Homeपब्लिक फिगरलव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी...

लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायदा करा!

महाराष्ट्रातल्या गोरगरीब तरुण मुलींचे आयुष्य खराब करणाऱ्या लव्ह जिहाद तसेच धर्मांतराला बंदी घालणारा सक्षम कायदा महाराष्ट्र सरकारने तयार करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत केली.

अर्थसंकल्पावरील विभागवार चर्चेत महिला आणि बाल विकास विभागावर ते बोलत होते.  महाराष्ट्र सरकारने स्तुत्य पाऊल उचलत लेक लाडकी, ही योजना आणली आहे. अत्यंत चांगली योजना आहे. जन्मापासून 18 वर्षांपर्यंत मुलीला आर्थिकदृष्ट्या मदत होण्यासाठी अत्यंत उपयोगी असलेली अशी ही योजना आहे. घरात मुलगी होते, त्यामुळे एक आनंदाचे वातावरण तयार होते. पण अठरा वर्षानंतर समाजामध्ये या मुली जेव्हा वावरतात तेव्हा त्यांच्याकडे लव्ह जिहाद तसेच धर्मांतर करणाऱ्या लोकांकडून वाकड्या नजरेने पाहिले जाते हे वाईट आहे आणि यावरच आता विचार करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात लाखाहून जास्त लोकांचे हिंदू आक्रोश मोर्चा निघत आहेत. कशासाठी? लव्ह जिहाद तसेच धर्मांतर विरोधात कायदा या राज्यात तयार व्हावा याकरीता हे मोर्चे काढले जात आहेत. आज समाजामध्ये या मुली वावरत असताना कोणी त्यांच्या विरोधामध्ये षडयंत्र रचत असेल, या कोवळ्या मुलींचे आयुष्य खराब करत असेल तर आम्हाला गप्प बसून राहता येणार नाही. एकेठिकाणी मुलींसाठी चांगल्या योजना आणायच्या आणि त्याच वेळेला समाजामध्ये दुसरीकडे लव्ह जिहादसारखी कीड आपण चालू ठेवायची हे योग्य नाही. आज लहान मुलींची लग्ने करतात. लग्न करताय, करा… पण धर्मांतराची गरज काय? महाराष्ट्र सरकारने यासाठी एक इंटरफेस मॅरेज कमिटी नेमली आहे. या कमिटीवरपण काही जणांनी टीका केली. कोणीही कोणाशी लग्न करू शकते, त्याला तसा अधिकार आहे, त्यांना असे रोखणे योग्य नाही, असे हे लोक म्हणत आहेत. आम्ही कुठे म्हणतो की कोणी कोणाशी लग्न करू नये… कोणी कोणाशीही लग्न करावे, पण त्यांचे आयुष्य खराब होत असेल, या मुलींचे आयुष्य अंधारात टाकले जात असेल तर ते टाकले जाता कामा नये. खोटे बोलून लग्न करायचे, नंतर धर्मबदल करण्यासाठी सक्ती करायची. तसे ऐकलं नाही तर तुला आणि तुझ्या मुलांना घराबाहेर काढले जाईल असं धमकवायचं, हे सगळं चालून घेतलं जाणार नाही, असेही राणे म्हणाले.

लव्ह जिहादचे बळी ठरलेल्या मुलींची संख्या किती, असा प्रश्न विचारला जातो. तो काही लाखांमध्ये आहे का? काही हजारांमध्ये आहे का, असे विचारले जाते. माझे म्हणणे तर असे आहे की, एका मुलीचे आयुष्य जरी खराब होत असेल तरीसुद्धा ते होऊ देता कामा नये. मी अशा दहा ते पंधरा पीडित मुलींना भेटलो आहे. त्यांच्याबरोबर अर्धा तास, एक-एक तास बसून या भगिनींची कर्मकहाणी ऐकलेली आहे. नागपूरमध्ये एका भगिनीला मी भेटलो. ती एका मुलाच्या प्रेमात पडली आणि तिने लग्न केलं. नाव बदललं. धर्म बदलला. आता तिला तिच्या देवी-देवतांना नमस्कार करू नये म्हणूनही सक्ती केली जाते. आता लव्ह जिहाद, धर्मांतरासाठी सौदी अरेबियाकडून, लष्करी तोयबासारख्या संघटनांकडून अर्थसहाय्य केलं जातं. देशाबाहेर न्यायचे, त्यांना विकायचे, हे असं मोठे षडयंत्र आहे. उल्हासनगरला मी एका भगिनीला भेटलो. रात्री आईबरोबर तिची मुलगी जेवली आणि दुसऱ्या दिवशी ती एका मुलाबरोबर पळाली. लग्न केलं. आईने संपर्क साधला तर ती ओळख दाखवायला तयार नाही. यामागे कारण एकच… अशा मुलींना ड्रग्ज दिले जातात, हिप्नोटाइज केले जाते. आज उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये धर्मांतर घडवण्यासाठी कोणी धजावत नाही. यामागचं कारण काय? तर तेथे लव्ह जिहाद, धर्मांतराविरोधात सक्षम असा कायदा आहे. महाराष्ट्रातही असा सक्षम कायदा लवकरात लवकर तयार करण्यात यावा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

अफझल शेखला एमपीडीए लावा

त्याआधी सकाळच्या सत्रात नितेश राणे यांनी लव्ह जिहाद विषयाशी संबंधित असलेल्या एका लक्षवेधी सूचनेवर चर्चा केली. नगर जिल्ह्यातील रामवाडी परिसरातील एका बहुसंख्य समाजावर एका विशिष्ट समाजाकडून अत्याचार होणे, त्यांना पलायन करण्यास भाग पाडणे, रामवाडीचे नाव हिमायतनगर करण्याचा प्रयत्न करणे, औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज झाल्यानंतर तसे व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवल्याबद्दल मारहाण करणाऱ्या आणि तोडफोड करणाऱ्या अफजल शेख नावाच्या आरोपीला स्थानिक पोलीस सहकार्य करत असल्यासंदर्भात ही लक्षवेधी सूचना होती.

यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, आम्ही कोकणामध्ये आता आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याच्या पेट्या बांधतो. पण एखादा आंबा जरी त्यात सडका निघाला तर संपूर्ण पेटी खराब होते, तसा हा प्रकार आहे. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण झाल्यानंतर बहुसंख्य समाजाच्या एका व्यक्तीने व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवले तर याबद्दल शेखने त्याच्या घरी घुसून त्याला अमानुष मारहाण केली. त्याच्या बहिणीचा विनयभंग केला. देवी-देवतांचे फोटो फोडले. परंतु तेथील पोलीस तसे काही घडलेच नाही अशी भूमिका घेत आहेत.

या अफजलच्या घरी टीव्हीवर सतत पाकिस्तानी चॅनेल लावले जातात. त्याच्या गाडीचा नंबर आहे 2611सारखा 2612. तो सातत्याने दहशतीचा संदेश या परिसरात देण्याचा प्रयत्न करतो. या प्रकरणात त्याला अंतरिम अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पोलिसांकडून पुरेसा वेळ देण्यात आला. अशा या पोलीस निरीक्षकावर तसेच पोलीस अधीक्षकांवर कारवाई करावी, त्याचप्रमाणे या अफजल शेखवर एमपीडीएखाली कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी या लक्षवेधी सूचनेच्या रचनेवर तसेच या लक्षवेधी सूचनेवर आक्षेप घेतला. अशी लक्षवेधी स्वीकारता कामा नये असा त्यांचा आग्रह होता. यावेळी नितेश राणे तसेच भाजपा व शिवसेनेचे आमदार थोरात यांच्या विरोधात घोषणाबाजी करू लागले. त्याचवेळी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही लक्षवेधी अध्यक्षांनी स्वीकारली आहे आणि ती स्वीकारणे योग्य आहे म्हणूनच स्वीकारली असावी, असे स्पष्ट केले.

या लक्षवेधीत म्हटल्याप्रमाणे अफजल याने जो हल्ला केला आहे तो जीवघेणा हल्ला आहे. कलम 307 खाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मरहाणीच्या स्पष्ट खुणा दिसत असतानासुद्धा पोलिसांनी त्याला अटकपूर्व जामीन कसा मिळू दिला, हे आश्चर्यकारक आहे. लघु न्यायालयाकडून शक्यतो अशा प्रकरणात अटकपूर्व जामीन दिला जात नाही. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातच तसा जामीन मिळतो. त्यामुळे यावर आता अधिक चर्चा न करता या संपूर्ण प्रकरणाची फेरतपासणी केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्र्यांनी केली.

संजय गायकवाड यांचीही मागणी

दरम्यान, अर्थसंकल्पावरील विभागवार चर्चेत बोलताना शिवसेनेचे सदस्य संजय गायकवाड यांनी राज्यात लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्याची मागणी केली. मी स्वतः अशा २५०हून जास्त मुलीची सुटका केली आहे. काही लोक याला प्रेमाची उपमा देतात. पण चार-चार लग्ने करणारा माणूस प्रेम करत नाही, बायकेची हत्त्या करत नाही. हे सर्व प्रकार तातडीने थांबविले जाणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

Continue reading

पुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मोदी सरकारची मंजुरी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने काल दिल्लीत झालेल्या एका बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र. 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र....

ठाण्यात २ ते ४ डिसेंबरमध्ये रंगणार विभागीय खो-खोचा महासंग्राम

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे यांच्या आयोजनाखाली, श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त जे. पी. कोळी यांच्या स्मरणार्थ निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन येत्या २ ते ४ डिसेंबरदरम्यान ठाण्यातल्या युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर...

एकीकृत पेन्शन योजनेच्या पर्यायासाठी उरले फक्त ४ दिवस

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025. रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे (एफएक्स-1/3/2024-पीआर) पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना स्वीकारण्याच्या पर्यायाबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे. यासाठी पात्र कर्मचारी आणि एनपीएस सदस्यांना सीआरए प्रणालीद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोडल अधिकाऱ्यांकडे विनंती दाखल...
Skip to content