मुंबईतल्या बोरीवली येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेने मला दिलेला ‘शारदा’ पुरस्कार हा माझ्या लोककलेचा गौरव म्हणावा लागेल. या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे, अशा शब्दांत लोककलेचे गाढे अभ्यासक, मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक विजय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चाळीस वर्षांपासून जय महाराष्ट्र नगर येथे वसंत व्याख्यानमाला सुरू असून यंदाच्या ४१व्या वर्षी प्रथेप्रमाणे लोककलेचे गाढे अभ्यासक डॉ. गणेश चंदनशिवे यांना ‘शारदा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे माजी अध्यक्ष विनोद घोसाळकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. चंदनशिवे यांनी संयुक्त महाराष्ट्र लढा शाहिरांनी गाजविल्याचे सांगितले. शाहीर आत्माराम पाटील यांचा पोवाडा खड्या आवाजात गाऊन रसिक श्रोत्यांना या ज्वालाग्राही चळवळीची आठवण त्यांनी करून दिली. वसंत बापट, मधुसूदन कालेलकर, विद्याधर गोखले, कुमार गंधर्व, शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रख्यात गायक श्रीरंग भावे, केतकी भावे जोशी यांनी ‘शत स्मरण’ या कार्यक्रमाद्वारे या महाराष्ट्राच्या महान सुपुत्रांना सांगितिक आदरांजली वाहिली. श्रेयसी मंत्रवादी यांनी अत्यंत समयोचित आणि समर्पक असे निवेदन केले. सचिन वगळ यांनी मानपत्राचे वाचन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्याख्यानमालेच्या आयोजक प्रा. नयना रेगे यांनी केले.

