HomeArchiveशरद पवार काँग्रेसला...

शरद पवार काँग्रेसला गुंडाळणार?

Details

 
किरण हेगडे
Kiranhegde17@gmail.com
 
“राज्य विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होत असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसला दिलेला शब्द पाळणार की काँग्रेसच्या श्रेष्ठींना गुंडाळणार, याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.”
 
राज्यात शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका होती. काँग्रेसची सदस्यसंख्या शिवसेना व राष्ट्रवादीपेक्षा बऱ्यापैकी कमी असली तरी त्यांच्या सहभागाशिवाय सत्तेत येता येत नाही हे ओळखून पवार यांनी काँग्रेसला सत्तेतला वाटा देण्याच्या यशस्वी वाटाघाटी केल्या. या वाटाघाटी करतानाच सत्तेत आल्यानंतर दृष्टीक्षेपात असलेल्या निवडणुकांबद्दल त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत चर्चा केली.
 
“काही बैठकांमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित होते. यातल्याच एका बैठकीत अलीकडेच झालेल्या राज्यसभा निवडणुकींचा विषयही चर्चिला गेला होता. विधानसभा सदस्यांकडून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या जागांसाठी झालेल्या जागावाटपावरही चर्चा झाली. या चर्चेत काँग्रेस दोन जागांसाठी अडून बसली होती. तेव्हा पवार यांनीच काँग्रेसच्या श्रेष्ठींना एप्रिलमध्ये रिक्त होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन जागा सोडण्याची हमी दिली. त्याच्या मोबदल्यात त्यांनी राष्ट्रवादीच्या हिश्श्यात राज्यसभेच्या दोन जागा घेतल्या. या वाटाघाटीमुळेच सुरूवातीला राज्यसभेसाठी फक्त शरद पवार यांनीच उमेदवारी अर्ज दाखल केला. वाटाघाटी पूर्णत्वास गेल्यानंतरच राष्ट्रवादीच्या वतीने अगदी शेवटच्या दिवशी फौझिया खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसने तेव्हा फक्त एकच उमेदवार दिला आणि राजीव सातव राज्यसभेवर गेले.”
 
डॉ. नीलम गोऱ्हेंसह विधान परिषदेचे ९ सदस्य निवृत्त
 
“दरम्यान, राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह विधान परिषदेच्या ९ सदस्यांची मुदत २४ एप्रिलला संपली. या रिक्त होणाऱ्या जागांसाठी मार्चमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने अनिश्चित कालावधीकरिता निवडणुका पुढे ढकलल्या. भारतीय जनता पार्टीच्या स्मिता वाघ, अरूण अडसड, पृथ्वीराज देशमुख, काँग्रेसचे चंद्रकांत रघुवंशी, हरिभाऊ राठोड, राष्ट्रवादीचे हेमंत टकले, आनंद ठाकूर, किरण पावसकर आणि शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांचा यात समावेश होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेसाठी नामनियुक्त करण्यास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ठाम विरोध केल्यामुळे विधान परिषदेच्या या जागांसाठी तातडीने निवडणुका घ्याव्या, अशी विनंती शिवसेनेकडून राज्यपालांना करण्यात आली.”
 
२९ मे रोजी कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेले मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कार्यकालाला सहा महिने पूर्ण होणार आहेत. त्यामुळे त्याआधी त्यांना विधान परिषदेचे सदस्य होणे गरजेचे आहे. म्हणूनच शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर राज्यपालांना भेटले आणि लगेचच या विनंतीचा हवाला देत राज्यपालांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला तातडीने निवडणूक घेण्याची विनंती केली. त्याआधी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनीही केंद्रीय निवडणूक आयोगाला सामाजिक अंतर राखून मतदान करवून घेण्यास प्रशासन समर्थ असल्याची ग्वाही दिली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आयोगानेही २१ मे रोजी निवडणूक घेण्याची घोषणा केली व तसा कार्यक्रम जाहीर केला. येत्या ११ मेपर्यंत त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल होणे गरजेचे आहे.
 
“या निवडणुकीची घोषणा करताना त्यांनी ठाकरे यांच्या सदस्यात्वाचा आवर्जून उल्लेख केला. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्यासाठी १९९१ साली, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्यासाठी १९९६ साली राज्यसभेची निवडणूक घेण्यात आली होती. राजस्थानचे तेव्हाचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासाठी १९९१ साली, बिहारच्या तेव्हाच्या मुख्यमंत्री राबडी देवी यांच्यासाठी १९९७ साली, आंध्र प्रदेशचे तेव्हाचे मुख्यमंत्री विजय भास्कर रेड्डी यांच्यासाठी १९९३ साली, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व इतर चार मंत्र्यांसाठी २०१७ साली, नागालँडच्या मुख्यमंत्र्यांसाठी २०१७ सालीच पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या सर्व बाबींचा हवाला देत आयोगाने या निवडणुका जाहीर केल्या.”
 
विधानसभेतील पक्षीय बलाबल
 
“सध्या राज्य विधानसभेत भाजप – १०५, शिवसेना – ५६, राष्ट्रवादी काँग्रेस – ५४, काँग्रेस – ४४, बहुजन विकास आघाडी – ३, समाजवादी पार्टी – २, एम आय एम – २, प्रहार जनशक्ती – २, मनसे – १, माकप – १, शेतकरी कामगार पक्ष – १, स्वाभिमानी पक्ष – १, राष्ट्रीय समाज पक्ष – १, जनसुराज्य पक्ष – १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – १, अपक्ष – १३, असे पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे सर्व सत्ताधारी एकजूट राहिले तर सत्ताधाऱ्यांचे सहा तर विरोधकांचे तीन उमेदवार विधान परिषदेवर सहज निवडून येतात. मात्र, निवडणूक बिनविरोध करायची तर भाजप चौथ्या जागेवरही आपला दावा सांगणार आहे. त्यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त मतांच्या जोरावर ते ही मागणी करत आहेत.”
 
“सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेलाही त्यांचा दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी अतिरिक्त मतांची गरज भासणार आहे. ही गरज सर्वाधिक काँग्रेसला आहे. शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच डॉ. नीलम गोऱ्हे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून अजून उमेदवारांची घोषणा झालेली नाही. पवार यांनी काँग्रेसला दोन जागा देण्याची गाव्ही दिली आहे. ती पूर्ण करायची झाली तर सहावा उमेदवार राष्ट्रवादीचा असेल आणि त्याला निवडून आणण्यासाठी पवार यांना आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागेल आणि त्यात अपयश येण्याची शक्यता वाटली तर पवार काँग्रेसला पुन्हा गुंडाळत ते एकाच उमेदवारावर समाधानी राहतील असे नवे कोणतेतरी आश्वासन देतील. पण शरद पवार यांच्या खेळीला ओळखून असलेल्या काँग्रेसला ते कितपत मान्य होईल हे लवकरच दिसेल, असे बोलले जाते.”

Continue reading

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...

साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-साईनगर शिर्डी रेल्वे उद्यापासून!!

पुणे-साईनगर शिर्डी दैनंदिन रेल्वेसेवा उद्यापासून सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उद्या दुपारी साडेतीन वाजता पुणे रेल्वेस्थानकावरून पुणे-साईनगर शिर्डी डेली एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करतील. पुणे आणि साईनगर, शिर्डीदरम्यानची ही पहिलीच थेट रेल्वेसेवा असेल, ज्यामुळे...
Skip to content