Homeडेली पल्स‘मॅट’च्या ३३ वर्षांतल्या...

‘मॅट’च्या ३३ वर्षांतल्या पहिल्याच लोक अदालतीत १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) इतिहासात ३३ वर्षांत झालेल्या पहिल्याच लोक अदालतीत तीन प्रकरणात तडजोड झाल्याने १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जलसंधारण विभागाच्या १७१ आणि कृषि विभागाच्या २१८ जागा माजी सैनिकांसाठी आरक्षित होत्या. यामध्ये सर्व जागांसाठी माजी सैनिक उमेदवार मिळू शकले नाही. त्यामुळे लोक अदालतीत तडजोडीनंतर उर्वरीत रिक्त जागा इतर उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आल्या. या निर्णयामुळे १२६ उमेदवारांना शासकीय नोकरी मिळू शकणार आहे. या निर्णयामुळे माजी सैनिकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही.

या लोक अदालतीत ५४२ सेवाविषयक प्रकरणांपैकी १३८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोक अदालतीमध्ये नागपूर, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या तिन्ही खंडपीठातील ५४२ प्रकरणांपैकी १३८ निकाली निघाली. यामध्ये मुंबई खंडपीठाच्या २३८ प्रकरणांपैकी ३९ तर नागपूर खंडपीठाच्या १५० पैकी ६३ आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या १५४ प्रकरणांपैकी ३६ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्यात आला. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण आणि मुंबई उच्च न्यायालय विधि सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोक अदालतीसाठी तीन पॅनल आयोजित करण्यात आले होते. पॅनल प्रमुख म्हणून न्यायमूर्ती विनय जोशी, सेवानिवृत्त सदस्य (न्या.) ए. पी. कुन्हेकर, आर. बी. मलिक यांनी काम पाहिले. नितिन गद्रे (नागपूर), विजयकुमार (औरंगाबाद), विजया चौहान, संदेश तडवी, आर. एम. कोलगे आणि एम.बी. कदम यांनी सदस्य म्हणून काम पाहिले. अदालतीत बरीच वर्षे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची मुख्य सादरकर्ता अधिकारी स्वाती मणचेकर यांनी तपासणी केली.

लोक अदालत यशस्वी करण्यासाठी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागातील सचिव यांच्यासह न्यायाधिकरणामधील सर्व अधिकारी, कर्मचारी, मुख्य सादरकर्ता अधिकारी, न्यायाधिकरण बार असोसिएशनमधील सर्व वकील, शासनाचे सर्व नोडल अधिकारी यांनी सहकार्य केले.  

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content