Homeटॉप स्टोरीकेंद्राकडून सापत्न वागणुकीचा...

केंद्राकडून सापत्न वागणुकीचा सरकारचा आरोप बिनबुडाचा?

राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना केंद्र सरकारकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा राज्य सरकारचा आरोप बिनबुडाचा असल्याचे आज या सरकारचे कर्तेधर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच अप्रत्यक्षपणे मान्य केले.

समाजमाध्यमाद्वारे केलेल्या संबोधनात पवार म्हणाले की, राज्यातल्या वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी, या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कठोर पावले टाकायची आवश्यकता आहे. राज्य सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारसुद्धा राज्याला मदत करण्यासाठी पूर्णपणे सहकार्याची भूमिका घेत आहे. कालच देशाच्या आरोग्य मंत्र्यांशी आपण  संपर्क साधला. ज्या कमतरता आहे याबाबत चर्चा केली. त्यांनी या सर्व संकटात केंद्र सरकार व आरोग्य खाते पूर्ण शक्तीने सर्व राज्यांच्या पाठीशी आहे, महाराष्ट्रातील सरकारच्याही पाठिशी आहे, असे सांगितले. त्यामुळे त्यांची मदत व आपल्या सर्वांचा सामूहिक प्रयत्न यातून मार्ग काढायचा आहे.

कोरोनाची राज्यातील गंभीर व भयावह स्थिती लक्षात घेता या स्थितीला धैर्याने, सामूहिकपणाने आपण सामोरे गेलेच पाहिजे. आता त्याला पर्याय राहिलेला नाही. समाजातील सर्व घटकांना, कष्टकरी, शेतकरी, व्यापारी व अन्य घटकांना विनंती आहे की, आपणाला वास्तव नाकारून चालणार नाही. जनतेच्या जीवितासाठी, सुरक्षिततेसाठी राज्य सरकारला अपरिहार्य निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

यावेळी शरद पवार यांनी गेल्यावर्षी आणि यावर्षीची कोरोनाची सद्यस्थितीतील आकडेवारी राज्यातील जनतेसमोर मांडली. एवढी गंभीर व भयावह स्थिती यापूर्वी देशातील कुठल्याही राज्यात कधी नव्हती. सक्रिय रुग्णांची संख्या वाढत आहे ही चिंताजनक बाब आहे असेही शरद पवार म्हणाले.

राज्यातील आरोग्य यंत्रणेचे सगळे घटक अहोरात्र कष्ट करत आहेत. अहोरात्र कष्ट करुन ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. रुग्णांसाठी बेड्स, वैद्यकीय उपकरणे आणि इतर पायाभूत सुविधा यांचादेखील प्रचंड ताण आलेला आहे. त्यामुळे नाईलाजाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार राज्यसरकारला कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत. आता पर्याय राहिलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

बंधने आणली की साहजिकच अस्वस्थता येते. शेतकरी, कामगार, नोकरदार, हमाल, व्यापारी, व्यावसायिक, कष्टकरी अशा समाजातील प्रत्येक घटकांना या संकटामुळे फार मोठी झळ बसली आहे. व्यवसाय, दुकाने बंद झाल्याने व्यापारी वर्गाचे नुकसान झाले आहे. फळभाज्यासारख्या नाशवंत शेतीमाल तयार करणार्‍या शेतकऱ्याला आपल्या मालाचे करायचे काय? विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीवर्गाचेदेखील अपरिमित नुकसान होत आहे. या सगळ्यातून पुढे जात आहोत. परंतु पुढे जात असताना यातून यशाचा मार्ग काढायचा असेल, यश सिध्दीला न्यायचं असेल तर या सगळ्या स्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. असेही शरद पवार म्हणाले.

या परिस्थितीला सामोरे जात असताना जे काही मार्गदर्शन, ज्या काही उपाययोजना यासंबंधीच्या सूचना आलेल्या आहेत. त्या नजरेसमोर ठेवून आपल्याला निर्णय घ्यावे लागत आहेत. हे निर्णय राबवण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य मनापासून मिळण्याची नितांत आवश्यकता आहे. त्याकरिता आपल्या सगळ्यांना विनंती आहे की, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, विचार करुन या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारचे जे प्रयत्न आहेत, त्यांना आपल्या सगळ्यांचे सहकार्य मिळाले पाहिजे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस व सगळे घटक अशा संकटाच्या काळात बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पूर्ण एकजुटीने यंत्रणेला सहकार्य करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Continue reading

शिवसेना खटलाः विधिमंडळ पक्षापेक्षा राजकीय पक्षाचेच वर्चस्व!

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी तब्बल तीन तास जोरदार युक्तीवाद करत, विधानसभा...

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...
Skip to content