Homeटॉप स्टोरीपंतप्रधान मोदींचा, स्वा....

पंतप्रधान मोदींचा, स्वा. सावरकरांचा अपमान सहन होणार नाही!

तुमच्या नेत्यांचा अपमान आम्ही कधीही केलेला नाही. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचादेखील आम्ही वेळोवेळी सन्मानच केला आहे. मात्र तुम्ही काय करताय? देशाच्या पंतप्रधानांचा, नरेंद्र मोदी यांचा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान चालू आहे. हा अपमान बिलकुल सहन केला जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिला.

विधानसभेत आज नियमित कामकाज सुरू होताच काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर काल झालेल्या राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो, आंदोलनाच्या विषयाला हात घातला. आमच्या नेत्यांचा अपमान सहन केला जाणार नाही असे ते म्हणाले. या प्रकरणात सत्ताधारी सदस्य सहभागी होते. त्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे, अशी मागणी पटोले यांनी केली.

यावर भारतीय जनता पार्टीचे आशिष शेलार यांनी हा विषय कालच संपला असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा प्रकार पुन्हा सत्ताधारी पक्षांकडून घडणार नाही, असे आश्वस्त केले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, यावेळी काँग्रेस तसेच विरोधी पक्षांचे सदस्य आक्रमक होऊन सरकारविरोधी घोषणाबाजी करू लागले. त्यातच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही बाजूच्या सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. कालच आपण, या प्रकाराचे व्हिडिओ चित्रिकरण पाहणार आहोत. सगळं पाहिल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर यावर आपण योग्य तो निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.

राज्याचे यानंतर उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी कालच्या प्रकाराची चौकशी करणार असाल तर गेल्या आठ महिन्यांत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आम्हाला जे काय म्हटले आहे, त्याचीही चौकशी करण्याची मागणी केली. विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून खोके, बोके असे जे काही आम्हाला, मुख्यमंत्र्यांना म्हटले आहे याचे चित्रिकरण तपासा आणि त्यावरही कारवाई कारवाई करा असेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी काँग्रेसचे काही सदस्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हणू लागले. तो धागा पकडत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 23 कोटी जनतेने निवडून दिले आहे. भिक मागून ते पदावर बसलेले नाहीत. त्यामुळे त्यांना चोर म्हटलेले आम्ही सहन करणार नाही, असे ते म्हणाले.

मोदीं

मुनगंटीवार यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य प्रचंड आक्रमक झाले आणि जोरदार घोषणाबाजी चालू झाली. सत्ताधारी सदस्यही त्यांना प्रत्त्युत्तर देऊ लागले. त्यामुळे प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज पहिल्यांदा वीस मिनिटांसाठी, नंतर पंधरा तसेच वीस मिनिटांसाठी, असे एकूण तीन वेळा तहकूब करावे लागले.

कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर अध्यक्ष नार्वेकर यांनी या सर्व प्रकरणाचा अभ्यास करून उद्या आपण निर्णय जाहीर करू, असे स्पष्ट केले. त्यानंतर सभागृहात विविध प्रकारची कागदपत्रे पटलावर ठेवण्याचे काम सुरू झाले. त्याचवेळी सभागृहात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य करणे हा देशाचा अपमान आहे. गेले आठ महिने आम्ही बघतोय की, विधान भवनाच्या पायऱ्यांवर मुख्यमंत्र्यांचा फोटो घेऊन गद्दार, मिंधे, खोके हे म्हणणे कशात बसते? स्वा. सावरकर यांचा वारंवार अपमान करणे हा देशद्रोह नाही काय? सभागृहाचे पावित्र्य जपले पाहिजे, हे बाहेरदेखील जपले पाहिजे आणि सभागृहातही जपले पाहिजे. आम्ही बोलत नाही म्हणजे बोलू शकत नाही, हा समज काढून टाका. ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची कीर्ती जगभर पोहोचवण्याचे काम केले, त्यांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही.  ज्या जी 20 परिषदेचे अध्यक्षपद आपण भूषवतो त्याच्या बैठकीत तुमचे नेते, या देशात लोकशाही खतरे मे… आहे असे म्हणतात. जर लोकशाही खतरेमध्ये आहे तर मग तुम्ही भारत जोडो यात्रा कशी काय काढली, असा सवालही त्यांनी केला. बोलताना सर्वांनी तारतम्य बाळगले पाहिजे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

जे पंतप्रधान आपल्या आईच्या अंत्यविधीनंतर पुढची कर्तव्यं बजावण्यासाठी, पुढचे काम करण्यासाठी रवाना होतात यावरून त्यांच्या नसानसात किती देशभक्ती भिनली आहे,  राष्ट्रभक्ती भिनली आहे हे आपोआप समजून येते. गेले आठ महिने आमच्याबद्दल जे काही बोलण्यात आले याचाही विचार व्हावा आणि कालच्या जोडे मारो प्रकरणात जर कारवाई होणार असेल तर गेल्या आठ महिन्यांत ज्यांनी ज्यांनी आमच्याबद्दल जे जे वक्तव्य केले त्या सर्वांविरुद्ध कारवाई व्हावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content