‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची थाटात सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. कार्यक्रमाच्या ग्रँड प्रीमियरला निक्की तांबोळी रितेशभाऊसमोरच स्प्लिट्सविलाची जान असलेल्या अरबाज पटेलवर फिदा झालेली दिसून आली. आता दुसऱ्या दिवशी छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडे निक्की आणि अरबाज यांना ग्रीन सिग्नल देताना दिसून येणार आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या दिवसाचा प्रोमो समोर आला असून दुसऱ्याच दिवशी घरातले सदस्य रोमँटिक अंदाजात दिसून येत आहेत. प्रोमोमध्ये निक्की तांबोळी चहा बनवायला घेते. पण हीटर चालत नसल्याने ती छोटा पुढारीला ‘बिग बॉस’ला विनंती करण्यास सांगते. त्यावेळी छोटा पुढारी म्हणतो, “बिग बॉस’ आमच्या वहिनींचं तरी ऐका…”. त्यावर अरबाज त्याला म्हणतो, “थांबरे.. सकाळी सकाळी असं काय म्हणतो तू..”

पुढे छोटा पुढारी म्हणतो, “तुझं प्रेम उतू चाललंय ते सांगतोय.. चहा उतू गेला तर काही बिघडत नाही.” छोटा पुढारीच्या या वक्तव्यावर अरबाज आणि निक्कीला हसू अनावर होतं.. अरबाज तर डोक्यालाच हात लावतो. त्यानंतरही छोटा पुढारी पुढे म्हणतो, “प्रेमात असचं असतंय ‘बिग बॉस’. आणि घरात हास्यकल्लोळ होतो.

ग्रँड प्रीमियरला निक्की अरबाजकडे पाहून लाजताना दिसली होती. अरबाजला पाहून सगळंच विसरली असल्याचं ती म्हणाली होती. रितेशभाऊलाही निक्की थोडंथोडं काहीतरी होऊ शकतं, असं म्हणाली होती. दुसरीकडे अरबाजही, निक्कीला आता सगळीकडे मीच दिसेन, माझ्याशिवाय तिला दुसरं काही सुचणार नाही, असं म्हणाला होता. त्यामुळे आता निक्की आणि अरबाजची जोडी जमणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.