रिलायन्स आणि डिस्नेने नुकतेच जियो सिनेमा आणि डिस्ने प्लस हॉटस्टार कंटेंट लायब्ररी एकत्र करून जियो-हॉटस्टार लाँच केले आहे. त्यामुळे दोन्ही प्लॅटफॉर्मचे विद्यमान ग्राहक त्यांचे प्लॅन कायम ठेवू शकतात का? ज्यांना जियो-हॉटस्टार वापरायचे आहे, त्यांचे काय? JioHotstar विलीनीकरणानंतर JioCinema, Disney+ Hotstar च्या जुन्या ॲप, वेबसाईट, सबस्क्रिप्शनचे काय होणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
रिलायन्स आणि डिस्नेचा एकत्रित जिओहॉटस्टार प्लॅटफॉर्म आता लाइव्ह झाला आहे. या नवीन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर जिओसिनेमा आणि डिस्ने+ हॉटस्टारच्या कंटेंट लायब्ररींना एकत्र केले गेले आहे. या विलीनीकरणामुळे भारतातील सर्वात मौल्यवान क्रीडाहक्क एकत्र एकाच प्लॅटफॉर्मवर आले आहेत, ज्यात इंडियन प्रीमियर लीग, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद स्पर्धा आणि इंग्लिश प्रीमियर लीग तसेच डिस्ने, वॉर्नर ब्रदर्ससारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्टुडिओमधील कंटेंटचा समावेश आहे. एचबीओ, एनबीसीयुनिव्हर्सल पीकॉक आणि पॅरामाउंट, सर्व एकाच छताखाली आले; पण, डिस्ने+ हॉटस्टार आणि जिओसिनेमाच्या विद्यमान ग्राहकांचे काय होणार? जर या ग्राहकांनी आता त्यांच्या जुन्या अॅप किंवा वेबसाइटद्वारे त्या जुन्या स्वतंत्र प्लॅटफॉर्मवर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर काय होते? विद्यमान ग्राहकांच्या मनातील या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
अॅप विलीन झाल्यामुळे, वापरकर्ते JioCinema आणि Disney+ Hotstar अॅप्स किंवा वेबसाइट्स आता स्वतंत्रपणे ॲक्सेस करू शकत नाहीत. म्हणून, जेव्हा जेव्हा तुम्ही या वेबसाइट्स स्वतंत्रपणे ॲक्सेस करण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा त्या आता नवीन JioHotstar साइटवर पुनर्निर्देशित केल्या जातील. दरम्यान, ज्या वापरकर्त्यांच्या फोनमध्ये आधीच डिस्ने+ हॉटस्टार ॲप आहे त्यांना हे ॲप आता नवीन JioHotstar लूकसह अपडेट केलेले आढळेल. ॲपवर टॅप केल्याने मर्ज केलेले JioHotstar ॲप उघडेल. तथापि, ज्या वापरकर्त्यांच्या फोनवर JioCinema ॲप आहे, ते ॲप जसेच्या तसे पाहू शकतील आणि त्यावर “Watch on JioHotstar” असे बॅनर दिसेल. शिवाय, जेव्हा तुम्ही कोणत्याही कंटेंटवर क्लिक करता, तेव्हा ते आपोआप JioHotstar ॲपवर रीडायरेक्ट होईल आणि नवीन ॲपवर तेच तुम्हाला अपेक्षित कंटेंट दाखवू लागेल.
डिस्ने+ हॉटस्टार आणि जिओसिनेमा या दोन्हींचे विद्यमान सबस्क्रायबर्स त्यांचे प्लॅन आणि फायदे कायम ठेवू शकतील, परंतु आता त्यांना जिओहॉटस्टार ॲप वापरावे लागेल. जिओसिनेमाचे सदस्य अजूनही जुन्या ॲपमध्ये प्रवेश करू शकतात, परंतु सर्व सामग्री जिओहॉटस्टारकडे पुनर्निर्देशित केली जाईल. सक्रिय जिओसिनेमा सबस्क्रिप्शन असलेल्यांनी त्यांचा प्लॅन कालबाह्य होण्याची किंवा नवीन प्लॅटफॉर्मवर स्विच होण्याची वाट पाहवी. म्हणून, ज्या युझर्सनी आधीच या दोन्हींपैकी कोणत्याही एकाच्या प्लॅनचे सबस्क्रिप्शन घेतले आहे, त्यांचे सदस्यत्व गमावले जाणार नाही. ते त्यांच्या संबंधित प्लॅनची मुदत संपेपर्यंत JioHotstar मोफत वापरण्यास सक्षम असतील.
जिओहॉटस्टारचे नवीन प्लॅन हे बेसिक तीन महिन्यासाठी 149 रुपये यापासून ॲड फ्री प्रीमियम तीन महिन्याला 499 रुपयांपर्यंत आहेत. देशातील बहुतेक सर्व भाषांतील बहुतांश टिव्ही चॅनल्स, ओटीटी कंटेंटसह जगभरातील अनेक लोकप्रिय कंटेंट आता जिओहॉटस्टार या एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असल्याने मनोरंजनाच्या दुनियेतील स्पर्धा येत्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.