Details
पाकिस्तानची मिजास संपवायलाच हवी!
20-Feb-2019
| 0
”
शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
shail.dinman@gmail.com
काश्मीरमधील दहशतवादाबद्दल आणि पाकिस्तानी कारवायांबद्दल मागे लिहिताना, भारताला यासंदर्भात कधीतरी विचार नव्हे अविचार करावाच लागेल, असे लिहिले होते. युद्धज्वर वेगळा, पाकिस्तानविषयीचा संताप, चीड वेगळी आणि वारंवार संयम दाखवून भारताने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणे आणखी वेगळे. वेगळे नव्हे तर आपल्या अस्तित्त्वासाठीच घातक. कारण पाकिस्तानच्या कागाळ्या, कारवाया आजवर थांबल्या नाहीत आणि यापुढेही थांबणार नाहीत. याला कारण आहे भारताचा पराकोटीचा संयम. परिपक्वता, विचारशक्ती. या संयमालाच भारताची मर्यादा, भित्रेपणा समजून पाकिस्तान आजवर आगळीक करत आला आहे, कुरापत काढतो आहे. अविचारही करतो आहे आणि भारत मात्र पाकिस्तानचा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावण्याचा अविचारीपणा करायला मागेपुढे करतो आहे. यामुळेच पाकिस्तानची खुमखुमी टोकाला पोहोचली आहे.
दहशतवादी संघटनांना खतपाणी घालून, पाकिस्तानी भूमीवर त्यांच्या कारवायांना जागा देऊन पाकिस्तान भारताला वाकुल्या दाखवतो आहे. पुलवामा हल्ल्यात पाकिस्ताननेच पोसलेल्या जैश ए मोहमद दहशतवादी संघटनेचा हात असूनही, आमच्यावर हल्ला कराल तर सडेतोड प्रत्युत्तर देऊ, अशी धमकी देण्याची शिरजोरी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान करू धजत आहे. या सगळ्याला कारण एकच, ते म्हणजे भारताने अविचार कधीच करायला हवा होता तो आजतागायत केला नाही. प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर असा अविचार करण्याची संधी भारतासमोर होती. संपूर्ण जगात पाकिस्तानची छि थू सुरू असताना भारताने केलेल्या कारवाईने पाकिस्तानचे कंबरडे मोडल्याबद्दल कुणीही निषेधाचा शब्दही उच्चारला नसता. आताही पुलवामा हल्ल्यानंतर तत्काळ, काही तासांतच भारताने पाकिस्तानला नेस्तनाबूद करण्याचा अविचार करायला हवा होता. आता वेळ निघून गेली. आपल्या ४४ जवानांचे रक्त सांडले गेल्या गुरूवारी. त्या रात्रीच पाकिस्तानचा फैसला होण्याची गरज होती. नको तितका संयम दाखवून आपण ती संधीही दवडली. आता इम्रानही वल्गना करू लागला आहे. युद्धज्वरातून, संतापामुळे अविचार नको, अशी भूमिकाही आता काहीजण घेत आहेत. पण युद्धकाळात क्षणाक्षणाला कृती आवश्यक असते, विचार करायला फार वेळ नसतो. फार विचार करत बसलो की संयमाचे रूपांतर कच खाण्यात होते जसे भारताचे झाले आहे. लढाईच्या आधीच पानीपत अशी आपली अवस्था झाली आहे. यामुळेच पुलवामा हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी सीमेवर आणखी एक अधिकारी हुतात्मा झाला, सोमवारी एका मेजरसह चौघांनी दहशतवाद्यांशी लढताना प्राणार्पण केले. किती मागे जायचे उदाहरणे देत?
कारगिल, २६/11 चा हल्ला, पठाणकोट, उरी, पुलवामा, सीमेवरील घुसखोरी, पाकिस्तानी निशाणेबाजांकडून आपल्या जवानांचे बळी आणि काश्मीरमधील दररोजच्या आणखी कितीतरी चकमकी. भारत महाशक्ती होतोय, जगातील प्रमुख महासत्तांचे प्रमुख आपल्या पंतप्रधानांचे मित्र आहेत. त्यांच्यासाठी जगभर रेड कार्पेट अंथरले जाते, अशी किती कौतुके आपण ऐकतो-वाचतो. गेल्या निवडणुकांच्या रणधुमाळीत पाकिस्तानवर गोली नही गोले बरसायेंगे.. म्हणत बाहू फैलावणारे आपले हेच शक्तीशाली पंतप्रधान होते. मग पाकिस्तानचा नायनाट करण्यासाठी आणखी कुठल्या मुहूर्ताची वाट आपण पाहयला हवी? संयम आणि विचारीपणाचा सल्ला देणारेही कुंपणावर पाय ठेवून बोलत आहेत. दुटप्पी बोलण्याची उत्तम उदाहरणे सध्या सोशल मीडियावर दिसत आहेत. योग्य वेळेची, संधीची वाट पाहयची तरी किती काळ? पाकिस्तानवर हल्ला कराल तर आम्हीही प्रत्युत्तर देऊ, अशा इम्रान खानच्या गमजा यामुळेच सुरू आहेत.
भारत हा पाकिस्तान आणि चीनची जुनी पोटदुखी आहे. भारताचे आर्थिकदृष्ट्या, सामरिकदृष्ट्या सक्षम, मजबूत होणे या दोन्ही देशांना परवडणारे नाही. यामुळे जेवढा संयम आपण दाखवू तेवढीच पाकिस्तानच्या कुरापतींची तीव्रता, गांभीर्य वाढत जाणार आहे हे आतातरी पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लक्षात घ्यायला हवे. पाकिस्तानला पुढे करून चीन आणखी वेगळ्या पद्धतीने आपला घात करायला टपला आहे हे आता जगजाहीर आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर रशिया, अमेरिका, इस्रायलसारखे देश त्यांच्या बुद्धिबळात भारताचा वापर करून घेत असतात. पण हा वापरही चीनचा मुकाबला करताना आपल्या फायद्याचा होऊ शकतो. तरीही संघर्षाची ठिणगी पडलीच तर हे देश थेटपणे भारताच्या बाजूने उभे ठाकतील असे आज तरी सांगता येणार नाही. यामुळेच याच्या त्याच्या दारात पुराव्यांच्या फायली आणि पाकिस्तानविरूद्धचे रडगाणे नेण्यापेक्षा भारताकडूनच आपल्याला सलणाऱ्या काट्याचा बंदोबस्त व्हायला हवा. चीन, सौदी अरेबियाच्या पाठिंब्यामुळे जागतिक दडपणाला पाकिस्तान भीक घालणार नाही. उभय देशांमधील व्यापार इतका किरकोळ आहे की पाकिस्तानची आर्थिक कोंडी शक्य नाही. आपल्या सांगण्यामुळे इतर देश पाकिस्तानची कोंडी करतील अशीही शक्यता नाही. युद्ध हा उपाय नाही म्हणत पाकिस्तानची राजनैतिक, आर्थिक कोंडी करा म्हणणाऱ्या तज्ज्ञांना हे कोण समजवणार? कोट्यवधी जनतेच्या मनात आता पाकिस्तान सलतो आहे. सहनशक्तीलाही सीमा असते. संयमाचाही अंत होतो. करा एकदाचा अविचार, काय ते एकदाच टोक गाठा, इतपत सर्वसामान्यांच्या मनात बदले की आग धुमसते आहे. थेट युद्धात पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करील असे बुजगावणे नेहमी दाखवले जाते. पण ही अण्वस्त्रे कधीतरी पाकिस्तानातील माथेफिरू भारताविरुद्ध वापरणारच आहेत. त्यासाठी ती दहशतवाद्यांच्या हातात पडावीत अशीही व्यवस्था पाकिस्तानचे लष्कर आणि गुप्तचर यंत्रणा करू शकते. या अण्वस्त्र हल्ल्यात पुलवामासारखे बेसावध राहून बेचिराख व्हायचे की पाकिस्तानलाही नामशेष करायचे याचा विचार वा अविचार भारतीय नेतृत्त्वाने आता करायलाच हवा.”

