Homeडेली पल्सबाळासाहेबांनी पद दिले.....

बाळासाहेबांनी पद दिले.. काढून घेतले.., असे का म्हणाले मनोहर जोशी?

पूर्वीच्या कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातील नांदवी या खेडेगावात गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊन माधुकरी मागून, वारावर जेवून, वडिलांबरोबर भिक्षुकी करुन, नोकरी करीत, ‘कमवा आणि शिका’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारा, शिक्षणासाठी निरनिराळ्या ठिकाणी भटकत भटकत मुंबईत स्थिरस्थावर होऊन मुंबई महापालिकेत लिपिकाची नोकरी करणाऱ्या आणि त्याच महापालिकेच्या महापौरपदी विराजमान झालेला तसेच पक्षनिष्ठेचा आदर्श ठेवीत नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री ते लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचणारा अस्सल मराठमोळा ‘चाणक्य’ राजकारणी अशी ओळख महाराष्ट्र नव्हे तर देशपातळीवर निर्माण करणारा राजकारणी म्हणजेच मनोहर जोशी!

शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्वाने प्रभावीत झालेल्या मनोहर जोशी यांनी १९६७ साली शिवसेनेत प्रवेश करीत राजकारणात स्वतःला झोकून दिले. इयत्ता चौथी पर्यंत नांदवी, पाचवीला महाड, सहावीनंतर मामाकडे पनवेलला, मामांची बदली झाल्यामुळे गोल्फ मैदानात बॉयची नोकरी करीत मित्राबरोबर भाड्याच्या घरात राहिले. महाजन बाईंकडे वारावर भोजन केले. मग मुंबईत बहिणीच्या घरी अकरावीच्या शिक्षणासाठी आले. सहस्रबुद्धे क्लासमध्ये शिपायाची नोकरी करुन शिक्षण पूर्ण केले.

कला शाखेची पदवी कीर्ती महाविद्यालयातून मिळविली. वयाच्या २७व्या वर्षी एम.ए.एल.एल.बी. झाले. मुंबई महापालिकेत लिपिकाची नोकरी करताकरता १९६४ साली ते विवाहबद्ध झाले. मनोहर जोशी यांनी उद्योजक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून काही व्यवसाय केले पण दूध, फटाके, हस्तीदंती वस्तूंच्या विक्रीमध्ये अपयश आले. पण, ‘अपयश हीच यशाची पायरी असते’, त्याप्रमाणे मनोहर जोशी यांनी २ डिसेंबर १९६१ रोजी कोहिनूर क्लास सुरू केला. या क्लासचे रुपांतर कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये झाले. नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हायला हवे, हा मूलमंत्र मनोहर जोशी यांनी दिला.

१९६७ साली शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हां हां म्हणता मनोहर जोशी यांनी संसदीय लोकशाहीच्या एकेक पायऱ्या पादाक्रांत करण्यास सुरुवात केली. मुंबई महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून पाऊल टाकले. १९७६ ते १९७७ यावर्षी मनोहर जोशी महापौर झाले. या एका वर्षात त्यांनी ‘सुंदर मुंबई, हरित मुंबई’ ही संकल्पना राबविताना स्वच्छतेचा मंत्र दिला. सर्वसाधारणपणे माणूस कचराकुंडीत, कचरा टाकण्यासाठी जाताना लांबूनच कचरा फेकतो आणि मग तो कचरा कुंडीच्या आजूबाजूला पडतो. ‘एक पाऊल’ पुढे टाकले तर तो कचरा बरोबर कुंडीत पडेल, ही त्यांची संकल्पना यशस्वी झाली.

मुंबई महापालिकेकडून मनोहर जोशी यांनी आपला मोर्चा विधानभवनाकडे वळविला आणि महाराष्ट्र विधानपरिषदेवर सदस्य म्हणून तीन वेळा निवडून गेले. मनोहर जोशी, प्रमोद नवलकर आणि सुधीर जोशी ही त्रिमूर्ती इथून पुढे महाराष्ट्रात गाजू लागली. भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद महाजन यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेत शिवसेना भाजप ही हिंदुत्वाच्या आधारावरची युती घडवून आणली. त्यामुळे १९९० साली शिवसेनेचे ५२ आणि भाजपचे ४२ आमदार विधानसभेत निवडून आले. यावेळी मनोहर जोशी यांची बाळासाहेब ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली.

१९९१ साली छगन भुजबळ यांच्या समवेत १५ आमदारांनी शिवसेना सोडून काँग्रेस प्रवेश केला, त्यामुळे विधानसभेत शिवसेनेचे विरोधी पक्षनेतेपद भाजपच्या गोपीनाथ मुंडे यांच्याकडे गेले. १९९०-१९९१ हे एक वर्ष विरोधी पक्षनेते राहिलेल्या मनोहर जोशी यांना मुंबई उच्च न्यायालयातील निकाल त्यांच्याविरोधात गेल्यामुळे आमदारकी सोडावी लागली. १९९५ साली पुन्हा शिवसेना आणि भाजप युती विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आणि १९९० साली थोडक्यात हुकलेली युतीची सत्ता १९९५ साली आली. १४ मार्च १९९५ रोजी अरबी समुद्राच्या आणि विराट जनसागराच्या साक्षीने अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवतीर्थावर मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

महाराष्ट्रात १९७८नंतर पुन्हा एकदा बिगर काँग्रेसचे सरकार आले. संयुक्त महाराष्ट्र जरी १ मे १९६० रोजी स्थापन झाला असला तरी महाराष्ट्रातील प्रशासन चालविणाऱ्या मंत्रालयात कामकाजाची भाषा म्हणून ‘मराठी’ भाषेला स्थान मिळाले नव्हते. राज्याचा प्रत्येक मुख्य सचिव मराठी भाषेत कामकाज करण्यासाठी मुदतवाढ मागत होते आणि दरवेळी ती मिळत होती. परंतु अशीच एक नस्ती (फाईल) मनोहर जोशी यांच्यासमोर येताच ती त्यांनी भिरकावून देत १ मे १९९५ पासून मराठी भाषेत कामकाज सुरू झालेच पाहिजे, असा सुस्पष्ट आदेश दिला. जोशी-मुंडे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने ‘बॉम्बे’चे ‘मुंबई’ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मंजूर करण्यात आला.

१९७४ साली कृष्णा खोऱ्याचे ५४० टीएमसी पाणी अडविण्यासाठी करार होऊनही १९९५पर्यंत हा करार प्रत्यक्षपणे पुढे सरकू शकला नव्हता. पण जोशी-मुंडे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने पाच हजार कोटी रुपयांचे रोखे काढून स्वतंत्र कृष्णा खोरे महामंडळ स्थापन करुन पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा सुजलाम सुफलाम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल टाकले. मुंबईमध्ये पंचावन्न उड्डाणपूल, मुंबई-पुणे द्रूतगती महामार्ग, वांद्रे वरळी सागरी सेतू असे अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावताना मुंबईतील पायाभूत सुविधांचा पाया रचला. ‘महापौर परिषद’संबंधी निर्णय घेऊन राज्यातील महापालिकेच्या महापौरांच्या अधिकाराचा एक चांगला निर्णय घेतला. एक रुपयात झुणका भाकर ही योजना अंमलात आणली. तत्कालीन राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांनाही या झुणका भाकरीचा स्वाद मनोहर जोशी यांनी चाखायला लावला आणि त्यांनाही तो आवडला होता. दुर्दैवाने राजकीय परिपक्वतेअभावी नंतर या दोन योजना अपयशी ठरल्या.

मनोहर

मनोहर जोशी हाडाचे शिक्षक असल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ‘वर्षा’ या निवासस्थानी प्रौढ साक्षरतेचे वर्गही भरविले. इतकेच नव्हे तर शाळा/ महाविद्यालयांच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी चक्क विद्यार्थ्यांचे वर्गही घेतले. १९९९पर्यंत मनोहर जोशी यांनी तारेवरची कसरत करत मुख्यमंत्री म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, स्मिता ठाकरे, भाजप नेते प्रमोद महाजन, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, सरकारला समर्थन देणारे ४५ अपक्ष आमदार, या सर्वांना सांभाळून चार वर्षे कारकीर्द यशस्वी करुन दाखविली. क्रिकेटवरील प्रेमामुळे मनोहर जोशी यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदही भूषविले. मुंबईतील दंगल आणि बॉम्बस्फोट याची चौकशी करणाऱ्या न्या. बी. एन. श्रीकृष्ण यांचा अहवाल विधिमंडळाच्या सभागृहात मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी फेटाळून लावला.

अयोध्येतील राममंदिर प्रकरणातसुद्धा मनोहर जोशी उत्तर प्रदेशमध्ये पोहोचले होते. महाराष्ट्रातील राजकीय चौकट मनोहर जोशी यांच्या प्रभावशाली राजकारणी नेत्याला अपुरी पडू लागली आणि राष्ट्रीय पातळीवरचे राजकारण त्यांना खुणावू लागले. त्याला कारणही तसेच घडले. १९९९ साली मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना पत्रकारांनी विचारले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आपण कारण विचारणार नाही का? त्यावर पटकन उत्तर देताना मनोहर जोशी म्हणाले की, मला जेव्हा बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केले तेव्हा मी त्यांना, “साहेब, मला मुख्यमंत्री का करीत आहात? असे विचारले नव्हते. त्यांनी पद दिले आणि त्यांनी काढून घेतले, यात विशेष काय? असा प्रतिसवाल करुन सरांनी पत्रकारांना निरुत्तर केले. इतकेच नव्हे तर राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केल्यानंतर तत्काळ मनोहर जोशी अनघा वहिनींसमवेत टॅक्सीने वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडून दादरच्या ओशियाना, या निवासस्थानी निघून आले.

मनोहर जोशी यांना १९९९ साली उत्तरमध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून दिल्लीच्या राजकारणात जाण्याची संधी मिळाली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात आधी अवजड उद्योग मंत्री म्हणून मनोहर जोशी यांची वर्णी लागली. त्यांनी या खात्याला वेगळे महत्त्व प्राप्त करून देतानाच हे खाते दुय्यम नाही, हे दाखवून दिले. दुर्दैवाने लोकसभेचे अध्यक्ष जी. एम. सी. बालयोगी यांचे निधन झाले. चाणाक्ष प्रमोद महाजन यांनी चतुराई दाखवीत अटलबिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेत सल्लामसलत करुन मनोहर जोशी यांना थेट लोकसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध विराजमान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दादासाहेब मावळणकर, शिवराज पाटील यांच्या रांगेत मनोहर जोशी यांना स्थान मिळाले. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत मनोहर जोशी यांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे चित्रकर्त्या चंद्रकला कदम यांनी तयार केलेले तैलचित्र लावून एक ऐतिहासिक भूमिका पार पाडली.

संसदीय लोकशाहीमधील राजशिष्टाचाराप्रमाणे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्यानंतरचे पद मनोहर जोशी यांना प्राप्त झाले. यावेळी महाराष्ट्र विधिमंडळात मनोहर जोशी यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तेव्हा मनोहर जोशी यांचे राजकीय विरोधक छगन भुजबळ यांनी मनोहर जोशी यांचा गौरव करताना, “नशीब नशीब नशीब काय म्हणतात ना ते नशीब म्हणजेच मनोहर जोशी! ते उद्या देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती जरी झाले तरी मला आश्चर्य वाटणार नाही, असे उद्गार काढले होते. ‘शिवसेनेची निर्मिती, वाढ, स्वरुप, यशापयश आणि भारतीय राजकारणातील शिवसेनेचे भवितव्य यांचा विश्लेषणात्मक अभ्यास’ या विषयावर मनोहर गजानन जोशी यांनी वयाच्या ७२व्या वर्षी मुंबई विद्यापीठाकडे प्रबंध दिला, पीएचडी पूर्ण केली आणि प्रिन्सिपॉल मनोहर जोशीचे डॉ. मनोहर जोशी झाले.

राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात डॉ. मनोहर जोशी यांनी सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे. आपल्या मितभाषी स्वभावामुळे मनोहर जोशी यांनी सर्व पक्षांमध्ये असलेले नेते मित्रत्वाने जोडले आहेत. म्हणूनच लोकसभेच्या अध्यक्षपदी असताना झालेल्या लोकसभा निवडणुकीत लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. रघुवंश प्रसाद यांनी, “श्रीमान मनोहर जोशी सर को निर्विरोध चुन कर देनेकी जरुरत है।” असे उद्गार काढले होते. या सुसंस्कृत चाणक्य नेत्याने आपल्या वयाची 84 वर्षे दोन दिवसांपूर्वीच पूर्ण करून 85व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य लाभो ही प्रार्थना!

Continue reading

‘अंगूरी भाभी’ने लावलेले लैंगिक छळाचे आरोप खोटे!

प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिका 'भाभीजी घर पर हैं'मधील 'अंगूरी भाभी' या लोकप्रिय भूमिकेसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने एका जुन्या आणि वादग्रस्त प्रकरणावर नुकताच एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. २०१६मध्ये या मालिकेतून अचानक बाहेर पडल्यानंतर, शिल्पाने मालिकेचे...

कॅनडाच्या ‘कॉन्स्टेलेशन’कडून पुण्यातल्या ‘पिओसिट’चे अधिग्रहण

सॉफ्टवेअर क्षेत्रातील एक मोठी आणि महत्त्वाची व्यावसायिक घडामोड समोर आली असून, कॅनडातील नामांकित 'कॉन्स्टेलेशन सॉफ्टवेअर' (सीएसआय) या कंपनीने भारतातील 'पिओसिट सॉफ्टवेअर सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीचे अधिग्रहण केले आहे. या महत्त्वपूर्ण करारामुळे जागतिक सॉफ्टवेअर बाजारपेठेत दोन्ही कंपन्यांचे स्थान अधिक...

भोर ईंण्डस्ट्रीजच्या कामगारांना मिळाला न्याय!

कंपनी व मान्यताप्राप्त संघटना यांच्यात झालेल्या समझोत्यामुळे संबधित कामगारांचे हक्क संपुष्टात येत नाहीत, असा निकाल देत औद्योगिक न्यायालय, पुणे यांनी भोर ईंण्डस्ट्रीजने तीन महिन्यांच्या आत कामगारांना नुकसानभरपाई अदा करावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. याप्रकरणी, कामगारांच्यावतीने उदयोन्मुख वकील...
Skip to content