मराठा आरक्षणाच्या विषयावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात विधानसभेत आज, मंगळवारी रात्री खडाजंगी झाली. मंत्रिमंडळातून राजीनामा द्या आणि मग काय बोलायचे ते बोला, असे चव्हाण यांनी भुजबळ यांना सुनावले. त्यावर मंत्र्याला हृदय नसते का, असे विचारत एका समाजाचे काही म्हणणे असते तेव्हा दुसऱ्या समाजाचेही काही म्हणणे असते, याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले.
राज्य सरकार आरक्षणप्रश्नी मार्ग काढायची भाषा करत असताना एक मंत्री बाहेर काही विधान करतात आणि तेढ निर्माण करतात, हे योग्य आहे का, असा सवाल चव्हाण यांनी केला. मराठा आरक्षणावरील चर्चेदरम्यान त्यांनी हा सवाल केला. तुम्ही समाजामध्ये भाषणे करून तेढ निर्माण करत असाल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलवून समजावून सांगावे. नाही तर समाजासमाजामध्ये भांडणे लावायची हा आपला राजकीय डाव असल्याचेच दिसेल, असेही चव्हाण म्हणाले.

त्यावर भुजबळ यांनी उठून स्पष्ट केले की, अख्खे बीड पेटल्यानंतर, दोन आमदारांची घरे पेटल्यानंतर तुमचं आमचं प्रत्येकाचं काम होतं तेथे जाऊन बघायचं. मी बघायला गेलो आणि पाहिल्यानंतर स्वतःला रोखू शकलो नाही. दोन महिने सतत ऐकत होतो आणि चूक ते चूक, हे सांगणे अयोग्य आहे का?
त्यावर चव्हाण म्हणाले की, मनोज जरांगे पाटील चुकीचे बोलत असतील तर मुख्यमंत्री कारवाई करू शकतात. मंत्रिमंडळाची शपथ घेता तेव्हा आपल्यावर जबाबदारी असते. तुम्ही मंत्रिमंडळाच्या बाहेर जाऊन काय करायचे ते करा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कायदा-सुव्यवस्था राखायला सक्षम आहेत आणि तेढ निर्माण करू नका, ही हात जोडून विनंती आहे.

