Homeटॉप स्टोरीविरोधी पक्षनेतेपदासाठी आदित्य...

विरोधी पक्षनेतेपदासाठी आदित्य ठाकरेंच्या नावावर सरकारी फुल्ली?

महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या दाव्याला सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी सशर्त मान्यता दाखवली असल्याची समजते. आदित्य ठाकरेंऐवजी सुनील प्रभू यांना विरोधी पक्षनेतेपदी बसवत असाल तर आम्ही त्याप्रमाणे निर्णय घेण्यास अनुकूल आहोत. असे सत्ताधाऱ्यांकडून सुचवण्यात आल्याचे समजते. विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय निष्पक्ष समजले जात असलेले विधानसभा अध्यक्ष घेत असलेतरी सत्ताधाऱ्यांकडूनच त्यांची नेमणूक झाल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या कलांनुसारच ते निर्णय करतात, असे जाणकार सांगतात.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतले घटकपक्ष भारतीय जनता पार्टी, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस यांनी घवघवीत यश मिळवले. विरोधी पक्ष म्हणून वावरणाऱ्या महाविकास आघाडीला या निवडणुकीत सपशेल पयश आले. 288 जागांपैकी महायुतीकडे 237 जागा आल्या तर महाविकास आघाडी आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या मिळून 51 जागा निवडून आल्या. यात सर्वात जास्त आमदार शिवसेनेच्या उबाठा गटाचे आहेत. उबाठाने या निवडणुकीत वीस जागा जिंकल्या. त्याखालोखाल काँग्रेसने 16 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने दहा जागा जिंकल्या. विधानसभेमध्ये सर्वात जास्त जागा जिंकणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्षनेतेपद दिले जाते. मात्र कॅबिनेट दर्जाचे हे विरोधी पक्षनेतेपद देण्याची जबाबदारी देण्याचे सर्व अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांकडे आहेत. लोकसभेतल्या संकेतानुसार एकूण सदस्यांच्या दहा टक्के जागा जिंकणाऱ्या पक्षालाच विरोधी पक्षनेतेपदावर दावा करता येतो. त्यानुसार कोणत्यातरी एका विरोधी पक्षाने किमान 28 जागा जिकायला हव्यात. इतक्या जागा कोणालाही जिंकता आलेल्या नाहीत. त्यामुळे लोकसभेचा संकेत येथे वापरला तर कोणत्याही पक्षाला मिळणार नाही. मात्र याबाबतचा निर्णय अध्यक्ष घेऊ शकतात.

ठाकरे

दरम्यान, विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद देण्यासाठी कोणते निकष आहेत का, अशी विचारणा उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानमंडळ सचिवांकडे केली होती. त्यावर त्यांना दिलेल्या उत्तरात तशी कोणतीही कायदेशीर तरतूद करण्यात आलेली नसल्याचे विधानमंडळ सचिवालयने कळवले असल्याचे समजते. त्यामुळे आजच उबाठा गटाकडून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाबाबत दावा केला जाऊ शकतो. काँग्रेसचा या दाव्याला विरोध आहे. काँग्रेसच्या म्हणण्याप्रमाणे सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन त्यांचा विरोधी पक्षनेता कोण असेल याचा निर्णय घ्यावा. मात्र उबाठा यासाठी तयार नाही. तेव्हा जर ठाकरे गटाने या पदावर दावा केला तर विरोधी पक्षनेतेपदासाठी विधान परिषदेत काँग्रेस दावा करेल, कारण विधान परिषदेत काँग्रेसचे संख्याबळ उबाठाच्या संख्याबळापेक्षा जास्त आहे.

शिवसेनेच्या उबाठा गटाने याआधीच आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव शड्डू ठोकून बसले आहेत. आपल्याला अशी संधी मिळणार नाही अशी खात्री वाटल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांनी जाहीर सभेत आपल्याला आपली क्षमता वापरायला मिळत नाही अशी खदखद व्यक्त केली होती. मात्र काल ठाण्यामध्ये झालेल्या उबाठाच्या मेळाव्यात त्यांनी शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवताना त्यांना चोराची अवलाद असे संबोधले. भास्कर जाधव यांची ही बदललेली भूमिका ‘मातोश्री’ला खूश करण्यासाठी होती, असे बोलले जाते. भास्कर जाधव यांचा एकूण आक्रमक स्वभाव लक्षात घेऊन आणि त्यांनी सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली जळजळीत टीका पाहता सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्या नावाला मान्यता मिळण्याची शक्यता कमी आहे.

ठाकरे

त्याचवेळी आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेतेपद देऊ नये असा एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आग्रह आहे. एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरे यांच्या नावाला काहीसे अनुकूल असले तरीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मात्र ठाकरे परिवाराला कडाडून विरोध आहे. तो लक्षात घेऊन ते तशी भूमिका घेण्याची शक्यता फार कमी आहे. मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभू हे उबाठाचे जरी आक्रमक नेते असले तरी ते एक संयमी नेते म्हणून ओळखले जातात. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये विधिमंडळाच्या सभागृहात कशा पद्धतीने भूमिका घेतली पाहिजे हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्याशिवाय ते उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतले आहेत. सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाला सत्ताधाऱ्यांकडून आक्षेप राहणार नाही, असे कळते. मात्र, उबाठा याकरीता तयार आहे की, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content