Homeपब्लिक फिगरतुमच्यासारखे आम्ही बिल्डरच्या...

तुमच्यासारखे आम्ही बिल्डरच्या घशात ३५० कोटी नाही घातले!

आपण नगरविकास मंत्री असताना नागपूरच्या एनआयटीमधील एका भूखंडधारकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे त्याला नंतर स्थगिती दिली. मात्र, या विषयावर एकनाथ सापडला.. म्हणून काल बैठकांचे सत्र चालवणाऱ्या विरोधकांच्या हाती काहीच लागले नाही. अरे.. आम्ही तर एकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. तुमच्यासारखा मुंबईतल्या एका अतिक्रमित भूखंडासाठी बिल्डरला  सरकारच्या तिजोरीतून ३५० कोटी रुपये नाही दिले. तो बिल्डर आणखी १३०० कोटी रुपये मागतोय.. तुमच्यासारखे बिल्डरांच्या घशात पैसे घालणारे आम्ही नाही… अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत विरोधकांचा समाचार घेतला.

माहितीचा मुद्द्याखाली छगन भुजबळ यांनी हा विषय उपस्थित केला होता. नाना पटोले यांनी हा विषय पुढे लावून धरताना मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. एनआयटीचा भूखंड बिल्डरच्या घशात घातल्याबद्दल न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.  विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावर येथे चर्चा होऊ शकत नाही असे सांगत तो विषय निकाली काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यावर विरोधी पक्षांचे सदस्य आक्रमक झाले. सत्ताधारी पक्षाचे सदस्यही प्रत्युत्तरादाखल आक्रमक होऊ लागले. त्यामुळे सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता निर्माण झाली. इतक्यात मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली.

या जमिनीवर तीन हजार लोकांची घरे आहेत. २००१ साली गुंठेवारी कायदा मंजूर झाला. त्यानंतर २००७ साली शासनाने येथील ४९ लेआउट मंजूर केले. २००७च्या निर्णयानुसार २०१५ साली ३४ लेआऊटना मान्यता दिली. ३५व्या लेआउटमध्ये १६ प्लॉट होते. २००७च्या निर्णयाप्रमाणे हा प्लॉट नियमित करावा यासाठी सभापतींकडे प्लॉटधारकाने अर्ज केला. त्यावर एका सभापतींनी गुंठेवारीच्या दराने पैसे आकारावे तर नंतर त्याठिकाणी आलेल्या दुसऱ्या सभापतींनी रेडीरेकनर दराने पैसे आकारावे असे सुचवले. त्यानंतर २०२० साली प्लॉटधारकाने आपल्याकडे याबाबत अपील केले. तेव्हा जो न्याय बाकीच्या ३४ प्लॉटधारकांना लावला आहे तोच न्याय यांना लावावा असा आदेश नगरविकास मंत्री या नात्याने आपण दिला.

दरम्यानच्या काळात हा विषय न्यायालयात गेला होता. न्यायालयाने यावर एक सदस्य गिलानी कमिटी नेमली होती. या कमिटीने काही शिफारसी केल्या होत्या, ज्या न्यायालयाच्या विचाराधीन आहे. ही सर्व प्रक्रिया आपल्यासमोर मांडण्यात आलेली नव्हती. ज्यावेळी ही बाब आपल्या निदर्शनाला आणली गेली त्यानंतर आपण आपला पूर्वीचा निर्णय स्थगित करून न्यायालयाच्या प्रक्रियेनुसार जे होईल तो निर्णय करण्याचे आदेश दिले, ही या प्रकरणाची वस्तुस्थिती आहे असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणानंतर विरोधकांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे त्यांनी आणखी आक्रमक भूमिका घेतली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकारने मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची शिफारस झुगारून दहिसरमधल्या एका अतिक्रमित प्लॉटला सरकारच्या तिजोरीतून ३५० कोटी रुपये अदा केल्याचे सांगितले. आम्ही असे धनदांडग्यांचे खिसे भरणारे नाही, असे सांगताच विरोधी पक्ष आक्रमक झाले. मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांनी नियम ४८ अंतर्गत स्पष्टीकरण दिल्याचे सांगत यावर चर्चा होऊ शकत नाही असे स्पष्ट केले. त्यानंतर अध्यक्षांनी बोलायला दिले नाही, असा आरोप करत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content