गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी जाणाऱ्या नागरिकांनी ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ आदी प्रजातींच्या माशांपासून सावध राहवे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
या माशांच्या वावरासंदर्भात मुंबई महापालिकेच्या वतीने मत्स्यव्यवसाय विभागाला विचारणा करण्यात आली होती. त्यानुसार, मत्स्यव्यवसाय विभागाने गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान मुंबईच्या समुद्रात ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर असतो आणि नागरिकांना मत्स्यदंश होऊ शकतो. यापासून बचावासाठी उपाययोजना करावी, अशी माहिती त्यांनी पालिकेला दिली. त्यानंतर या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना पालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिल्या. त्यानंतर गणेश विसर्जनादरम्यान ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांच्या दंशापासून बचाव तसेच घ्यावयाच्या काळजीसंदर्भात पालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यासोबतच गणेशमूर्ती विसर्जनस्थळी समन्वयात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश ‘डी’, ‘जी उत्तर’, ‘के पश्चिम’, ‘पी उत्तर’ आणि ‘आर मध्य’ या विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आले आहेत.
मुंबई येथील किनारपट्टी ही एक संरक्षित किनारपट्टी असून या किनारपट्टीला वेगवान पाण्याचा प्रवाह नाही. त्यामुळे जेलीफिशसारख्या जलचरांसाठी येथे मुबलक प्रमाणात प्लवंगसदृश खाद्य तयार होते. त्यामुळे या कालावधीत ‘ब्ल्यू बटन जेली’सारख्या जलचरांचे संगोपन व संवर्धन होते. याबरोबर सर्व किनारपट्टीवर कमी पाण्याचा प्रवाह किंवा संरक्षितपणा असल्यामुळे या किनारपट्टीच्या वालुकामय क्षेत्रामध्ये ‘स्टींग रे’ (पाकट) याचेही संवर्धन व संगोपन होत असते. त्यामुळे मुंबईकर नागरिक व पर्यटक यांनी समुद्रकिनारी जाताना पालिकेतर्फे देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अतिरिक्त पालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून जारी मार्गदर्शक सूचना
१) गणेश विसर्जन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेमणूक करण्यात आलेल्या जीवरक्षक व यंत्रणेमार्फत करावे.
२) गणेश विसर्जनादरम्यान गणेश भक्तांनी उघड्या अंगाने समुद्रात प्रवेश करू नये.
३) पायाला मत्स्यदंश होऊ नये म्हणून गमबुटांचा वापर करावा.
४) नागरिकांच्या जनजागृतीसाठी पालिकेच्या वतीने चौपाट्यांवर लावण्यात आलेल्या सूचनाफलकांवरील सूचना तसेच उद्घोषकांद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी कटाक्षाने पालन करावे.
५) लहान मुलांना पाण्यामध्ये जाऊ न देण्याची खबरदारी घ्यावी.
मत्स्यदंश आणि प्रथमोपचार
मस्त्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच एक १०८ रूग्णवाहिका काही ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. याशिवाय, नागरिकांनी पुढील काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी केले आहे.
१) ‘स्टींग रे’ने दंश केलेल्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.
२) ‘स्टींग रे’ किंवा ‘जेली फिश’चा दंश झाल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तत्काळ नजीकच्या प्रथमोपचार केंद्रात किंवा रूग्णालयात जाऊन प्रथमोपचार घ्यावेत.
३) जेलीफिशचा दंश झालेले स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाकावे.
४) जखम चोळली किंवा चोळून चिघळली जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
५) मत्स्यदंश झालेली जखम स्वच्छ पाण्याने धुऊन काढावी.
६) जखम झालेल्या जागी बर्फ लावावा.
यंदा २७२९ सार्वजनिक गणेश मंडळांना उत्सवाची परवानगी
यंदा १८ सप्टेंबरपर्यंत परवानगीसाठी एकूण ३,७६७ अर्ज आले. त्यात ६६५ अर्ज दुबार होते. ३३० अर्ज सहायक अभियंता परिरक्षण यांच्यामार्फत नाकारण्यात आले. वाहतूक पोलिसांनी २६ अर्ज नाकारले. स्थानिक पोलिसांनी ११ अर्ज नाकारले. सहायक आयुक्तांनी सहा अर्ज नाकारले. त्यामुळे एकूण ३७३ अर्ज नाकारले गेले. परिणामी २७२९ अर्ज मंजूर करण्यात आले.

