Homeटॉप स्टोरीमाजी महापौर किशोरी...

माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ?

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या किश कॉर्पोरेट कंपनीसाठी एसआरएच्या लाभार्थ्याकडून घेतलेल्या तथाकथित गाळ्याचे दोन वेगवेगळे करार झाल्याचे उघड झाले आहे, असा दावा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.

एसआरएने वरळीतील गोमाता जनता एसआरए सोसायटी इमारत क्रमांक एकमधील तळमजल्यावरील गाळा क्रमांक चार संजय अंधारी यांना वितरित केला होता. तो गाळा पहिल्या दिवसापासून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या ताब्यात होता असे दिसते. 2012मध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी किश कॉर्पोरेट सर्विसेस इंडिया प्रा. लि. या कंपनीची स्थापना केली. त्या कंपनीचे रजिस्टर्ड कार्यालय गोमाता जनता एसआरए इमारत क्रमांक एक तळमजला येथे दाखवण्यात आले.

2017मध्ये याच इमारतीमधील आणखी एक गाळा किशोरी पेडणेकर यांनी किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि. कंपनीचे कार्यालय म्हणून दाखवला. हा गाळा संजय अंधारी यांच्या नावाने होता असे सांगण्यात आले. संजय अंधारीसोबत किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि. कंपनीने लिव्ह अँड लायसन्स करार केला. या कराराची प्रत पेडणेकर परिवाराने दोन ठिकाणी जमा केल्या. रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, कंपनी मंत्रालय, भारत सरकार आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, महाराष्ट्र सरकार. हे दोन्ही लिव्ह अँड लायसन्स करार संजय अंधारी आणि किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि. कंपनीच्या मध्ये झाले आहेत, असे किशोरी पेडणेकर परिवाराने सांगितले.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्या घोटाळ्यासंबंधी तक्रार केल्यानंतर कंपनी मंत्रालय, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस यांनी सोमय्या यांची तक्रार नोंदवून घेतली. सोमय्या यांनी मुंबई उच्च न्यायालयातही यासंबंधी याचिका केली. न्यायालयाने संबंधितांना आपले उत्तर देण्याचे निर्देश दिले.

कंपनी मंत्रालयात 2017मध्ये किश कॉर्पोरेट सर्विसेस इंडिया प्रा. लि. कंपनीने संजय अंधारी आणि किश कॉर्पोरेट सर्विसेस इंडिया प्रा. लि. कंपनीदरम्यान लिव्ह अँड लायसन्स करार झाले त्याची प्रत दिली. ती प्रत पाहताना हा करार ६ जुलै 2017 रोजी झाला असे सांगण्यात आले आहे. शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर किश कॉर्पोरेट आणि संजय अंधारीदरम्यान जो करार झाला त्या स्टँपपेपरचा नंबर एसी ७१८६५ असा दिसतोय. हा करार 6 जुलै 2017 रोजी करण्यात आला. त्यावरील संजय अंधारींची सही आणि या करारावरील संजय अंधारी यांचा फोटो संजय अंधारी यांचा नसून किशोरी पेडणेकर ज्यांना भाऊ म्हणत होत्या त्या सुनील कदम यांचा आहे हे आता सिद्ध झाले आहे. यासंबंधात वांद्रे पूर्व येथील निर्मल नगर पोलीसठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात आता एसआरएने चौकशी सुरू केली आहे. एसआरएने डिसेंबर 22मध्ये किशोरी पेडणेकर तसेच किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि. कंपनीला नोटीस दिली. पेडणेकर परिवाराने एसआरएला सांगितले की संजय अंधारी यांनी ही जागा किश कॉर्पोरेट कंपनीला लिव्ह अँड लायसन्स करारावर दिली आहे. त्यांनीही लिव्ह अँड लायसन्स कराराची प्रत डिसेंबर 22मध्ये झोपडपट्टी प्राधिकरणाला दिली. हा लिव्ह अँड लायसन्स करार शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर क्रमांक ९३४३२२ यावर झाला आहे. हा करार 12 ऑगस्ट 2017 रोजी संजय अंधारी आणि किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि.मध्ये झाला असे दिसते. या करारावरील संजय अंधारी यांची सही आणि फोटो हा अगदी वेगळाच आहे. म्हणजे किशोरी पेडणेकर परिवाराने एकच गाळा गोमाता जनता एसआरए इमारत क्रमांक एक गाळा तसेच कार्यालय क्रमांक चार एकाचवेळी लायसन्सच्या दोन कराराच्या प्रति वेगवेगळ्या सरकारला दिले आहेत. भारत सरकारला दिलेल्या करार हा सहा जुलै 2017 रोजी झाला आहे असे दाखवण्यात आले आहे व महाराष्ट्र सरकारला दिलेला करार 12 ऑगस्ट 2017 रोजी झाला आहे असे दाखवण्यात आले आहे. एकाच जागेचे एकाच वेळचे त्याच दोन व्यक्तींमध्ये झालेल्या कराराच्या बोगस प्रति फक्त शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेतेच देऊ शकतात, असा आरोपही किरीट सोमय्या यांनी यावेळी केला.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content