Homeमाय व्हॉईसजनरल नरवणेंच्या 'डेस्टिनी'ची...

जनरल नरवणेंच्या ‘डेस्टिनी’ची डेस्टिनी काय?

मुंबईच्या पुस्तक बाजारात देशात अद्याप प्रकाशित न झालेले पुस्तक उपलब्ध होण्याच्या अनेक वाटा आहेत. या देशात कधीही प्रकाशित होऊ न शकलेली पुस्तकेही येथे उपलब्ध असतात. काँग्रेस राजवटीतही प्रख्यात उद्योगपती धीरूभाई अंबानी यांनी आपले साम्राज्य कसे उभारले याची इथंबूत माहिती देणाऱ्या (लेखक अर्थातच परदेशीं) पुस्तकावरही बंदी आणण्यात आली होती हे चाणाक्ष वाचकांना आठवत असेलच! हल्ली तर इंटरनेटचा जमाना आहे. एका सेकंदात इकडची कॉपी तिकडे जाऊ शकते तर पुस्तकाची पाने इकडून तिकडे पाठवणे म्हणजे हातचा मळच जणू! माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी लिहिलेल्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकाने देशाच्या लोकसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला होता. गोंधळानंतर प्रकाशकांनी हे पुस्तक अद्याप प्रकाशित झाले नसल्याचे सांगून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्नही केल्याचे जनतेने पाहिले आहे. आमचे कोण कशाला ऐकेल.. तरीही सरकारला आमचे नम्र आवाहन आहे की, हे पुस्तक प्रकाशित होऊ द्यावे (आले मोठे शहाणे, सरकारला शिकवायला – मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून कुजबूज ऐकू आली.) सायबर कॅफेत जाऊन हजारो प्रती आणि तेही सर्व देशभर प्रसारित होण्यापेक्षा पुस्तक प्रकाशित होऊ देणे केव्हाही चांगलेच. महत्वाचे म्हणजे वाद-प्रतिवाद करण्यात सत्तारूढ पक्षांइतके विद्वान तरी अन्य पक्षांकडे आहेत काय? यातील प्रतिवाद म्हणजे परत परत तेच बोलणे नव्हे हे मात्र विद्वान मंडळींनी लक्षात घ्यावे.

नरवणे

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) काहीसे प्रेमात असलेल्या काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनीही जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचे तोंड भरून कौतुक केल्याचे समजते. थरूर यांनीच नव्हे तर इतर तीन-चार प्रमुख व्यक्तींनीही पुस्तक प्रकाशित होण्याआधी या पुस्तकाचे तोंड भरून कौतुक केल्याचे खात्रीलायकरित्या समजते. इतके कमी पडले म्हणूनच की काय प्रकाशकांनी प्रस्तावनेच्या आधी खास उल्लेख करून या प्रतिक्रिया अडकवल्या आहेत. थरूर म्हणतात- नरवणे यांनी आपल्या आत्मचरित्रात लष्कराने केलेल्या संघर्षाची योग्य शब्दात समीक्षा केली आहे. अंतर्गत संघर्ष कमीतकमी शब्दांत उभा केलेला आहे. आणि हे सर्व सर्वसामान्य वाचकांनाही कळेल अशा सोप्या भाषेत मांडलेले आहे. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना त्यांनी आवेशपूर्ण भूमिका न घेता विषद केल्या आहेत. नरवणे यांचे पुस्तक म्हणजे काहीही लपवाछपवी न करता केलेले प्रांजळ निवेदन म्हणजे ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ समजायला हरकत नाही, अशा शब्दांत माजी लष्करप्रमुख जनरल व्ही पी मलिक यांनी कौतुक केलें आहे, असं समजते. सेवेतील विविध टप्प्यात आलेले अनुभव व त्या आधारित केलेली व्यूहरचना यांची जणू काही दैनंदिनीच त्यांनी लिहिली आहे, असे वाटते. चीनबरोबर केलेला संघर्ष व गलवान खोऱ्यातील संघर्ष परिस्थिती अचूक शब्दांत कथन केली आहे. मनोज नरवणे यांना मिळालेले यश हे माझे एकट्याचे नाही, तर या यशाचा देशाला फायदा व्हावा या मताचे ते नेहमीच राहिलेले आहेत, असे गौरवपर शब्दांत जनरल मलिक यांनी पुस्तकाचे स्वागत केले असल्याचे समजते.

नरवणे यांनी आपल्या पुस्तकात भारताच्या लष्कराचा बदलेला चेहरा सर्वांसमोर योग्य शब्दांत आणला असल्याचे नमूद करून सिंगापूर येथील दक्षिण आशियाविषयक अभ्यास करणाऱ्या संस्थेचे प्रा. सी राजा मोहन यांनी नरवणे यांना शाबासकीच दिली आहे. नरवणे यांनी आपल्या पुस्तकात लडाखजवळील सीमा संघर्षाबाबत सखोल लिखाण केल्याने त्यांच्या लिखाणाला एक वेगळेच वजन प्राप्त झाले आहे. जगाला वाटत असेल की, मला टप्प्याटप्प्याने यश मिळाले. पण हे तितकेसे खरे नाही. यश मिळाले, सर्वोच्च पदही मिळाले. पण त्याची वाट सोपी नव्हती, असे स्वतः माजी लष्करप्रमुख नरवणे यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटल्याचे समजते. माझा जी हुजूरी किंवा दरवेळी सर सर करण्याचा स्वभाव नसल्याने मी काहीसा मागे पडत होतो. चमचेगिरी कधी जमलीच नाही. ‘येस सर, नो सर, थ्री बॅग्स फुल्ल’ असे जमले नाही, असं काहीसं त्यांनी विनोदाने म्हटले असल्याचे समजते. माझ्या या स्वभावामुळे मी काहीसा मागे पडलो. परंतु याने माझे अनुभव विश्वसमृद्ध झाले आणि कारकिर्दीत अनुभवासारखा फायदा कुठेच नसतो. लष्करात दाखल होताना कुणालाही स्वतः लष्करप्रमुख होईन असे वाटतं नसतं. तसंच माझंही झालं. म्हणूनच मी डेस्टिनी, दैव हा शब्द वापरला आहे. आणि या दैवामुळेच मला लष्करात फोर स्टार्स मिळाले, असं म्हटलं तर वावगं ठरू नये, असं जनरल नरवणे म्हणाले असल्याचे कळते. जयहिंद!

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Continue reading

नव्या महापालिका आयुक्तांचे स्वागत करताना…

मुंबईच्या पहिल्या महिला महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे मुंबईकरांच्या वतीने स्वागत करताना त्यांना मुंबईतल्या गिरगावातल्या 'हौदा'कडे बोट दाखवण्याची इच्छा नव्हती. परंतु त्या मुंबईच्या मेट्रो प्रकल्पाच्या प्रमुख होत्या. आजही तो अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडेच आहे, त्यामुळे हीच संधी घेतली म्हणाना. मुंबई...

लांब जटा.. टिळा-टोपी-माळा, अशा प्रतिमेला छेद देणारा भोंदू!

कॅप्टन नसलेल्या आणि इयत्ता दहावी नापास असलेल्या अशोक खरात नामक भोंदूबाबाच्या विविध कथांनी राज्यातील वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने सध्या भरून वाहत आहेत! तसे पाहिले तर आपल्या राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला बुवाबाजींनी ग्रासलेले आहे. कुठे आसाराम आहेत तर कुठे बाबा...

सत्यमेव जयते!

अलीकडे आपल्या सार्वजनिक व खासगी बँकामधील गैरप्रकारांची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. भविष्यात आणखीही येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे अशा सर्व प्रकरणाची एक खासियत आहे की, बँकेचे संबंधित अधिकारी वा संबंधित व्यवसायिक एकदा का न्यायालयात गेले की न्यायांचे 'दळण' सुरु...
Skip to content