प्रदीप तथा बाळू पूर्णेकर यांच्यावर झाडलेल्या गोळ्या पप्या शिंदेच्या ‘घोड्या’तूनच असल्याचे वृत्त हाती येत आहे. पोलिसांचे अजून विश्लेषणच सुरू आहे.
“थांब! प्रकाशाची चूड आताच पेटवू नको
आपुल्याच तोऱ्यात पुढे पुढे सरकू नको
नाहीतर मलाही हाती खडग घ्यावे लागेल
मित्रा! एव्हडा प्रसंग मजवर आणू नको” (नारायण सुर्वे)
ठाणे शहरात अलीकडच्या काही दिवसात घडलेल्या गंभीर घटना पाहून ठाणे शहरातील समस्त राजकीय नेत्यांना माझे हे कळकळीचे आवाहन आहे, असे समजा हवे तर! पण ठाण्यातील सर्व प्रकारचे प्रदूषण थांबवण्यासाठी काहीतरी पाऊल उचलण्याची हीच वेळ आहे. ही संधी गमावू नका! पोलीस अधिकाऱ्याला दाखलेबाज गुन्हेगार ढगात पाठवतो तर दुसरीकडे एका युवा नेत्याला पोलीस ठाण्यातच बडवतात. यावर कळस म्हणूनच की काय बुधवारी रात्री मनोरमा नगरच्या गणेश नगरातील कार्यालयात शिवसेना (उबाठा)चे ठाणेप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची निर्दयपणे बंदुकीच्या गोळ्यांनी तसेच कोयत्यांनी हल्ला करून हत्त्या करण्यात आली. ठाणे पोलिसांनी त्वरित हालचाल करून काही आरोपींना ताब्यातही घेतले आहे. दरम्यान पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सह पोलीस आयुक्त अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली विशेष तपास पथक नेमले आहे.
पिस्तूल पप्यानेच दिले
बाळूचा मित्र म्हणवणाऱ्या पप्या शिंदेनेच हा गेम घडवून आणल्याचे गुन्हेगारी जगताशी संबंध असणाऱ्या सूत्रांनी सांगितले. पप्याकडेच घोडा आणि अन्य प्राणघातक शस्त्रे आहेत, असे शपथेवर सांगणाऱ्या सूत्रांनी हा खून पप्यानेच पुरवलेल्या पिस्तुलाने झाला आहे. पप्याच्या घराशी गुन्हेगारी जगताचे जवळचे संबंध असून पूर्वी त्याची आईही तुरुंगाची हवा खाऊन आली आहे. एकेकाळी ठाणे शहरात भाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुविख्यात संजय शिंदेशी या घराचा जवळचा संबंध होता. पप्याचे घर व आजूबाजूच्या काही घरांची कसून झडती घेतल्यास कोयता, तलवारी व गावठी पिस्तुले सापडतील, असा विश्वासही याने व्यक्त केला.
कुटूंबप्रमुखला होते मारले
बाळू पूर्णेकर मनोरमा नगर तसेच आझाद नगरमध्ये कमालीचा लोकप्रिय होते. तसेच या भागातील नशेच्या व्यापाराला त्यांचा सक्त विरोध होता. हत्त्या होण्यापूर्वी सुमारे आठवडाभर बाळूने एका कुटूंबप्रमुखाला भररस्त्यात बांबूच्या फोकाने बडवले होते. कारण होते हा प्रमुखच घरातल्या मुली व महिलांचे अश्लील व्हिडीओ चित्रत करत असे. हे व्हिडीओ तो प्रमुख ‘पॉर्न’ सीडी म्हणून बाजारात विकत असे, असे परिसरात बोलले जात आहे. पोलीस याचाही शोध घेत असल्याचे समजले. पोलिसांनी आता ठाणे शहरातील गुन्हेगारी अड्ड्यांवर घाडी घालव्यात वा तेथे नजर ठेवावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे. बाळूच्या हत्त्येप्रकरणी पप्या जरी प्रमुख आरोपी असला तरी त्याचा सूत्रधार मात्र अजून मोकाटच आहे. पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलनजीक असलेल्या ‘भाई’ला ‘पराणी’ लावली की पोलिसांना धडाधडा माहिती मिळेल, असे सूत्रांनी सूचित केले. दरम्यान किसन नगर व वागळे इस्टेटमधील अनेक पन्टर्सनी सुबाल्या केल्याचे समजते. कोर्ट नाक्यावरील देवीच्या उत्सवाचे काम यावेळी नवीन फळी करत असल्याचेही दिसून आले.

बिल्डर अँगल नसावा
याप्रकरणी काहींनी समूह विकासाचा संशय घेतला आहे. काहींनी तर मानोरमा व आझाद नगरमध्ये 100 एकराच्यावर जमीन असल्याचा शोध लावला आहे. समहू विकास झोपड्या व चाळींचा होणार आहे. या परिसरात गेल्या पाच-दहा वर्षांत उभ्या राहिलेल्या टॉवर्सचे काय? हे ही मंडळी ध्यानातच घेत नाहीत. खरंतर या परिसरात मराठीतर बिल्डर्स भरपूर आहेत. मराठी बिल्डर्स अगदी मागच्या रांगेत आहेत. एक मराठी बिल्डर शिरकाव करतो आहे, त्याला नगरविकास खात्याचाही पाठिंबा आहे हे टिकाकार लक्षात घेत नाहीत. एकेकाळी मराठी बिल्डरांचे आवडते ठिकाण ठाणे होते. पण अलीकडच्या काळातील राजकारणामुळे त्यांनी अंगच काढून घेतलेले दिसते.
यानिमित्ताने पोलिसांनी ठाणे शहरातील मनोरमा व आझाद नगरची झाडाझडती घेण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. या दोन परिसरात परप्रांतातील अनेक गुन्हेगार तसेच गुन्हेगार प्रवृत्तीची माणसे आश्रयाला येतात. काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील कुखात विष्णू दुबेला पोलिसांनी ढगात पाठवल्यावर त्याचा एक साथीदार कोलशेत रोडवरील नंदीबाबा मंदिरासमोरील गल्लीत राहत होता. शेवटी मुंबईच्या विशेष पथकाने त्याला जेरबंद करून कापुरबावाडी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. नंतर त्याचे काय झाले हे आजतगायत कुणालाच माहित नाही.
राजकीय गदारोळात आम्हाला रस नाही. अमानुष गुन्हा घडला आहे. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून खुन्याला पकडावे व त्याला कडक शिक्षा व्हावी की जेणेकरून भविष्यात असे अमानुष कृत्य करायला कुणी धजावणार नाही. राजकीय नेत्यांनी अंतर्मुख व्हावे. या हत्त्येने सर्वच राजकीय पक्षांना धडा मिळेल, अशी फोल का होईना अपेक्षा करूया. मतभेद जरूर असावेत. परंतु ते विचाराने दूर करावेत वा गप्प बसावे. कोणाचीच हत्त्या करण्याच्या फंदात पडू नये.
“प्राजक्ताच्या देठावरती रक्त कुणाचे
रक्त शोषूनी उभे राहते तख्त कुणाचे?
देव आंधळा, सैतानाला लाखो डोळे
नाडून घेती, गाडून घेती, भक्त कुणाचे?? (महेश)
असे असंख्य प्रश्न जनतेच्या मानत आहेत. विपरीत काही घडू नये हीच अपेक्षा!
(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आणि गुन्हेविषयक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

