दिवसेंदिवस पृथ्वीवर जगणे मानवाला कठीण होत जाणार आहे. त्याची चुणूक गेली काही वर्षे दिसत आहे. मात्र एकत्रित प्रयत्न मानवी जीवन सुसह्य होण्याकडे केले जात नसल्याने निसर्ग नि वनहानी याकडे डोळेझाक करून जगभरात ‘विकासाची’ पावले टाकली जात आहेत. तज्ज्ञांच्या सल्ल्यांना धुडकावून मनमानी चालूच आहे. यासाठी जगाची एकच नियमावली नि कठोर शासन प्रणाली आणावी लागेल. नागासाकी हिरोशिमा अण्वस्त्र संहारानंतर झालेले परिणाम पाहता त्याविरोधात सर्व एकत्र आहेत, मात्र भेदक अस्त्र बनवणे कोणी सोडलेले नाही. वृक्षतोडीबाबत नजीकच्या काळात हे शक्य होईल असे वाटत नाही. याची किंमत सर्वांनाच मोजावी लागेल, म्हणून दुर्लक्ष करून चालेल का?
दुनियाभरात मनुष्य जीवन पुढील काळात सहज सुलभ जे औद्योगिकीकरण होण्याच्या सुरुवातीला होते तसे व्हावे म्हणून प्रयत्न चालले आहेत. त्याचा भाग म्हणून पूर्वीची जीवनशैली, काही प्रमाणात जगण्याची साधने किंवा त्याचा वापर वाढावा यासाठी जोर दिला जात आहे. जास्तीतजास्त शेती उत्पादन तेही नैसर्गिकरित्या सेंद्रीय पद्धतीने घेण्याचा प्रयत्न होतोय. जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षणासाठी कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण आटोक्यात आणणे, जंगलतोडीचे बेलगाम प्रमाण पाहता वनसंवर्धन कार्यक्रम हाती घेतले जातात. पुढे त्याचे काय होते ते लोकांना कळत नाही. जसे राज्यात कित्येक वर्षं वृक्षलागवड होत असते. मागील सरकारच्या काळात 33 कोटी वृक्ष लागवड अभियान झाले. राज्याच्या स्थापनेनंतर यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन झाला. फलनिष्पत्ती वनवाढीत झाली का?
वास्तविक पाहता फार पूर्वी मोठे वनाच्छादित क्षेत्र होते असे म्हणतात. मात्र, विकासाच्या हव्यासाने देशभरात भकास भाग खूप तयार झाला. प्रत्येक गावाने आपल्यालगतच्या रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून श्रमदानाने ती जगवली तरी खूप मोठी लागवड देशात होऊ शकते. हल्ली रस्ते खूप मोठे, रुंद, मॉल नि इतर सुविधा असलेले झालेत. इथेच काय ती चार दोन झाडे दिसतात. विकासाच्या गप्पा मारणारी गावं नि सरकार याबाबत खूपच कमी पडत आहे, याची खंत कोणी धरेल काय?
भारतात 1950 साली तत्कालीन केंद्रीय मंत्री मुन्शी यांच्या पुढाकाराने वन महोत्सव झाल्याचे नि तो पुढे सुरू राहिल्याचे इतिहास सांगतो. पुढील काळाचा धोका ओळखून नि गरज जाणवून जंगल संरक्षणासाठी याला चालना दिली असावी. पूर्वी काही भागाचा अपवाद वगळता देशात वृक्षसंवर्धन केले जात होते. जपणूक होत होती. समृद्ध वनश्रीने नटलेल्या वनराया, सुसंपन्न अशी जैवविविधता, सुजलाम सुफलाम हिरवाईने नटलेली भारतभूमी समृद्ध दिसत होती. आज महामार्गाची समृद्धी आली. पण हिरवाईचे काय हा मोठाच प्रश्न आहे. कृषी क्षेत्रात राबणारा भूमिपुत्र प्रतिकूल परिस्थितीतही वनसंवर्धनासाठी जीवापाड मेहनत करायचा. पण आज उलटेच चित्र पाहण्यास मिळते. आता केवळ रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करून चालणार नाही तर शेतीच्या बांधावरदेखील झाडं लावण्यावर भर दिला पाहिजे!
अनेक धार्मिक ग्रंथांमधून आपल्याला झाडांची उपयोगिता सांगितली आहे. तिचा आपल्याला विसर पडला आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वगैरे फक्त बोलले जाते. कृती मात्र झाडे कापण्याची असते. विकासाला, औद्योगिकरणाला तर काही ठिकणी ती आडवीतिडवी वाढतात म्हणून कधीही कापली जातात. मोठ्या फांद्याही कापतात काय बोलावं! झाडतोडणीवरून मारामाऱ्या होतात.
झाडे सोडती प्राणवायूचा श्वास|
करुनि दूषित कर्ब द्विप्रणाली ऱ्हास|
कार्बन डायऑक्साईड शोषून झाडं ऑक्सिजन सोडतात. त्याचा मोठा परिणाम वातावरणावर नि मनुष्यप्राण्यावर होत असतो. हवा शुद्धीकरणाबरोबरच जमिनीत खोलवर गेलेली मुळं माती धरून ठेवत असल्याने जमिनीची धूप झीज कमी करतात. वृक्षामुळे पाऊस पडतो. पशुपक्ष्यांना संरक्षण मिळते. घरासाठी दुरुस्ती नि जळणासाठी, पूजाविधीसाठी लाकूड उपयोगी पडते. वाढत्या उष्म्यापासून झाडाचा आडोसा, थंडावा निर्माण करते. अशा बहुविध फायद्यामुळे झाडांचे संवर्धन जतन करणे गावातील लोकांना सांगायला नको! झाडाची तुलनाही सत्पुरुषाशी केली जाते. ते कितीही त्रास झाला तरी स्वतः झिजून इतरांच्या उपयोगी पडतात. कडक उन्हात उभं राहून इतरांना सावली, फळं, फुलं मात्र भरभरून देतात. सज्जन व्यक्तीप्रमाणे राहणारे हे वृक्ष आम्ही सहजपणे कापतो, त्यांचा संहार करतो.
भारतीय संस्कृतीत मनुष्य नि जंगल यांच्या परस्परसंबंधांची थोरवी साधूसंतांनी गायली आहे. वैदिक ग्रंथ, महाभारत – रामायण, तथागत बौद्ध ,पाणिणीचे अष्टाध्याय, तुकाराम अभंग वाणीत वृक्ष महात्म्य वर्णन केले आहे. मुखी संतसाहित्य असलेले भौतिक जगात हे सर्व विसरतात. जंगलात माणसाचा अतिरेकी हस्तक्षेप वाढत चालला आहे. सुखाच्या नि शहरीकरणाच्या वेगाने हिताची जंगले कापून काँक्रीटचे जंगल करून निसर्गाचा त्याला विसर पडत आहे.
वृक्षांचे नाना उपयोग पाहता सरसकट कत्तल करण्यास माणसाचे मन कसे धजावते? अन्य फायद्याच्या बाबीची जोपासना करणारा माणूस वनसंवर्धन आद्यकर्तव्य कधी मानणार? दरवर्षी अनेक संस्था, शाळांतून रोपं लावण्याचा कार्यक्रम होतो त्यातून किती नेमके जगतात? फोटो बातमी इतकाच हा कार्यक्रम असतो? वृक्षारोपण एक संस्कार मानला गेला पाहिजे. मुलांना निसर्गशिक्षण दिले पाहिजे. वड, पिंपळ, आंबा, फणस असे डेरेदार वृक्ष रस्त्याच्या कडेने लावले गेले पाहिजेत. सावलीसाठी, आपल्या आवारात, शिवारात गाव-गल्लीतून अनंत, चटकचंदणी, शेवंती, अबोली, शेवरी, त्रिफळा, आवळा, पारिजातक, यांची झाडे लावून वनमहोत्सव केला पाहिजे. जतन संवर्धन, झालं तरच पुढे जे जगतील त्यांना फायदा मिळेल. आजचा दिवस नाही लावले झाड तरी नजीकच्या काळात ती लावली जातील हे पाहा.
झाडे लावा, झाडे जगवा
आणि सृष्टीत चैतन्य फुलवा|
हाच संदेश ध्यानात घेऊनि
एकतरी झाड लावा|
झाडे आमुची मायबाप
कापू नका, लागेल पाप|
हेच निरंतर ध्यानीमनी ठेवा
एक तरी झाड लावा|
राज्य देशात आपल्या हवामानाशी सांगड असलेली झाडं न लावता अकेशिया, युकेलिप्टस अशा अनेक परदेशी वनस्पतींची लागवड होत असते. अनेकदा अनेक ठिकाणी कोणाच्या स्मृतिप्रीत्यर्थदेखील झाडे लावली जातात. त्याचीही निगा फारशी राखली जात नाही. बकरी किंवा तत्सम प्राण्यापासून लावलेली झाडं वाचावीत याची काळजी घ्यावी लागते. राज्यातील विचारवंत ग. प्र. प्रधान म्हणाले होते माझ्यापश्चात कोणतेही स्मारक करू नका. मात्र माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी आठवण म्हणून एकतरी झाड लावावे नि ते पाच वर्षं तरी जगण्याची व्यवस्था करावी. जिथे मोकळी जागा मिळेल तिथे हा उपक्रम राबवावा.
अभिनेते सयाजी शिंदे यांनी त्यांच्या गावातून अशी मोहीम राबवली त्याची माहिती घ्या. देहदहनासाठी मोठ्या प्रमाणात लाकडं लागतात. पण त्यासाठी वृक्ष कोण लावणार? कमीतकमी लाकडांची चिता रचणे, जिथे विद्युत शवदहन यंत्रणा असेल त्याचा वापर करणे गरजेचे झाले आहे.1995 साली दादरच्या शिवाजी पार्क येथे माझ्या वडिलांचे दहन संस्कार वीजदहन यंत्राने केले होते.
ढगफुटी किंवा जोरदार पाऊस पडला की जमिनीची पाणी धारणक्षमता कमी झाल्याने पूर दिसतो. याच कारण कमी होणारी झाडं! पुणे जिल्ह्यातील माळीण गाव याचंच उदाहरण असे तज्ज्ञ सांगतात. उत्तराखंड काय किवां अन्य भागात आलेले पूर, भुस्खलन यातून बोध घेऊन प्रत्येक गावाने यासाठी पुढाकार घेत वनसंवर्धन केले पाहिजे. गाव करी ते राव न करी ही म्हण सार्थ करून दाखवली पाहिजे. प्रत्येक गावाने सरकारी मदतीवर अवलंबून न राहता! युरोपतील जर्मनी, बेल्जियम जिथे पूर माहीत नाही तिथे त्याचा नुकताच तडाखा बसलाय. मृत व्यक्तीचे दगडी पुतळे, स्मृती स्मारके उभारून आम्ही भूमीसमोर नव्हे आपल्यापुढे असंख्य संकटे निर्माण करीत आहोत. त्यापेक्षा लावलेले वृक्ष संगोपन करून निगुतीने वाढवल्यास जीवनदायी नि उत्साहवर्धक ठरेल! आपण गेले चार दिवस पाऊसधारा पाहतोय. स्थिती नियंत्रणाबाहेर आहे, यातून काय ते समजा! कुऱ्हाडबंदी, चिपको आंदोलन या इतिहासातून काही बोध घेण्याची गरज आहे. अन्यथा.. पुढचं सांगण्याची काही गरज आहे?


महापुराच्या पार्श्वभूमीवर, अभ्यासपूर्ण लेख!