Details
निवडणूक आचारसंहितेच्या बैलाला..
01-Jul-2019
”
शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
आपले सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? मुळात निवडणूक आयोग आहे का की त्याला कुठेतरी गुंडाळून ठेवलाय? असे प्रश्न पडावेत अशी निवडणूक प्रचार सुरू झाल्यापासूनची अवस्था आहे. निवडणूक आयोगाचा इतका दातपडका वाघ वा सिंह, खरेतर दात नसलेला वाघोबा यापूर्वी कधी पाहायला मिळाला नव्हता. यंदाच्या लोकसभा निवडणुकांसाठी जी जी म्हणून बंधने, आचारसंहिता, प्रचारांतील सीमारेखा आयोगाने आखून दिल्या किंवा गुळमुळीतपणे सांगण्याचे धाडस केले ते सर्व खुंटीला गुंडाळून ठेवत भाजपाची नेतेमंडळी आणि खुद्द मोदीसाहेब प्रचारात लष्कराच्या शौर्याचा, जवानांच्या रक्ताचा गुलाल उधळत मते मागत आहेत. ‘मते द्या नाहीतर बघा…’ म्हणत प्रचारसभेत थेट भाजपाच्या मंत्री मनेका गांधी मुस्लिमांना धमकवत आहेत. आपल्या राज्यातील दुसऱ्या मंत्री बहिणाबाई घटना बदलण्याची भाषा करत आहेत.
लष्कराचे मोदी सेना म्हणून नवे नामकरण झाले आहे. कुठलीही अनुमती नसलेले मोदी टीव्ही नावाचे चॅनेल जोरात सुरू आहे. लष्कराने केलेली कामगिरी जणू लाठीधारी स्वयंसेवकांनीच केली, आपणच सीमापार जाऊन लष्कराला वाट दाखवली, आपणच जाकिटाच्या खिशात बॉम्ब नेऊन बालाकोटला टाकले अशा थाटात सैन्याने केलेल्या भीमपराक्रमाची पावती आपल्या नावावर फाडत पोस्टर, बॅनर लावून भाजपा मते मागत आहे. या बॅनरवर नरेंद्र मोदींचे फोटो झळकत आहेत. खुद्द नरेंद्र मोदी प्रचारसभांमध्ये जवानांच्या नावाचा उपयोग करून मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. राष्ट्रीय सुरक्षेचा बागुलबुवा दाखवत आहेत.
ठाण्यातही सैन्याच्या नावावर मते मागणारी भाजपाची अशी बॅनर लागली होती. प्रचारासाठी सुपीक शक्कल लढवत पीएम मोदी नावाचा चित्रपटही ऐन प्रचारकाळातच प्रदर्शित करण्याची खेळीही खेळण्यात आली होती. पण आयोगाची आजवर बसलेली दातखिळी उघडली आणि या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यात आले. पण इरॉस स्टुडिओची मोदी नावाची वेबसिरीज मात्र सुरू आहे. तिचे पोस्टर्सही ठाण्यात स्टेशन परिसरातील सॅटिस पुलाखाली लावण्यात आले आहेत. इथूनतिथून मोदी हे नाव अधिकाधिक मतदारांपर्यंत जावे याचे हे प्रयत्न आहेत. प्रचाराची शक्कल म्हणून त्याचे कौतुकही करावे लागेल. पण हे सगळे सुरू असताना निवडणूक आयोग आणि आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी जणू डोळे मिटून घेतले आहेत. वास्तविक निवडणूक आयोगानेच सैन्याच्या नावावर प्रचार करण्यास आणि सैनिकांच्या बलिदानाचा, पुलवामा हल्ल्याचा मुद्दा प्रचारात वापरण्यास, हे मुद्दे वापरून मते मागण्यास मनाई केली आहे. पण भाजपाची वेगळी आचारसंहिता असावी बहुतेक.. कारण, भाजपाने बिनदिक्कत अशी पोस्टर सर्वदूर झळकवली आहेत.
कुठे कुठे तक्रारी झाल्यावर स्थानिक यंत्रणांनी कारवाई करून ही पोस्टर उतरवली असली तरी, आयोगाने मात्र अद्याप भाजपा वा मोदींविरोधात एकही करडा शब्द काढलेला नाही वा कारवाई केलेली नाही. केले ते एवढेच की संबंधित जिल्ह्यातून वा राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्याची मोठ्ठी कारवाई केली आहे. हीच आगळीक जर विरोधी पक्षांकडून घडती किंवा भाजपा विरोधी पक्षात असताना सत्ताधारी पक्षाने असे काही केले असते तर भाजपाने केवढा गदारोळ केला असता याची कल्पना आपण सर्वजण करू शकतो. प्रचाराची जी चौकट आहे, आचारसंहिता आहे ती भाजपाला मान्य आहे की नाही? हा प्रश्न येथे उपस्थित होतो. आयोगाने तो खडसावून विचारण्याची धमक दाखवली नसल्यामुळे प्रसारमाध्यमांवर ती जबाबदारी आली आहे. याबाबत वारंवार विचारणा झाल्यावर आता कुठे आयोगाने योगी आदित्यनाथ, मायावतींवर अखेर काही दिवसांची प्रचारबंदी घातली आहे.
आदित्यनाथ यांची बेछूट वक्तव्ये सुरू असतानाच मायावती यांनीही मुस्लिमांना मतांचे आवाहन करणारे वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग केला होता. मायावतींवर कारवाई करायची तर आयोगाला आदित्यनाथ यांच्यावरही कारवाई करणे भाग होते. पण, आपलं मत बालाकोटमध्ये हल्ला करणाऱ्यांना अर्पण करावं, पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मत अर्पण करा, असे म्हणणाऱ्या मोदींचे वक्तव्य मात्र आयोगाला आचारसंहिता भंग वाटलेले नाही. भाजपाची पोस्टर वा नमो टीव्ही ही वाहिनीही आयोगाला बहुदा दिसली नसावी. भारतीय लष्कर आणि जवानांच्या नावाने पक्षाने किंवा उमेदवाराने प्रचारातून किंवा निवडणुकीसंदर्भातील कुठल्याही कार्यक्रमातून मत मागू नये, असे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने १९ मार्चलाच दिले होते. तरीही मोदी प्रचारसभांमध्ये हा मुद्दा मांडत आहेत. लोकांसमोरील प्रश्न, भाजपा सरकारची कामगिरी या आघाडीवर बोलण्यासारखे काहीच हातात नसल्यामुळे सैन्याचे शौर्य, राम मंदिर, ३७० कलम असे जनतेत धर्माच्या नावावर उघडउघड फूट पाडणारे, मतविभाजन करणारे मुद्दे चघळले जात आहेत. देशात आणि राज्यात विरोधी पक्षांच्या नेत्यांनी याविषयी जोरदार आक्षेप नोंदवूनही बिनकण्याचा आयोग झोपेचे सोंग घेऊन आहे. यामुळेच आपले कुणी काही बिघडवू शकत नाही अशा थाटात मोदी आणि भाजपा यांचा प्रचार सुरू आहे. कर्तव्यकठोर निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांच्या कारकीर्दीत आचारसंहितेचा भंग करण्याची कुठल्याही पक्षाची वा नेत्याची हिंमतही झाली नसती. मात्र मोदींच्याच कृपाकटाक्षासाठी आसुसलेले आयोगातील नोकरशहा आयोगाची स्वायत्तता जाजमाखाली घालून आचारसंहिता लाथाडली जात असताना कारवाईचा ‘क’ ही उच्चारायला धजावत नाहीत हे लोकशाहीचे दुर्दैव आहे.”
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान