Homeएनसर्कलभास्कर वाघ घोटाळा...

भास्कर वाघ घोटाळा खणून काढणारे पत्रकार जगतरावनाना सोनवणे यांचे निधन

धुळ्यातील दैनिक “मतदार”चे संस्थापक-संपादक, धुळे जिल्हा परिषदेतील कोट्यवधी रुपयांचा भास्कर वाघ अपहार घोटाळा खणून काढणारे व त्यासाठी पत्रपंडित पा. वा. गाडगीळ पुरस्कार मिळालेले, व्यासंगी, साक्षेपी पत्रकार, अधिकारी व कर्मचारी मार्गदर्शक तसेच सेवा शर्तीविषयी गाजलेली पुस्तके लिहणारे, सोनदिपा पब्लिशर्सचे सर्वेसर्वा, कायद्याचे अभ्यासक जगतरावनाना सोनवणे यांचे आज, 12 ऑगस्ट रोजी दुपारी अल्पशा आजाराने धुळ्यातील निवासस्थानी निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, 2 मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

 

त्यांनी मरणोत्तर देहदानाची ईच्छा प्रकट केली होती. मात्र, वैद्यकीय सल्ल्यानुसार, काही तांत्रिक बाबींमुळे ते शक्य होऊ शकले नाही. आता उद्या, बुधवारी, 13 ऑगस्ट रोजी, सकाळी 9 वाजता, देवापुरातील, एकविरा मंदिरजवळील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

बुधगाव (ता. चोपडा) हे त्यांचे मूळ गाव. जिल्हा परिषदेतील नोकरीवर पाणी सोडून नानांनी “मतदार” हे सर्वसामान्य जनता, शेतकरी व वंचित समाजासाठी वाहिलेले वृत्तपत्र सुरू केले. जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष म्हणून काम पाहताना प्रशासकीय पातळीवर अधिकारी व कर्मचारी यांना येणाऱ्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन त्यांनी सोनादिपा प्रकाशनाची स्थापना करून कर्मचारी व अधिकारी मार्गदर्शक ही अत्यंत गाजलेली पुस्तके निर्मित केली. राज्यातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी, आस्थापना व न्यायसंस्थेत ही पुस्तके संदर्भासाठी आजही वापरली जातात.

भास्कर वाघ प्रकरणात त्यांना गुंडांनी व राजकीय नेत्यांनी अतोनात त्रास दिला. तरीही नानांची लेखणी थांबली नाही. त्यांना व कुटुंबाला झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली होती. त्यांनी खणून काढलेल्या या अपहार घोटाळ्याने तेव्हा सर्व देशाचे लक्ष वेधून घेतले होते. महाराष्ट्रातील हा पहिला कोट्यवधीचा घोटाळा! हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या कारभारात अनेक बदल करण्यात आले.

गेले काही दिवस देशातील परिस्थिती आणि शेतकरी आंदोलन चिरडण्याचा सरकारी प्रयत्नांनी नाना अस्वस्थ होते. प्रकृती साथ देत नसतानाही ते कापडणे येथे शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. चळवळीचा वारसा असलेल्या या गावातील सभेनंतर ते कमालीचे अस्वस्थ झाले होते. पुरोगामी विचारांची बैठक पक्की असलेल्या नानांनी आयुष्यभर व्रतस्थ पत्रकारिता केली. सेवा शर्ती तसेच कायदेशीर बाबींबाबत ते शेवटपर्यंत सर्वसामान्यांना मोफत मार्गदर्शन करत होते. धुळे जिल्ह्यातील काटवन परिसर विकासासह अनेक महत्त्वाच्या सामाजिक विषयात त्यांनी सक्रिय योगदान दिले होते.

नानांनी 40 हून अधिक कायद्याची पुस्तके तसेच इतर प्रासंगिक अशी 60हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. 2008मध्ये “इंडिया टुडे”तर्फे कर्मचारी व अधिकारी मार्गदर्शक पुस्तकांसाठी “ऑथर ऑफ दि इअर” पुरस्कार मिळाला होता.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content