Thursday, September 19, 2024
Homeमाय व्हॉईसअमेरिकेत कोण ठरणार...

अमेरिकेत कोण ठरणार भारी? कमला हॅरीस की डोनाल्ड ट्रंप??

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा लोकसंख्येच्या मानाने आपल्यापेक्षा कितीतरी लहान पण भौगोलिक आकारात आपल्यापेक्षा किती तरी मोठा देश आहे. त्याचवेळी जगातील सर्वात श्रीमंत देशही अमेरिकाच ठरतो. त्यांच्या अर्थव्यवस्थेचा आकार आपल्यापेक्षा दशपटींनी अधिक भरतो. आपण जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था आहोत, तर अमेरिका ही जगातील दोनशेहून अधिक वर्षांची, सर्वात जुनी, लोकशाही व्यवस्था आहे. नोव्हेंबरमध्ये येथे होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? कमला हॅरीस की डोनाल्ड ट्रंप?

भारतात निवडणुका होतात तेव्हा सुमारे 100 कोटी लोक मतदान करतात. आपली लोकसंख्या आजच्या घडीला 143 कोटींच्या पुढे गेलेली आहे. अमेरिकेत आजमितीला जेमतेम 34 कोटी 54 लाख लोक राहतात आणि त्यातील सोळा कोटी चौदा लाख इतकेच लोक मतदार म्हणून नोंदलेले आहेत. त्यातील प्रत्यक्षात मतदान करणाऱ्यांचे प्रमाण सत्तर टक्के इतकेच असू शकते. म्हणजेच केवळ दहा-बारा कोटी लोकांनी निवडून दिलेला नेता आज जगावर राज्य करण्याच्या स्थितीत पोहोचतो!

दर चार वर्षांनी होणाऱ्या अमेरिकन सार्वत्रिक निवडणुका, या एकाचवेळी त्या देशातली पन्नास राज्यांच्या कारभाराचे व अमेरिका या देशाचे नेतृत्त्व ठरवते. पण या अध्यक्षीय निवडीबरोबरच  जगाचेही नेतृत्त्व करण्याची, जगातील लोकशाही व्यवस्थांचे रक्षण, संगोपन करण्याची आणि जगात कुठेही युद्ध घडवण्याची तसेच युद्ध थांबवण्याची क्षमता असणारी व्यक्ती निवडली जाते. या सर्व दृष्टीने अमेरिकेत सध्या सुरु असणाऱ्या साठाव्या अध्यक्षीय निवडणुकीचे महत्त्व जगभरात मोठे आहे. भारतालाही अमेरिकेचे नेतृत्त्व कोणाकडे जाणार याची उत्सुकता व थोडीफार चिंताही नक्कीच आहे.

कमला

तिथे दोन प्रमुख पक्ष निवडणुकीत उतरत असतात. डेमोक्रॅटिक व रिपब्लिकन. कमला हॅरिस या, भारतीय वंशाची आई व जमैकन पित्याची लेक असणाऱ्या, कृष्णवर्णीय आशियायी-आफ्रिकन वंशाच्या प्रथितयश वकीलबाई सध्या डेमोक्रॅटिक पक्षातर्फे राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरल्या आहेत. त्यांच्याविरोधात उभे आहेत रिपब्लिकन पक्षाचे नेते व बायडेन यांच्याआधी 2016 ते 2020 या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिलेले डोनाल्ड ट्रंप. ट्रंप हे स्वतः अब्जाधीश उद्योजक आहेत. अमेरिकेतील उजव्या विचारसरणीचे ते प्रतिनिधित्व करतात. जगभरात त्यांचा इमारत बांधकामाचा मोठा व्यवसाय सुरु आहे. पुण्यात, बेंगळुरूमध्ये, दिल्लीत ट्रंप टॉवर नावाने त्यांच्या व्यावसायिक इमारती उभ्या आहेत.

हॅरीस या गेली चार वर्षे जो बायडेन यांच्या अध्यक्षीय काळात अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. नवीन अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर जानेवारीत त्यांनी अधिकारपदे ग्रहण करेपर्यंत बायडेन व हॅरीस हे राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष राहणार आहेत. नवीन अध्यक्षांची निवड झाल्यानंतर दोन-तीन महिने अमेरिकेत अशी जुन्या राष्ट्राध्यक्षांचीच राजवट सुरु राहते. हेही एक तिथल्या निवडणुकीचे निराळेपण आहे. इथे अध्यक्षपदाची निवड अप्रत्यक्ष मतदानाने होते. म्हणजे सर्वसाधारण मतदार हा ट्रंप वा हॅरीस यांना मतदान करतो. पण त्यातून त्या-त्या राज्यातील अध्यक्षीय निवडणुकीतील प्रतिनिधींची निवड होते. प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येनुसार त्याच्या प्रतिनिधींची संख्या ठरलेली असते. देशभरातील एकूण 271 प्रतिनिधी मते जो उमेदवार घेतो तोच अध्यक्ष ठरतो. मग त्याला सर्वसाधारण देशभरात पडलेली एकूण मते दुसऱ्या उमेदवारापेक्षा कमी जरी पडलेली असली तरीही प्रतिनिधींच्या मतांमध्ये बहुमत मिळवणाराच अध्यक्ष ठरतो.

कमला हॅरीस अध्यक्षपदी आल्या अथवा ट्रंप जिंकले, तर या दोघांपैकी कोणाचा अधिक लाभ भारताला होईल हा प्रश्न सध्या देशात चर्चेत आहे. कमला हॅरीस यांचा अनुभव भारताला चांगला आहे. पण बायडेन यांच्याआधी अमेरिकेचे अध्यक्षपद सांभाळणाऱ्या डोनाल्ड ट्रंप यांचे व भारतातील सध्याचा राज्यकर्ता पक्ष भाजपा व पंतप्रधान मोदी यांचे संबंध अधिक गहिरे होते. ट्रंप अध्यक्ष बनले तेव्हा त्यांनी अमेरिकेत येऊन नोकऱ्या करणाऱ्या, व्यवसाय करणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात कडक धोरणे स्वीकारली.

भारतातील लाखो लोक गेली तीस-चाळीस वर्षे वा त्याहूनही अधिक काळ अमेरिकेत राहत आहेत. काम करत आहेत. डॉक्टर, वकील अशा व्यवसायात प्रगती करत आहेत. आयटी क्षेत्रात सर्वाधिक प्रगतीपथावर अमेरिकेचे भारतीय वंशाचे लोकच आहेत. अमरिकेतील सर्व महाकाय टेक्नो कंपन्यांचे अध्यक्ष वा कार्यकारी प्रमुख पदांवर भारतीय जन्माच्या व्यक्ती असण्याचा योग अलिकडे अनेकदा आलेला आहे. त्यामुळे भारतातून अमेरिकेत जाऊन यश, पैसा, नशीब कमावण्याची इच्छा बाळगणाऱ्या मोठ्या वर्गासाठी व्हिसा, अमेरिकेचे ग्रीन कार्ड व नगारिकत्व मिळवण्याच्या संधी यावर गदा येणार असेल तर ते राष्ट्राध्यक्ष भारतासाठी नक्कीच फायदेशीर ठरणारे नाहीत. हॅरीस यांच्यापेक्षा ट्रंप यांची या विषयातील धोरणे भारतियांना हानीकारक ठरण्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी चीन व पाकिस्तानविषयी भारताच्या धोरणाला अमेरिकेचा उघड पठिंबा ट्रंपच्या काळात मिळत होता हेही खरे आहे.

याउलट कमला हॅरीस यांच्या आई चेन्नईमध्ये जन्मल्या. पण त्यांचे वडील दक्षिण अमेरिकेतील कृष्णवर्णीय जमैकन होते. त्यांचे अपत्य कमला यांचे फक्त नाव भारतीय आहे इतकेच. बाकी त्या पूर्णतः अमेरिकन महिला आहेत. त्यांना जगाचे स्वातंत्र्य व लोकशाहीची मूल्ये यांच्या रक्षणाचे कंकण बांधायचे आहे. त्यांच्या लेखी काश्मीरचा मुद्दा भारताच्या विरोधात जाणारा ठरतो. इथे लोकशाहीचा संकोच होत आहे, असे मत त्यांनी संसद सदस्य असताना अनेकदा प्रकट केले होते. त्यांची संभाव्य अध्यक्षीय कारकीर्द भारतासाठी थोडी चिंतेची बाब ठरू शकते. भारतियांना त्यांच्याविषयी जितके ममत्व वाटते तितकी आपुलकी त्या भारत वा भारतीय प्रश्नांसंदर्भात दाखवत नाहीत हेही खरेच आहे.

सध्या जो बायडन यांनी सोडून दिलेली अध्यक्षीय निवडणुकीची लढाई लढण्याची जबादारी हॅरीस जिद्दीने व त्वेषाने लढत आहेत. 4 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या मतदानात अमेरिकेच्या अध्यक्षपदावर पुन्हा एकदा डेमोक्रॅटिक पक्षाचा झेंडा हॅरीसच फडकवतील अशी अपेक्षा सध्या अमेरिकत व्यक्त होत आहे. कारण नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या अध्यक्षीय वादविवाद सभेत त्यांनी स्पष्ट बाजी मारलेली आहे. ट्रंप व बायडेन यांच्यात जून अखेरीकडे अशी वादसभा पार पडली होती. त्यात बायडेन अडखळत होते. चाचपडत होते व ट्रंप त्यांना झोडून काढत होते, हे जगाने पाहिले. त्यानंतरच डेमोक्रॅटिक पक्षाने बायडेन यांना लढतीमधून निवृत्त होण्याचा सल्ला दिला व तो त्यांनी जुलैअखेरीकडे मान्य केला. त्यांनी हॅरीस यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर माजी अध्यक्ष बराक ओबामा, क्लिंटन पती-पत्नी अशा सर्व डेमोक्रॅटिक नेतृत्त्वाने हॅरीस यांना पुढे करण्याचे ठरवले. पक्षाने त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर दुसरी अध्यक्षीय वादसभा पार पडली.

1960पासून अमेरिकेत अध्यक्षपदाच्या प्रमुख उमेदवारांमध्ये जाहीर वादविवाद सभा घेतल्या जातात. त्यातून उमेदवारांची राष्ट्रीय प्रश्नांसंदर्भातील, धोरणात्मक विषयांतील मते प्रकट होतात. या वादसभेचे नियमन केलेले असते व कोणीही वावगं, वेडेवाकडे बोलणार नाही, हेही पाहिले जाते. त्याचे लाईव्ह टेलिकास्ट होते. युट्यूब व अन्य समाजमाध्यमांतून ही वादसभा लाईव्ह दाखवली जाते व जनता कोणता उमेदवार बरा आहे हे ठरवते. मतदानापूर्वी अशा दोन वा अधिक वादसभा अमेरिकेत महत्त्वाच्या शहरांत घेतल्या जातात. फिलाडेल्फियात परवा झालेल्या वादसभेत हॅरीस यांनी ट्रंप यांचा धुव्वा उडवला, असे मत अमेरिकन माध्यमांनी नोंदवले आहे. हॅरीस यांचे पारडे जड झालेले असताना ट्रंप यांनी तिसऱ्या वादसभेचे आव्हान धुडाकावून लावला आहे. सध्या साठःचाळीस या प्रमाणात जनमत कमला हॅरीस यांच्या बाजूने झुकल्याचे सांगितले जाते. पण प्रत्यक्ष मतादनापर्यंत हे चित्र बदलूही शकते. काय होतेय याची उत्सुकता जगाप्रमाणेच भारतालाही लागून राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

विरोधकांसाठी आजही ‘दिल्ली बहोत दूर है’!

दिल्लीत गेली बारा वर्षे आम आदमी पक्षाचेच राज्य आहे. अरविंद केजरीवाल या पक्षाचे संयोजक व सर्वोच्च नेते असून तेच दिल्लीच्या गादीवर राज्य करत आहेत. सरत्या सप्ताहात त्यांनी दीर्घकाळ गाजवलेले मुख्यमंत्रीपद सोडण्याची घोषणा केली. त्यामुळे सहाजिकच राजधानीच्या राजकारणात मोठीच खळबळ...

25 वर्षांपूर्वी मसूदने केलेल्या भारतीय विमान अपहरणामागचे वास्तव!

आयसी 814 विमानाच्या अपहरणाला पंचवीस वर्षे उलटून गेल्यानंतर आता त्या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. विविध भारतीय गुप्तचर यंत्रणांतील माजी प्रमुख अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणात आपल्याकडून काय काय चुका झाल्या, याचे पाढेही वाचायला सुरूवात केली आहे. या चर्चेचे निमित्त...

शरद पवार: पेटवणारे की विझवणारे?

महाराष्ट्राच्या राजकारण शरदश्चंद्र गोविंदराव पवार यांचे मोठे महत्त्व आहे, हे त्यांचे कट्टर शत्रूदेखील मान्यच करतात. आणि साहेबांना जितक्या मोठ्या संख्येने मित्र आहेत, तितक्याच मोठ्या संख्येने शत्रूदेखील आहेतच, हे ते स्वतःही मान्य करतील! पण त्यांची भूमिका नेमकी कोणती असते? काय...
error: Content is protected !!
Skip to content