अविनाश भोसले मुंबई पुण्यातले मोठे नाव. सर्व राजकीय पक्षांशी लागेबांधे.. अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार, काँग्रेस नेत्यांचे तर पाव्हणेच!! गोपीनाथ मुंडे यांची करंगळी पकडून पहिला राजकीय धडा गिरवला. राजकीय धडे गिरवता गिरवता राजकीय नेत्यांच्या गळ्यातील ताईत कधी झाले ते आता भोसले यांनाही आठवणार नाही. युतीच्या पहिल्या राजवटीत पुण्यात असा काही जम बसवला की सभ्य पुणे आणि गुन्हेगारी जगताचे पुणे त्यांच्या खिशात कसे आले ते अजूनही भल्याभल्यांना समजलेले नाही.
राजकीय नेत्यांच्या गळ्यातील ताईत होऊन एका मर्यादेत होणारा फायदा नोकरशाहीलाही खिशात ठेवले तर ‘पांचो उंगलिया घी में..’ हे पक्के ओळखल्याने मंत्रालयातील अनेक नोकरशहा त्याच्या जेवणाच्या टेबलावर जाऊन कधी बसले हे नोकरशाहीच्या लक्षातच आले नाही. अविनाश भोसले यांनी फोन करावा आणि मंत्रालयातील फाईल हवी तिथे फिरवावी, इतका दरारा या माणसाने निर्माण केला होता. मंत्रालयात आणि राजकीय वर्तुळात ते ए बी, या आद्याक्षरानेच ओळखले जात असत. मुंबई, ठाण्यातील अनेक यशस्वी राजकीय नेत्यांप्रमाणेच त्यांचाही प्रवास रिक्षा चालवूनच सुरू झाला, हा एक विचित्र योगायोग समजावा…
“चारित्र्य टांगण्यासाठी
सत्तेचीच करावी खुंटी,
मग सोडावी लंगोटी
निर्भयपणे..
विद्वानांची फौज लाचार
करील बुद्धीवादी प्रचार..”
या उदास बोधातील वचनाप्रमाणे त्यांची कीर्ती भारतवर्षात पोहोचली. अशा या सर्वगुणसंपन्न अविनाश भोसलेंना केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सीबीआयने अटक केली व त्यांची रवानगी सीबीआय कोठडीत केली.
खरेतर गेल्या काही महिन्यांपासून भोसले केंद्रीय तपासयंत्रणांच्या रडारवर होतेच. भोसले यांनी बरोबर सव्वा वर्षापूर्वी मुंबईच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांकडे इडी, या तपासयंत्रणेतील एका दादा असलेल्या दलालाची म्हणजे जितेंद्र चंद्रलाल नवलानी यांच्याविरूध्द सुमारे आठ पानांची जोरदार तक्रार केली होती. ही तक्रार केवळ जोरदार नाही तर जणू बॉम्बच आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. या लिखित तक्रारीत इडी तपासयंत्रणा आणि नवलानी यांची कुंडलीच मांडण्यात आलेली आहे. जितेंद्र नावलानी हा इडीचा सेटलमेंट एजेंट असल्याचा गंभीर आरोप या पत्रात भोसले यांनी केला आहे.

भोसले केवळ आरोप करूनच थांबलेले नाहीत तर तब्बल 70 व्यक्ती व कंपन्यांकडून सुमारे 60 कोटींची दलाली वसूल करून इडी आणि संबंधित व्यक्ती व कंपन्यांमध्ये ‘मांडवली’ घडवून आणली. या मांडवलीत दिवाण हौसिंग, लार्सन अँड टुब्रो, रहेजा बिल्डर, पलिझो हॉटेल्स, मोंशर फायर, इंडिया बुल्स, रुस्तमजी, इनोर्बिट मॉल, डीबी रिॲलिटी, वाधवान बंधू अशा अनेकांची नावे भोसले यांनी दिली आहेत. नवलानी याने काहीजणांकडून कोट्यवधी तर काहींकडून लाखो रुपये उकळले आहेत, असाही आरोप त्यात केलेला आहे आणि या सर्व मोठ्या रकमा सल्ल्यापोटी घेतल्याचा आवही नवलानीने आणला आहे. या सर्व रकमा सल्ल्यापोटी घेतलेल्या नसून ही खंडणीच असल्याचा आरोप भोसलेनी केला आहे.
अविनाश भोसले यांनी हे पत्र कुणातरी मोठ्या राजकीय नेत्याच्या सांगण्यावरूनच आयुक्तांना लिहिले असा केंद्रीय यंत्रणांना संशय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाहीतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा यामागे हात असू शकतो, असा केंद्र सरकारला दाट संशय आहे. ते नाव वदवून घेण्यासाठीच ही आजची अटक असावी असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आज सीबीआयने ताब्यात घेतले आहे, उद्या किंवा काही दिवसांनी इडीही चौकशीसाठी भोसले यांना अटक करू शकते, असा कयास आहे.
खरेतर बिल्डर अविनाश भोसले यांच्याबाबत बरेच लिहिता येईल. कारण ८०च्या दशकात साधी रिक्षा चालवणारा अविनाश १५/२० वर्षांतच एक-दोन हेलिकॉप्टरचा मालक होतो. इतकेच नव्हे तर आपल्या बंगल्यानजीक हेलिपॅडही उभारतो. हे सर्व अनाकलनीय आहे. शिवसेना- भाजप सत्तेच्या काळात कृष्णा खोरे विकास प्रकल्पाचे काम खरे तर आंध्र प्रदेशातील एका कंत्राटदाराला मिळालेले होते. पण अनेक हिकमती करून भोसले यांनी त्यात शिरकाव करून घेतला होता. त्यानंतर रिक्षाही इतिहासजमा झाली.
महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख राजकीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत. आताच्या महाराष्ट्रात तरी ‘अविनाश आवडे सर्वांना’ अशीच परिस्थिती आहे आणि पुढेही राहील!! राजकीय नेते आणि नोकरशहा यांच्यापुरतेच त्यांच्या संबंधांचे वर्तुळ सीमित नाही. बॉलीवूडमधील बडी नावेही त्यात सामील आहेत. अगदी अमिताभपासून सलमान खानपर्यंत आणि रितेश देशमुखपासून तो श्वेता बच्चन-नंदा यांच्यापर्यंत सर्वच त्याच्या लपेट्यात आहेत हे विशेष. न्यायालयाने कधीकाळी दिलेल्या निकालाने या मंडळींचे फावते आहे. छायाचित्रात दिसतात म्हणून काही त्यांचे संबंध प्रस्थापित होत नाहीत, असे न्यायालयाने फार पूर्वी म्हटलेले आहे. आता या निकालाचाही पुनर्विचार झाला पाहिजे असे वाटू लागले आहे…

