HomeArchiveआणीबाणीची काँग्रेसी मानसिकता...

आणीबाणीची काँग्रेसी मानसिकता शिवसेनेत?

Details

 

केएचएल न्यूज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
 
“ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात छत्रपतीं शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या जिजाऊ माता होत्या, त्या महाराष्ट्रात आज देशविरोधी शक्तींची साथ देणाऱ्यांचे सरकार सत्तेत आहे. काँग्रेसची आणीबाणीची मानसिकता आघाडीतल्या घटक पक्षातही मुरत आहे. ज्यांनी आयुष्यभर काँग्रेसच्या या मानसिकतेशी भारतीय जनता पक्षाच्या साथीने लढा दिला तेच काँग्रेसच्या आघाडीत सामील होणे हा जनतेचा विश्वासघात आहे आणि त्याची देशभर चर्चा आहे अशी टीका भाजपच्या नेत्या व केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी रविवारी केली.”
 
“भाजपने स्मृती इराणी यांची मुंबई आणि कोकणासाठी व्हर्च्युअल रॅली आयोजित केली होती. त्यात त्या नवी दिल्लीहून सहभागी झाल्या होत्या. काँग्रेस संकटकाळात नेहमी देशविरोधी वागत आली आहे, याची उदाहरणे देत त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. यावेळी बोलताना स्मृती इराणी यांनी राज्य सरकारच्या कृतीवरही आसूड ओढले. आघाडीचे काँग्रेसीकरण झाले आहे. त्यामुळे कोरोनाच्या या संकटकाळातही भ्रष्टाचार वाढत आहे. सरकारच्या विरोधी लिहिणाऱ्या, सरकारच्या चुका दाखवणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. आज राजीव गांधी फाउंडेशनचे सत्य जनतेला हादरवून गेले आहे. काँग्रेसीकरणामुळेच पालघरमध्ये साधूंची हत्त्या होते, काँग्रेसीकरणामुळेच कोरोना मृतांच्या बॉडीबॅगच्या खरेदीमध्येही घोटाळा होतो असेही त्या म्हणाल्या.”
 
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनासाठी लॉकडाऊन घोषित करतानाच गरीब कल्याण योजना जाहीर केली. ८० कोटी नागरिकांना अन्नधान्य पोहोचवण्यात आले. त्याचबरोबर जीडीपीच्या दहा टक्के इतक्या रकमेचे आत्मनिर्भर पॅकेज मोदी सरकारने घोषित केले आहे. काँग्रेसच्या संकुचित मानसिकतेत या योजनांचा विचारही सुचला नसता असे त्या म्हणाल्या. लॉकडाऊनपर्यंत भारतात एकही पीपीई किट बनत नव्हते, ही सत्तर वर्षांतील भारताची हालत होती. मात्र मोदींच्या नेतृत्त्वात आज भारत पीपीई कीटचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक बनला आहे, असे स्मृती इराणी म्हणाल्या.”
 
“यावेळी बोलताना स्मृती इराणी यांनी सांगितले की, केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारला जनतेने भरभरून पाठींबा दिल्याने गेली अनेक वर्षे जे मुद्दे भाजपने राजकारणात मांडले ते पूर्ण करता आले. जनतेच्या जोरदार पाठिंब्यामुळेच कलाम ३७० रद्द करता आले आहे. जनधन खाती उघडल्याने लोकांना थेट मदत मिळते आहे. त्यामुळे भ्रष्टाचार खूप कमी झाला आहे. जनतेच्या पाठिंब्यामुळेच काश्मीरसह राममंदिराचा ही प्रश्न मार्गी लागला आहे, असे त्या म्हणाल्या.”
 

 
 
“समाज अडचणीत दिसला कि भाजप कार्यकर्ता मदतीला धावतो असे सांगत राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या सभेत भाजप कार्यकर्त्यांचे कौतुक केले. काँग्रेस काळात सरकारने वरून पाठवलेल्या शंभर रूपयांतले फक्त दहा पैसे तळातल्या लोकांपर्यंत पोहोचायचे, तर मोदींनी जनतेच्या थेट बँक खात्यात मदत द्यायला सुरूवात केली आहे. लघु उद्योगांना दिलेल्या थेट मदतीमुळे अनेक लघु उद्योग पुन्हा उभे राहत आहेत असे ते म्हणाले.”
 
“अनेक राजकीय पक्षांच्या कथनी आणि करणीत प्रचंड फरक असतो. मात्र आम्ही जे सांगत होतो ते संसदेत बळ मिळाल्याबरोबर आम्ही करून दाखवले. आम्ही ३७० कलम रद्द केले, मुस्लिम महिलांसाठी ट्रिपल तलाक रद्द केला आहे, असे त्यांनी सांगितले.”
 
“राज्यातील सरकारच्या कोरोना संकट हाताळण्यात आलेल्या अपयशावर फडणवीस यांनी टीका केली. राज्य सरकार आकडे लपविण्याची लढाई लढत आहे. त्यातून मृत्यू दर वाढत आहे. सुप्रीम कोर्टानेदेखील राज्य सरकारला मजुरांच्या मदतीप्रश्नी फटकारले आहे. राज्य सरकारने कापूस खरेदी, मका खरेदी केली नाही. केंद्राकडून पूर्ण पैसे देऊ करूनही राज्य सरकार खरेदी करत नाही असे ते म्हणाले. कोरोना संकट नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारला पुढाकार घ्यावा लागेल असे ते म्हणाले. ”
 
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिले वर्ष नुकतेच पूर्ण झाले आहे. या ऐतिहासिक ठरलेल्या वर्षातील यशस्वी उपलब्धी जनतेसमोर मांडण्यासाठी भाजपाने व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन केले होते. रविवार दि. २८ जून २०२० रोजी सायंकाळी ६.३० वाजता झालेल्या या रॅलीत पक्षाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, रॅलीचे संयोजक खासदार मनोज कोटक, खासदार पूनम महाजन, खासदार गोपाळ शेट्टी, माजी मंत्री विनोद तावडे, आमदार भाई गिरकर, आ. नितेश राणे, माजी मंत्री रिपब्लिकन पक्षाचे अविनाश महातेकर, मुंबई भाजप संघटनमंत्री सुनील कर्जतकर, मुंबई महामंत्री अमरजित मिश्रा, नगरसेविका राजेश्री शिरवाडकर हे मुंबई भाजप कार्यालय, वसंत स्मृती येथून या व्हर्च्युअल रॅलीत सहभागी झाले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूर येथून तर प्रदेश प्रभारी सरोज पांडे नवी दिल्लीतून व्हर्चुअल रॅलीत सहभागी झाल्या. रॅली प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आ. प्रसाद लाड, माजी आमदार राजन तेली हेदेखील या व्हर्च्युअल रॅलीत विविध ठिकाणांहून सहभागी झाले होते. नवी दिल्लीहून खा. विनय सहस्रबुद्धे यांनी या सभेचे सूत्रसंचालन केले.”

Continue reading

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...

इराणवर हल्ला करण्यास अमेरिकी सेनेटची मनाई!

गेल्या जवळपास चार महिन्यांपासून पश्चिम आशियाला अशांतेच्या गर्तेत लोटणाऱ्या अमेरिका-इराण संघर्षात एक मोठी घडामोडी समोर आली आहे. १७ जून रोजी स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य करारानंतर या दोन्ही देशांमध्ये युद्ध थांबले असले, तरी आता दोन्ही देशांमध्ये अटी आणि नियमांवरून पुन्हा एकदा...
Skip to content