Saturday, December 21, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजमुथय्या मुरलीधरनने उलगडला...

मुथय्या मुरलीधरनने उलगडला आपल्या क्रिकेटचा प्रवास!

54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) झालेल्या संवाद सत्रात ‘अ लीजंडरी 800 – अगेन्स्ट ऑल ऑड्स’ या चित्रपटात श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन याची भूमिका साकारणारा अभिनेता मधुर मित्तल मुरलीधरनसोबत सहभागी झाला. मुरलीधरनचा चरित्रपट असलेला हा चित्रपट, या महोत्सवाचा एक महत्त्वाचा आकर्षण बिंदू ठरला.

कोमल नहाटा यांनी सूत्रसंचालन केलेल्या या सत्रात, मुरलीच्या, स्वतः कुणीही नसल्यापासून ते दिग्गज क्रिकेटपटू बनण्यापर्यंतच्या प्रवासाबाबत गहन चिंतन करण्यात आले.

श्रीलंकेतील युद्ध आणि अस्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर सुरू झालेली आणि क्रिकेटमधील दिग्गज व्यक्तीमत्व बनण्यासाठी सर्व प्रतिकुलतेवर मात करतानाची आपली रोमहर्षक कथा सांगताना मुरली म्हणाला, त्या सर्व धकाधकीच्या काळात क्रिकेट हा माझ्यासाठी विसावा होता. आपल्या बालपणीच्या स्वप्नांच्या आठवणींना उजाळा देताना त्याने सांगितले की, देशाचे प्रतिनिधित्व करणे तर सोडाच, स्वतःच्या शाळेसाठी खेळण्याचे स्वप्नदेखील त्याने कधी बाळगले नव्हते. 

आपल्या आयुष्यावर आधारित आगामी चरित्रपटावर चर्चा करताना, मुरलीने सत्यकथनाच्या महत्त्वावर जोर दिला. हे उदात्तीकरण नाही तर वस्तुस्थिती आहे, असे त्याने ठामपणे सांगितले. चित्रपटाची कथा, त्याने झेललेला संघर्ष आणि त्यावर मिळवलेल्या विजयाशी प्रामाणिक राहावी याकरता, चित्रपट संहितेची आपण अनेक वेळा बारकाईने पारायणे केली, असे तो म्हणाला. 

1995मध्ये ऑस्ट्रेलियात त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवरून निर्माण झालेल्या चकिंग कॉन्ट्रोव्हर्सी अर्थात फेकी गोलंदाजीच्या आरोपांवरून निर्माण झालेल्या वादाबद्दल बोलताना मुरलीने दावा केला की, त्याला पुढे जाऊ न देण्यासाठी हे सर्व हेतुपुरस्सर केले गेले होते. तो म्हणाला, हे सर्व दुःखदायी होते, मात्र मी हार मानली नाही आणि माझे सहकारी तसेच क्रिकेट मंडळाच्या सक्रीय पाठिंब्याच्या आधारावर पुढे पुढे जात राहिलो.

आपल्या क्रिकेट जीवनातील चढ-उतार आणि संघर्षाबाबत बोलताना मुरलीने सांगितले की श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर पाकिस्तानात झालेला हल्ला ही त्याच्या क्रिकेट इतिहासातील सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना होती.

समाजोपयोगी कार्यासाठी मुरली, फाउंडेशन ऑफ गुडनेस ही सेवाभावी संस्था चालवत आहे. ही संस्था, सीनिगामा प्रदेशाच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे आणि मुलांच्या गरजा, शिक्षण आणि प्रशिक्षण, आरोग्य सेवा आणि मानसिक-सामाजिक पाठबळ, गृहनिर्माण, उपजीविका, खेळ आणि पर्यावरण यासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून स्थानिक समाजाला मदत करते.

चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीपती एम म्हणाले की हा चित्रपट केवळ एका सेलिब्रिटी क्रिकेटरचे चित्रण नसून, मुरलीधरन यांच्या असामान्य जीवनाला आकार देणार्‍या थरारक घटना आणि संघर्ष हा चित्रपट सांगतो. चित्रपटाचा उद्देश या दिग्गज व्यक्तिमत्वाचा जीवन पट उलगडणे हा आहे, ज्याचा प्रवास मैदानाबाहेरही तेवढाच नाट्यमय होता, त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, बायोपिक (व्यक्तिचित्रण) करण्यासाठी विशिष्ट ढाचा अथवा पटकथेच्या ऐवजी आम्हाला एक सत्यकथा बनवायची होती, ज्याचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन उलगडणे खूप नाट्यमय आहे.

चित्रपटात मुरली यांची भूमिका साकारणारा मधुर मित्तल म्हणाला, हा चित्रपट एखाद्या क्रीडापटा पेक्षा अधिक काही सांगतो. ही एका माणसाच्या नाट्यमय जीवनाची कथा आहे, जी एका महान खेळाडूची लवचिकता सांगते, जो कल्पनेपेक्षा अधिक कणखर आहे.

वयाच्या सातव्या वर्षी कहीं प्यार ना हो जाए चित्रपटातील भूमिका ते मुरली यांची भूमिका साकारण्यापर्यंतच्या आपल्या अभिनय प्रवासाबद्दल बोलताना मधुर म्हणाला की, बायोपिकमध्ये एका दिग्गज क्रिकेटरची भूमिका करणे खूप रोमांचक आणि सन्मानाची गोष्ट होती. मधुर म्हणाला, फिरकी गोलंदाजीमधल्या जादूगाराच्या गोलंदाजीचे अनुकरण करण्यासाठी, आणि  मुरली यांचा सन्मान करण्यासाठी मी दोन महिने गोलंदाजी प्रशिक्षकाबरोबर सराव केला.

प्रत्येक कसोटी सामन्यात सरासरी सहा बळी घेणारा, मुरलीधरनला खेळाच्या इतिहासातील महान गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळखले जाते. कसोटी सामन्यांमध्ये 800 बळी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 530हून अधिक विकेट घेणारा हा एकमेव गोलंदाज आहे. 1996 चा क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या श्रीलंकेच्या संघात त्यांचा समावेश होता. 

Continue reading

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...

सन्मित्र क्रीडा मंडळ अजिंक्य

मुंबईत कांदिवली येथे झालेल्या मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या ४२व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागाच्या द्वितीय श्रेणी पुरुष गटात सन्मित्र क्रीडा मंडळ, घाटकोपरने जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सन्मित्रने साई स्पोर्ट्स क्लब, भांडूप यांच्यावर ७ गुणांनी विजय मिळवला. सन्मित्र...
Skip to content