टाकता येते.

● स्नेहन (उपचारात्मक मालिश): महानारायण तेल, दशमूल तेल, चंदना बला लक्षादी तेल यासारख्या औषधी तेलांचा वापर गहन ऊतींना पोषण देऊन हाडे आणि सांधे यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो.

● औषधी सूत्रीकरण: लक्ष गुग्गुळ, महायोगराज गुग्गुळ, प्रवाळ पिष्टी आणि मुक्ता शुक्ति भस्म यासारख्या शास्त्रीय पारंपरिक आयुर्वेदीय औषधी संयोजनांचा वापर हाडांची ताकद वाढवण्यासाठी आणि बरे होण्यास मदत करण्यासाठी केला जातो.

● वातशामक आहार आणि जीवनशैली: डाळिंब, आंबा आणि द्राक्षे यांसारख्या फळांसह कुलथी (चणा), शुंठी (आले), रसोणा (लसूण), मुंगा (हिरवे मूग) आणि कुष्मांड (राखडा) यांसारखे पदार्थ आहारात समाविष्ट केल्याने हाडांची घनता टिकून राहण्यास मदत होते आणि शरीराला स्फुर्ती मिळते.

● योग आणि सौम्य व्यायाम: विशिष्ट आसने शरीराची लवचिकता वाढवतात. हाडे आणि सांध्यातील रक्ताभिसरण सुधारतात आणि कडकपणा टाळतात.

जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिनानिमित्त आयुष मंत्रालयाने वृद्ध व्यक्तींना आणि रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांना आयुर्वेदिक प्रतिबंधात्मक उपाय, संतुलित आहार आणि सौम्य शारीरिक हालचालींचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. या सर्वांगीण पद्धतींचा दैनंदिन जीवनात समावेश करून, व्यक्ती आपली हाडे मजबूत करू शकतात, अस्थिभंगाचा धोका कमी करू शकतात तसेच निरोगी, अधिक सक्रिय वृद्धत्वाचा मार्ग सुनिश्चित करू शकतात.

अधिक माहितीसाठीः https://ccras.nic.in/wp-content/uploads/2024/06/Osteoporosis.pdf  

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content