Homeटॉप स्टोरीकाँग्रेसच्या ‘माफी मांगो’ आंदोलनाचा...

काँग्रेसच्या ‘माफी मांगो’ आंदोलनाचा फज्जा! आंदोलन गुंडाळले!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या प्रसाराला महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केल्यानंतर प्रदेश काँग्रेसने सुरू केलेल्या आंदोलनाचा आज फज्जा उडाला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी आंदोलन करण्यास निघालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. त्याचवेळी फडणवीस आपल्या निवासस्थानी पक्षातल्या सहकाऱ्यांबरोबर गप्पा मारत बसले होते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या प्रक्रियेत पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरीगेट्स उभारले व एकंदर परिस्थिती पाहता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आंदोलनच मागे घेतले. याच काळात या आंदोलनावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्येही कलगीतुरा रंगला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना महाराष्ट्र काँग्रेसने कोरोना पसरवण्यास हातभार लावल्याचा आरोप केला होता. मोदी यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा अपमान झाल्याचा दावा करत पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी म्हणून काँग्रेसने राज्यभर भाजपा नेत्यांच्या घरासमोर आंदोलन सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी काँग्रेसने निदर्शने करण्याचे ठरवले होते. मात्र, भाजपाने त्याला प्रतिआव्हान दिले. सागर, या निवासस्थानाच्या चारही बाजून भाजपाचे नेते व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना आवरण्यात पोलिसांची दमछाक झाली. काही ठिकाणी भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी महिला पोलिसांचा चावाही घेतला. काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या वातावरणातच पटोले यांनी आजचे आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.

काँग्रेसच्या आंदोलनाला विरोध म्हणून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून गुंडगिरी करत मुंबईकरांना वेठीस धरले. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून आजचे आंदोलन तात्पुरते मागे घेत आहोत. मात्र, नरेंद्र मोदी महाराष्ट्राची माफी मागेपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसचा मोर्चा पोलिसांनी अडवला. मग, तेथेच त्यांनी आंदोलन केले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनीही पोलिसांनी अडवले तेथेच आंदोलन केले. प्रदेश सरचिटणीस अतुल लोंढे फडणवीसांच्या बांगल्याजवळ पोहोचले. मोदी यांचा निषेध करण्यासाठी वारकरी परिषदेचे विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली वारकरी टाळमृदुंगासह आंदोलनात सहभागी झाले होते.

आमचे आंदोलन अहिंसेचे – नाना पटोले

प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागितलीच पाहिजे, ही आमची मागणी आहे. यासाठी आम्ही आज मुंबईत आंदोलन केले. काँग्रेस अहिंसावादी आहे. आम्हालाही गुंडगिरी करता येते. पण ही आमची संस्कृती नाही. आम्हाला संदेश द्यायचा होता तो आम्ही दिला. भाजपाने लोकांना रस्त्यावर आणून रस्ता जाम केला. त्यांच्यामुळे मुंबईकरांना आज त्रास सहन करावा लागला. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून आजचे आंदोलन आम्ही तात्पुरते मागे घेत आहोत.

फडणवीस बसले गप्पा मारत

काँग्रेसचे आंदोलन चालू असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सागर, या निवासस्थानी आपल्या सहकाऱ्यांबरोबर मनमोकळ्या गप्पा मारल्याचे चित्र पुढे आले. आमदार आशिष शेलार, प्रसाद लाड, कृपाशंकर सिंह, राजहंस सिंह, मंदा म्हात्रे, मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा आदी यात सहभागी झाले होते.

असले आंदोलन चुकीचे – नवाब मलिक

दरम्यान, काँग्रेसच्या या आंदोलनानंतर राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी नेत्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याची भूमिका चुकीची असल्याचे सांगितले. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कोणत्याही नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याची भूमिका घेऊ नये. हे आंदोलन चुकीचे असल्याचे राष्ट्रवादीचे मत आहे, असे ते म्हणाले.

भाजपाच्या आंदोलनावेळी बोला – अतुल लोंढे

काँग्रेसचे मुख्य प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मलिक यांच्या प्रतिक्रियेवर लगेचच भाष्य केले. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जेव्हा नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करत होते तेव्हा मलिक यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली असती तर बरे झाले असते, असे ते म्हणाले. अशा स्वरूपाच्या आंदोलनाची सुरूवात कोणी केली, असा सवालही त्यांनी केला.

नाना पटोलेंची ही तर नौटंकी – देवेंद्र फडणवीस

नाना पटोले यांचे आंदोलन ही फक्त नौटंकी आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. याऊलट काँग्रेसने देशाची माफी मागितली पाहिजे, असे ते म्हणाले. नाना पटोले यांचे आंदोलन पूर्णपणे फसले. ते तोंडावर आपटले, अशी प्रतिक्रिया भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी दिली.

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...
Skip to content