HomeArchiveलोकनेते बाळासाहेब देसाई

लोकनेते बाळासाहेब देसाई

Details
लोकनेते बाळासाहेब देसाई

    16-Mar-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@rediffmail.com
लोकनेते बाळासाहेब देसाई हे नाव नव्या पिढीला ठाऊक नसेल. या नावामागे फार मोठा इतिहास आहे. गोरगरीबांचे कैवारी म्हणून प्रख्यात असलेले बाळासाहेब देसाई यांचा जन्म दि. 10 मार्च, 1910 रोजी झाला. काही दिवसांपूर्वीच त्यांची जयंती पार पडली. पण बाळासाहेबांविषयी एक अक्षरदेखील कोठे छापून आले नाही. आम्ही बाळासाहेबांना आमच्या लहानपणी पाहिले. बाळासाहेबांचे आणि आमच्या वडिलांचे निकटचे संबंध होते. योगायोगाने आमचा वाढदिवसदेखील 10 मार्च रोजी असतो. लहानपणी आम्ही 10 मार्चला बाळासाहेबांच्या गळ्यात अनेकदा पुष्पहार घातला आहे. आमच्या वडिलांकडून बाळासाहेबांचे अनेक किस्से आम्ही वेळोवेळी ऐकले. त्यातून गोरगरिबांविषयीचे त्यांचे प्रेम आणि कणव दिसून आली.

बाळासाहेबांनी महसूल, गृह, शिक्षण आदी महत्त्वाची खाती सांभाळली. प्रत्येक खात्यावर त्यांनी आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटविला. शिक्षण क्षेत्रात त्यांनी क्रांती केली. गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी वार्षिक रु. 1200 किंवा त्याहून कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांना शालेय फी माफ केली. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात ही मोठी क्रांती होती. बाळासाहेबांच्या या शैक्षणिक क्रांतीमुळे गरिबांची लाखो मुले शिकून आपल्या पायावर उभी राहिली. या योजनेत सरकारी बाबूंनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. पालकांची उत्पन्नाची प्रमाणपत्रे खोटी असल्याचे कारण पुढे केले. त्यावर बाळासाहेबांनी त्यांना खणखणीत आवाजात गप्प बसण्याचे आदेश दिले. असा शिक्षणमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात पुढे झाला नाही.

बाळासाहेब गृहमंत्री असताना त्यांनी आपल्या पाटण तालुक्यातून ट्रक भरून शेतकऱ्यांची मुले मुंबईत आणली. त्यांना पोलीसमध्ये भरती केले. वेळप्रसंगी नियम शिथील केले. त्यामुळे शेतकऱ्यांची अनेक मुले पोलीस बनली. यासंदर्भात एक किस्सा तर मजेदार आहे. बाळासाहेबांनी पाठविलेल्या एका मुलाची उंची कमी होती. त्यावर उपायुक्ताने त्याला बाजूला काढले. तो बाळासाहेबांकडे जाऊन म्हणाला, `या मुलाची उंची कमी आहे. त्याला पोलीससेवेत घेता येणार नाही.’ त्याला बाळासाहेब म्हणाले, `त्याला तुझी उंची लाव. पण भरती करून घे.’ त्या अधिकाऱ्याने मुकाट्याने त्या मुलाला पोलीससेवेत घेतले. बाळासाहेबांचे असे अनेक किस्से नमूद करण्यासारखे आहेत. एकदा बाळासाहेबांचा वाढदिवस होता. त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर अमिर उमरावांची मोठी गर्दी जमली होती. बाळासाहेब हॉलमध्ये आले. त्यांचे लक्ष दरवाज्यात गेले. तेथे एक गरीब फाटका शेतकरी उभा होता. बाळासाहेबांनी त्वरीत त्याला जवळ बोलाविले. त्याची आपुलकीने विचारपूस केली. त्यावर तो रडू लागला. तो म्हणाला, `साहेब, मी गावाहून मुलीला घेऊन आलो आहे. ती खूप आजारी आहे. पण इलाजासाठी माझ्याकडे पैसे नाहीत.’ बाळासाहेबांनी ताबडतोब पीएला सांगून सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या डीनला फोन लावला. त्यांना सांगितले, `मी एक पेशंट तुमच्याकडे पाठवीत आहे. तो पेशंट माझा आहे. त्याच्याकडून एक पैसाही घ्यायचा नाही. सर्व औषधोपचार विनामूल्य करायचे. पेशंटला खडखडीत बरे करून घरी पाठवायचे.’ डीनने `यस सर’ म्हटले. तो शेतकरी आपल्या लहानग्या मुलीला बरी करून गावी घेऊन गेला.

बाळासाहेबांचा आणखी एक किस्सा असा आहे : ते गृहमंत्री होते. महाराष्ट्रात भरपूर लोकप्रिय होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व भारदस्त होते. एकदा ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर निघाले असताना शेतात दोन गरीब कुटुंबातील विवाहसोहळा पार पडत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी ताबडतोब गाडी मांडवाजवळ वळविली. ते मांडवात दाखल झाले. गृहमंत्री बाळासाहेब देसाई आल्याचे पाहताच लगीनघरातील मंडळी खूष झाली. त्यांची एकच धावपळ उडाली. ठरल्याप्रमाणे विवाहसोहळा पार पडला. बाळासाहेबांनी निघताना वधू-वराच्या हातात अहेराची जाडजूड पाकिटे ठेवली. मग पाणावलेल्या डोळ्यांनी ते मोटारीत बसून पुढे निघाले.

असे होते बाळासाहेब देसाई. आमचे वडील `शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे यांनी बाळासाहेबांना अग्रलेखाद्वारे `लोकनेते’ ही पदवी बहाल केली. नंतर जाहीर समारंभात त्यांना ही पदवी दिली. तेव्हापासून बाळासाहेब `लोकनेते’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ते खऱ्या अर्थाने `लोकनेते’ होते. दुर्दैवाने ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. गळेकापू राजकारणात त्यांचा बळी गेला. बाळासाहेबांसारखा लोकनेता आम्ही आजपर्यंत पाहिलेला नाही.”
 

Continue reading

येत्या १७ एप्रिलपासून बोरिवलीत रंगणार ‘अजिंक्यतारा’ मल्लखांब स्पर्धा

मल्लखांब लव संघ आणि सुविद्या प्रसारक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १७ ते १९ एप्रिल २०२६दरम्यान सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत स्कूल ऑफ एनवायरन्मेंट ऍण्ड आर्किटेक्चर (एक्सर सुविद्या शाळा), एक्सर रोड, बोरीवली पश्चिम, मुंबई येथे मल्लखांबातील अनभिषिक्त...

आता सोने-चांदी-प्लॅटिनम दागिन्यांच्या आयातीला लागणार परवाना!

मुक्त व्यापार करारांचा (एफटीए) गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारने सोने, चांदी आणि प्लॅटिनम दागिन्यांच्या आयातीवर मोठे निर्बंध लादले आहेत. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) जारी केलेल्या नव्या नियमांनुसार, या दागिन्यांची आयात आता ‘फ्री’ ऐवजी ‘रिस्ट्रिक्टेड’ श्रेणीत टाकण्यात आली असून, आयातीसाठी पूर्वपरवानगी...

बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी नसणार बिनविरोध?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने विशेषतः बारामतीची निवडणूक 'बिनविरोध' करण्यासाठी आवाहन केले असतानाच, काँग्रेसने राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा...
Skip to content