‘आहेस आमुचा तू’ म्हणू दे किती कुणीही;
येथे तसे कुणाचे नसते खरे कुणीही!
आहेत सर्व माझे मी ही सदा तयांचा;
सारे खरे परंतु अपुले नव्हे कुणीही! (अप्पा दळवी)
महाराष्ट्राच्या राजकारणात कवितेच्या या ओळी वारंवार आठवाव्या असे प्रसंग दुर्दैवाने वर्ष/सहा महिन्यात कुठल्या ना कुठल्यातरी राजकीय पक्षात घडत असतात असे दिसून येत आहे. सुमारे १५ दिवसांपूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नेमणूक झाली होती. त्याचवेळी अजितदादा पवार यांनी राज्यात मुक्त हस्ते काम करण्याची मुभा मागितली होती. त्यानंतर त्यांनी स्वतः आपले विरोधी पक्षनेतेपद सोडण्याची तयारी दर्शविली होती. या सर्व गोष्टींना उणेपुरे १५ दिवसही उलटत नाहीत तोच अजितदादांनी थोरल्या पवारांविरूद्ध थेट बंडच केले आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामीलच झाले. गेल्या सहा महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात याची चर्चा होतीच. काल या चर्चेला विराम मिळाला आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या काही ज्येष्ठ नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. सहाजिकच आता विधानसभा अध्यक्षांकडे लढाई सुरू होईल कारण शरद पवार यांनीच न्यायालयात जाण्याऐवजी मी लोकांकडे जाईन असे जाहीर केलेले आहे.
आपण शरद पवार यांचा पक्ष फोडला असा कितीही आनंद मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस व्यक्त करत असले तरी राजकीय अगतिकतेतूनच अजितदादांचा वेगळा गट सरकारमध्ये सामील झालेला आहे. ज्या पक्षाचा सर्वोच्च नेता दोनच दिवसांपूर्वी सर्वात मोठा भ्रष्टाचारी पक्ष असे ज्या राजकीय पक्षाला संबोधतो त्याच पक्षातील ‘माणिकां’ना बहुमानाचे उच्च पद देतो यात राजकारणच जास्त आहे, बाकी सर्व झूट आहे हे जनतेला सर्व माहीत आहे. भारतीय जनता पक्षासमोर सध्या फक्त येत्या वर्षी होणारी लोकसभा निवडणूक आहे. त्यातूनच अशा प्रकारचे राजकीय समझोते होत राहणार आहेत. सध्याच्या घडीला विविध महापालिकांच्या आणि विधानसभा निवडणुकाही भाजपच्या समोर नाहीत. लक्ष्य आणि तेही एकच लक्ष्य लोकसभा हेच आहे. देशाची सत्ता मिळली की सीबीआय, ईडी आणि आयकर खाते विनासायास आपल्या हातातच येते. म्हणूनच सध्या विरोधकांना चुचकारायचे धोरण दिल्लीत आखले गेले आहे. (उद्या दिल्लीश्वराचा एखादा गुप्त दूत मातोश्रीवर गेला तर नवल वाटायला नको.) राजकारणाचा हा एक भाग ठरलेला आहे. मात्र तो जनतेला किती रुचेल हे निवडणुकीतच दिसणार आहे.

देशातील विरोधी पक्षांचे मिलन होईल की नाही याबाबत आताच काही सांगणे मुश्किल आहे. परंतु सध्या त्यांच्यामधील विसंवाद पाहता एकी होणे जरा कठीणच आहे. थोरल्या पवारांचा दादांवर विश्वास का नाही किंवा दादांनी असा काय गुन्हा केला की दादांबाबत थोरले पवार कधीच कौतुकाचा शब्द उच्चारत नाहीत हे एक कोडेच आहे. दादांची प्रशासनावर पकड आहे, निर्णयक्षमता पुरेपूर आहे, पक्षातही चांगला वचक आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत बसून काम करण्याची ताकद आहे. आता राजकीय नेत्याला आणखी काय हवे? असे सर्व असूनही दादांचे मीठ थोरल्या साहेबांना ‘अळणी’ का वाटते? सुप्रियाच्या अंगणात फुले का? आणि दादांना काटे का? हे केवळ रक्ताच्या नात्यामुळेच असे जे भासवले जात आहे त्यात माझ्या मते तेव्हढेसे तथ्य नसावे. दोघांनी मागे कधीतरी एकमेकांना चांगलीच ‘ठेस’ पोहोचवली असेल, असे सूत्रांनी सूचित केले. पार्थ पवार यांच्या तिकिटावरूनही झालेला वाद राज्याने पाहिलेला आहे. या राजकीय वादातचे अजूनपर्यंततरी वैशिष्ट्य आहे की दोन्ही बाजूंनी वादात सभ्यता पाळलेली आहे. हल्ली हे जरा दुर्मिळच झालेले असल्याने त्याचा मुद्दामहून उल्लेख केला.
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे वळूया. अजितदादांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाने तसेच त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिल्याने शिंदे गट नाराज आहे हे उघड सत्य आहे. त्यांच्या आणि त्यांच्याबरोबरच्या सहकाऱ्यांविरूद्ध विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित असलेल्या सुनावणीचा निकाल काहीही लागो शिंदे यांचा गट बराचसा निराश असल्याचे त्यांच्या हालचालींमुळे लगेचच कळते. देवेंद्रभाऊंनी दोन-अडीच महिन्यांपूर्वी २२५चा आकडा जाहीर केला होता. त्यानंतर ते एकदम १५०वर घसरलेले दिसले. आता तर ते १२५पर्यंत खाली आलेले आहेत. त्यातच केंद्र सरकार समान नागरी कायद्याचे नगारे वाजवत आहे. त्या नगाऱ्याला उत्तरेत काही प्रमाणात यश मिळेलही. परंतू सर्व देशभर त्याचे स्वागत मुळीच केले जाणार नाही. मुळात सध्या ही मंडळी जनतेची मते मागवित आहेत. मत मागवणे म्हणजे कायदा झाला असे नाही हे जनतेला अजून उमगलेले नाही.
राज्यातील सध्याचे राजकारण पाहता पुढील ओळी चटकन आठवतात-
“जगणे नुसते, नुसते जगणे
काट्यामागून पळत राहणे;
वळती सारे तिथेच वळणे
वळणाशी ना कधी बोलणे! (अप्पा दळवी)
किंवा
“नका.. मला डिस्टर्ब करू नका:
मी माझी पाठ खाजवतोय,
आत्मचरित्र लिहितोय
खोदकाम चालू आहे,
मी मला शोधतोय;
परोपकारी अंधार
मला शोधतोय
मला प्रकाशाकडे नेतो आहे” (शांततामय)
जन हो, तुम्हालाच यातून वाट काढायची आहे…

