HomeArchiveगडकरींचा मास्टरस्ट्रोक, भाजपाचा...

गडकरींचा मास्टरस्ट्रोक, भाजपाचा धोबीपछाड!

Details

 
 

 
 
किरण हेगडे
 
 
“काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मदतीने शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला देण्याचे शिवसेनेचे स्वप्न भंगण्याची दाट शक्यता असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेल्या वचनाची पूर्ती करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत. त्याचप्रमाणे भावी मुख्यमंत्री म्हणून ज्यांचा शिवसेनेकडून लावण्यात आलेल्या होर्डिंगवर उल्लेख करण्यात आला ते आदित्य ठाकरे `होर्डिंग मुख्यमंत्री’ ठरण्याची शक्यता आहे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत न मागता भारतीय जनता पार्टीला पाठिंबा जाहीर करणाऱ्या राष्ट्रवादीने यावेळी सत्तेत सहभागी होण्याची तयारी दाखवली असली तरी काँग्रेस याच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आज गुरूवारी भाजपाने आपला सत्तास्थापनेचा दावा राज्यपाल विजय सिंह कोश्यारींकडे केला. सोबत आलात तर शिवसेनेसह, नाही आलात तर स्वबळावर अल्पमताचे सरकार स्थापन करण्याची तयारी भाजपाने केली आहे.”
 
 

“२४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात भाजपाला १०५ जागा मिळाल्या. शिवसेनेला ५६ तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला अनुक्रमे ५४ व ४४ जागा मिळाल्या. इतर जागी बंडखोर व अपक्ष तसेच इतर पक्षाचे आमदार निवडून आले. सत्तेचा असा निकाल लागल्यानंतर शिवसेनेला लगेचच भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या युतीच्या वेळी दिलेल्या आश्वासनाची आठवण झाली. संपूर्ण प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्यापर्यंतचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात सरकार येणार याची हमी देत असताना निकालानंतर शिवसेनेने त्यांचे आक्रमक नेते संजय राऊत यांना मैदानात उतरवले. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत ते रोज माध्यमांपुढे शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असे सांगू लागले. भाजपा मुख्यमंत्रीपद सोडणार नाही हे भाजपाने पहिल्या दिवसापासून जाहीर केले. मात्र, रोज माध्यमांपुढे येणे त्यांनी टाळले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्याला हवा दिली. संजय राऊत त्यांना भेटलेही. त्यानंतर पवार यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेटही घेतली. लवकरच पुढची भेट घेण्याची घोषणाही केली. पण बुधवारी त्यांनी आपल्या सिल्व्हर ओक, या मुंबईतल्या घरात चर्चेला आलेल्या राऊतांना अवघ्या ९ मिनिटांमध्ये बाहेर धाडले. नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी युतीला जनादेश मिळाला असल्याने त्यांनी सरकार बनवायला हवे असा सूर लावला. काँग्रेसचे राज्यातले नेते अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, हुसेन दलवाई यांनी भाजपाविरोधी सरकारला पाठिंबा देण्याचा मनोदय जाहीर केला असला तरी त्यांनी त्यांच्या अटीही टाकल्या. केंद्रातल्या सत्तेतून बाहेर होऊन विरोधात बसा ही प्रमुख अट आहे जी शिवसेना मान्य करण्याची शक्यता नाही.”
 
 
“मंगळवारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्याशी दिल्लीत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही चर्चा केली. त्यानंतर बुधवारी ते नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाही भेटले व चर्चा केली. फडणवीस व गडकरी दोघेही स्वयंसेवक, राजकीय विरोधक असले तरी एक समान धागा. संघाची मध्यस्थी झाली आणि बुधवारी सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल गडकरींकडे पोहोचले. दोघांमध्ये ज्या `रस्त्यां’वर चर्चा झाली ती माध्यमांसमोर आली नसली तरी शरद पवारांनी संजय राऊतांना ९ मिनिटांतच मातोश्रीवर रवाना केले आणि युतीनेच सरकार बनवावे असा सूर आळवला. त्यानंतरच भाजपाने आज राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केला असे जाणकार सांगतात. शिवसेना सोबत आली नाही तरी आपले अल्पमतातले सरकार पडत नाही याची खात्री वाटल्यानेच भाजपाने हे पाऊल उचलले आहे आणि त्यामुळेच शिवसेनेने आपल्या आमदारांच्या बैठकीनंतर त्यांची रवानगी पंचतारांकीत हॉटेलमध्ये केल्याचे बोलले जात आहे.”

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content