Homeटॉप स्टोरीविमानतळावरच तीनदा रोखणाऱ्या...

विमानतळावरच तीनदा रोखणाऱ्या अमेरिकेची शाहरूख खानला गळ!

ज्या अभिनेत्याला अमेरिकेच्या लॉस एंजेलस विमानतळासह तीन विमानतळांवर तब्बल तीन वेळा रोखले, त्याच अभिनेत्याला म्हणजेच शाहरूख खानला अमेरिकेकडून लॉस एंजेलसच्या क्रिकेट टीमचे आश्रयदाते होण्यासाठी मनधरणी केली जात आहे.

अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेटी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांना नुकतीच ही माहिती दिली. राजदूत पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच मुंबई भेटीवर आलेल्या राजदूत एरिक गारसेटी यांनी बुधवारी राज्यपाल रमेश बैस यांची मुंबईत राजभवन येथे भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आपण स्वतः क्रिकेटचे मोठे चाहते असून भारतात असेपर्यंत क्रिकेटमधील छोटेमोठे तज्ज्ञ होण्याचा आपला मानस आहे. आयपीएल स्पर्धेतील अंतिम सामना पाहण्यासाठी आपण गुजरातला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आपण दहा वर्षे लॉस एंजेलसचे मेयर होतो. लॉस एंजेलसच्या क्रिकेट टीमचे आश्रयदाते व्हावे, यासाठी आपण अभिनेते शाहरुख खान यांना कालच गळ घातल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

२००९ साली शाहरूख खानला नेवार्क लिबर्टी इंटरनॅशनल विमानतळावर पहिल्यांदा रोखण्यात आले होते. दहशतवाद्यांच्या यादीत त्याचे नाव असल्याचा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला होता. याच काळात नंतर माय नेम इज खान, हा शाहरूख खानचा चित्रपट आला आणि गाजलाही. त्यानंतर तीन वर्षांनी २०१२ साली न्यूयॉर्कजवळ वेस्टचेस्टर कंट्री विमानतळावरही शाहरूखला रोखण्यात आले होते. तेव्हा तो नीता अंबानी यांच्याबरोबर खाजगी विमानाने येल विद्यापीठात लेक्चर देण्यासाठी चालला होता. या विद्यापीठात त्यामुळे तो उशिरा पोहोचला. पण चाहते शाहरूख आला यातच खूश होते. सात वर्षांत तब्बल तीन वेळा अमेरिकेच्या विमानतळावर रोखले जाताना शाहरूखला २०१६ साली तिसऱ्यांदा रोखण्यात आले होते. अमेरिकेतल्या इमिग्रेशन कायद्यातल्या तरतुदींनुसार लॉस एंजेलस विमानतळावर त्याला रोखण्यात आले होते.

२०२८ लॉस एंजेल्स ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश?

सन २०२८ साली लॉस एंजेलस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा यादृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याची माहिती अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेटी यांनी राज्यपाल रमेश बैस यांना दिली. २०३६ साली भारतानेदेखील मुंबई आणि अहमदाबाद येथे ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत विचार केला पाहिजे, असे त्यांनी सुचवले.

पुढील चार महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात टोकियो, ऑस्ट्रेलिया, वॉशिंग्टन व नवी दिल्ली येथे चार बैठका होणार असून अंतरिक्ष विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग, सप्लाय चेन यासह संरक्षण क्षेत्रात उभय देशांमध्ये सहकार्य वाढविण्याचे दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.   

आपण चौदा वर्षांचे असताना प्रथम भारतात आलो होतो. त्यानंतर राजदूत म्हणून भारतात येणे हा आपल्यासाठी मोठा बहुमान असल्याचे सांगताना भारत आणि अमेरिकेपुढे समसमान संधी व आव्हाने असल्याचे त्यांनी नमूद केले. अमेरिकेतील लोकांनी भारत समजून घ्यावा व अधिकाधिक विद्यार्थ्यांनीदेखील भारताला भेट द्यावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही गारसेटी यांनी सांगितले. महाराष्ट्राशी कृषी क्षेत्रात सहकार्य वाढविण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतदेखील चर्चा झाल्याचे सांगून शिक्षण कौशल्य प्रशिक्षण व हवामान अनुकूल कृषी या विषयात सहकार्य वाढविण्यास वाव असल्याचे ते म्हणाले.

देशाच्या सर्व भागातून आंब्यांच्या पेट्या

राजदूत म्हणून तामिळनाडू, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र यासह देशाच्या सर्व भागातून आपणास आंब्याच्या पेट्या मिळत असून आपले कुटूंब अद्याप भारतात आले नसल्याने इतक्या आंब्यांचे करायचे काय, असा प्रश्न आपणास पडला आहे. आंब्यांचे दुकानच लावता येईल की काय याची चाचपणी करण्याची सूचना आपण दूतावासातील कर्मचाऱ्यांना केली असल्याची मिश्किल टिप्पणीही राजदूत गारसेटी यांनी केली.

अमेरिकेतील सर्वोत्तम विद्यापीठांनी राज्यात यावे

महाराष्ट्राचे राज्यपाल या नात्याने आपण २६ विद्यापीठांचे कुलपती असून अलीकडेच राज्यातील काही विद्यापीठांचे अमेरिकेतील सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कशी करार झाल्याचे राज्यपालांनी राजदूतांना सांगितले. जगातील युवा देश असलेल्या भारताला अमेरिकेने कौशल्य प्रशिक्षण व कौशल्य वर्धन करण्यासाठी तसेच कौशल्याधारित अभ्यासक्रम राबविण्यासाठी सहकार्य करावे, अमेरिकेतील सर्वोत्तम विद्यापीठांनी राज्यात आपल्या शाखा सुरू कराव्या किंवा राज्यातील विद्यापीठांसोबत सहकार्य करावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. 

ऐतिहासिक संदर्भ

राजदूतांनी साबरमती आश्रमाला भेट दिल्याचे समजल्याने सांगून महात्मा गांधी यांनी राजभवन उभे असलेल्या जागी सन १९१५ साली भेट दिली होती असे राज्यपालांनी राजदूतांना सांगितले. सन १८९६ साली प्रसिद्ध अमेरिकन लेखक मार्क ट्वेन यांनीदेखील तत्कालीन गव्हर्मेंट हाऊस येथे भेट दिल्याचे राज्यपालांनी राजदूतांना सांगितले. अमेरिकेतील नागरिकांनी आणि विशेषतः विल ड्युरांटसारख्या लेखकांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला मदत केल्याबद्दल राज्यपालांनी राजदूतांकडे कृतज्ञता व्यक्त केली.

बैठकीला अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत माईक हँकी, राजकीय व आर्थिक विषयक काऊंसल क्रिस्तोफर ब्राऊन व राजकीय सल्लागार प्रियांका विसरिया-नायक उपस्थित होते.    

Continue reading

तासाभरातच तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री! ९ आमदारही घेणार शपथ!!

तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १०...

11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक घोषित

महाराष्ट्रातल्या इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27साठी नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने हे जाहीर केले आहे. आज, 8 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जाचा भाग-1 आणि...

मतदारांना भुरळ घालण्यासाठी बाळगली 1,400 कोटींची अवैध सामग्री

भारतात 2024 साली लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून, नुकत्याच झालेल्या आसाम, केरळम्, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच 5 राज्यांमधल्या 7 विधानसभेच्या पोटनिवडणुकांदरम्यान मतदारांना भुरळ घालण्यासाठी तब्बल 1,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेकायदेशीर सामग्री बाळगली होती....
Skip to content