Homeमाय व्हॉईसऑलिंपिकआधीच भारताने २...

ऑलिंपिकआधीच भारताने २ पदके गमावली!

जगाचं लक्ष वेधून घेणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धा आता होऊ घातल्या आहेत. विश्वात आपली ओळख निर्माण व्हावी यासाठी इथे आटापिटा करणारे खेळाडू आपल्याला पाहण्यास मिळतात. आपल्या अथक मेहनतीने त्या-त्या क्षेत्रात मातब्बर झालेल्या क्रीडापटूंचा खेळ जग पाहतं नि त्याची वाहवाह होत असते. घसघशीत बक्षीसही मिळतं नि महापराक्रमावर मान्यतेची मोहोर उमटते. मात्र, यापासून भारताची गुणी खेळाडू हिमा दास वंचित राहणार आहे. ऐन स्पर्धेपूर्वी तिला दुखापतीला सामोरे जावे लागल्याने एक हक्काचं पदक नि त्याचबरोबर पुढील कारकीर्द याची चिंता तिला लागली असल्यास नवल ते काय?

जूनच्या अखेरीस राष्ट्रीय आंतरराज्य अथेलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात हिमा दुखापतीमुळे 100 मीटरची प्राथमिक शर्यत पूर्ण करू शकली नाही. त्यामुळे ती ऑलिंपिकला मुकणार असा अंदाज वर्तवला गेला. नंतरच्या पुढील दोन शर्यतीत ती सामील होणार नाही हेही स्पष्ट झाले. त्यामुळे क्रीडा क्षेत्रावर नैराश्याचे सावट आले. तिचे वैयक्तिक पदक नि त्याबरोबरच 4 बाय100 मीटर रिले शर्यतीत सहभागी न होणे याने भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.

हिमाचा जन्म आसामच्या नागाव जिल्ह्यातील धिंग जवळील कंधुलिमारी गावात झाला तो 9 जानेवारी 2000 साली! तिचे वडील रणजित आणि आई जोनाली भातशेती करतात. एक सध्या शेतकऱ्याची, चार भावंडातील सर्वात लहान मुलगी. तिनं धिंग पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेण्यास सुरुवात केली. लहान वयातच फुटबॉलची आवड निर्माण झाली नि ती आपल्या शाळेत मुलांबरोबर फुटबॉल खेळू लागली.

तिला फुटबॉलमध्येच कारकीर्द घडवायची होती. पण नियतीच्या मनात तसं नव्हतं. जवाहर नवोदय विद्यालयाच्या शारीरिक शिक्षण प्रशिक्षक श्यामसुल हक यांच्या नजरेत ती आली. त्यांच्या सूचनेवरून हिमाने खेळ बदलला. तिने धावपटू म्हणून प्रशिक्षण घेण्यास प्रारंभ केला. धावण्याच्या वेडाने ती झपाटली.

सुरुवातीला ती लहान नि मध्यम पल्ल्याच्या शर्यतीत भाग घेत असे. हक यांनी तिला नागाव स्पोर्ट्स असोसिएशनच्या गौरीशंकर रॉय यांच्याशी परिचय करून दिला. पुढे काही काळात हिमा आंतरजिल्हा स्पर्धेसाठी पात्र ठरली नि तिने या स्पर्धेत दोन सुवर्णपदकं पटकावली. तिने झेप घेतली ती फिनलँडच्या वर्ल्ड ज्युनिअर अथेलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत. तिथे तिला सुवर्णपदक मिळालं. या स्पर्धेत भाग घेऊन पदक मिळवणारी ती पहिली भारतीय! ते साल होतं जुलै 2018. या 20 वर्षाखालील स्पर्धेत 400 मीटर धावली नि पदक हिसकावून घेतलं ते तगड्या आव्हानात.

भारतीय हाच धर्म नि माणुसकी हीच जात हे बाळकडू बहुधा आईवडिलांकडून मिळालं असल्याने तिचं जिंकणंसुद्धा त्यावेळी तिने आसाम पुरग्रस्तांच्या नावे केलं. ध्येयवेडानं पछाडणं म्हणजे काय असतं हे तिने दाखवून दिलं. थोड्याशा यशाने हुरळून हवेत जाणारे आपण समाजात पाहतोच. अल्प वयात हिमालायाएवढ्या यशानेसुद्धा तिचे पाय जमिनीवरच आहेत. भाताचं शेत हेच मैदान बनवत तिने आपला धावायचा सराव केला तो फाटलेले असे स्वस्तातील स्पाईक शूज घालून. प्रोटिन्स आणि सप्लिमेंट्सच्या जमान्यात तिने आपला पिंड पोसला तो डाळभाताच्या जोरावर! अशा पद्धतीने सराव करणाऱ्या हिमाने फिनलँडमध्ये विक्रम करत हिमालयालाच नव्हे तर आकाशाला गवसणी घातली.

2018च्या क्रिकेट स्पर्धेत भारत हरल्याच्या शोकात मग्न असणाऱ्या देशाला तिची दखल घेण्याची गरज वाटली नाही. ती देशाची हिरो झाली होती. तिची धाव आईवडिलांची मान उंचावणारी नि देशाची शान वाढवणारी असूनही श्रीमंत क्रिकेटवेड्यांचे लक्ष गेले नाही. बॉक्स ऑफिसवर क्रीडा क्षेत्रातील आनंद कुमार यांच्या कारकिर्दीवर आधारित ‘सुपर 30’ धूम गाजत होता. तिच्या मेहनत व चिकाटीला घवघवीत यश प्राप्त झाले. तिने या स्पर्धेत 51.46 सेकंदाची वेळ नोंदवत जगाचा प्रकाशझोत आपल्याकडे वळवला. अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला ठरली. याची नोंद दखल घेत आदीदास या प्रसिद्ध स्पोर्ट्स साहित्य बनवणाऱ्या कंपनीने तिची दखल घेऊन आपला एक ब्रँड तिच्या नावे बाजारात आणला!

या कामगिरीची पावती म्हणून आसाम सरकारने तिच्या भुकेची काळजी घेत पुढील प्रशिक्षण सुरळीत व्हावे म्हणून पोलीस दलात उपअधीक्षक पदाची नोकरी देऊ केली. काही महिन्यांपूर्वी तेव्हाचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी तिला नियुक्तीपत्र दिले. राज्य शासनाचे उच्चपदस्थ अधिकारी, पोलीस महासंचालकासह वरिष्ठ पोलीस अधिकारी या समारंभाला उपस्थित होते. आपले बालपणीचे स्वप्न साकार झाले असे स्टार स्प्रिंटर हिमा दास यावेळी म्हणाली. देशातील जास्तीतजास्त तरुण-तरुणींनी प्रत्येक क्षेत्रात जिद्द दाखवून हिमाचा आदर्श घेण्याची गरज आहे.

ऑलिंपिक

दत्तू भोकनळचा बळी?

आपल्या असामान्य कर्तृत्वाने अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरलेला महाराष्ट्राचा दत्तू भोकनळ खेळातील राजकारणाचा बळी ठरला नि त्याला सराव करण्यास न मिळाल्यानं तो ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकला नसल्याचे वृत्त आहे. देशाच्या खेळ प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या जनतेला क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, कॅरम, खो खो, या अशा ठराविक क्रीडा प्रकाराशिवाय इतर खेळांची फारशी माहिती ठेवण्याची इच्छा नसते. आयपीएलमध्ये कोणत्या देशाचा खेळाडू कसा खेळला, किती पैसा याची इत्यंभूत माहिती मात्र आवर्जून ठेवतात!

अत्यंत गरीब कुटुंबातील नि कष्टकरी वर्गाचे प्रतिनिधित्व करणारा हा चांगल्या शरीरयष्टीचा नाशिकचा तरुण आर्मीत दाखल झाला नि इथेच त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. 21व्या वर्षी नोकरी मिळाल्यावर ज्याची फारशी माहिती नाही त्या रोइंग खेळाशी त्याची नाळ जुळली. प्रचंड मेहनतीच्या या खेळात शारीरिक मानसिकदृष्ट्या खमके असावे लागते. त्यात कोचच्या सल्ल्याने जाणाऱ्या दत्तूने पाच आंतरराष्ट्रीय पदके मिळवली. ऑलिम्पिक पात्रता फेरीत रौप्यपदक मिळवणाऱ्या दत्तूचा प्रवास संघर्षमय असाच होता. अशा या राज्याच्या खेळाडूला वरिष्ठ अधिकारी वर्गाचा त्रास झाला नि त्याला ऑलिंपिकला मुकावे लागले.

किमान 17 पदकांचा अंदाज!

जगात सध्या 135 कोटी लोकसंख्येचा देश म्हणून भारताचा हिंदुस्थानचा लौकिक आहे. तुलनेत गतकाळात डोकावता हॉकी सोडल्यास चमकदार कामगिरी फारशी दिसली नाही. कुस्ती, नेमबाजी, कबड्डी ही गेल्या काही वर्षातील पदककमाईची स्थानं. यंदाच्या स्पर्धेत 228 सदस्य सहभागी असले तरी त्यात 124 अथेलेटिक स्पर्धेतील असून 69 पुरुष नि 55 महिलांचा यात समावेश आहे. हे सर्व जण 85 पदकासाठी झुंज देतील.

यंदाच्या टोकियो स्पर्धेत भारतीय खेळाडू 17 पदकं मिळवतील असा अंदाज आहे. ग्रेसनोट या जागतिक स्पोर्ट्स डेटा कंपनीनुसार नेमबाजीत 8 पदके, बॉक्सिंगमध्ये 4, कुस्तीत 3, वेटलिफ्टिंग आणि आर्चरी तिरंदाजीत प्रत्येकी एक पदक मिळेल. यात 4 सुवर्ण, 5 रौप्य, 8 कांस्य पदकांचा समावेश असेल. जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारताचा पदक तालिकेत 53वा क्रमांक आहे. मागील लंडन ऑलिम्पिकपेक्षा जास्त चमकदार कामगिरी होईल असे हा अहवाल सांगतो.

गेल्याच मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंबरोबर ऑनलाईन संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या. आपणही या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊया. यात कंजुशी कशाला, नाही का? जय हिंद!

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...
Skip to content