Homeकल्चर +पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट...

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘तो, ती आणि फुजी’ चमकला!

शिलादित्य बोरा निर्मित आणि मोहित टकळकर दिग्दर्शित मराठी–जपानी चित्रपट तो ती आणि फुजी’चा २४व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF) vgkle; जागतिक प्रीमियर झाला. ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट मराठी स्पर्धा विभागातील सात निवडक चित्रपटांपैकी एक होता आणि त्याचे सर्व शोज् हाऊसफुल्ल झाले. महोत्सवातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरत तो ती आणि फुजी’ने मानाचे २ पुरस्कारही पटकावले. ललित प्रभाकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता (ज्युरी विशेष उल्लेख) आणि इरावती कार्णिक यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचे पुरस्कार मिळाले.

जपान आणि भारतात चित्रित झालेला हा चित्रपट पुण्यात राहणाऱ्या एका जोडप्याची कथा सांगतो, जिथे प्रेम नैसर्गिक न राहता ते मोजूनमापून केलं जातं. त्याला गुणांकनात आणि भाकितांमध्ये अडकवलं जातं. अशा जगात त्यांची तीव्र, सर्वस्व झोकून देणारी प्रेमकहाणी उलगडते.

या सन्मानाबद्दल बोलताना ललित प्रभाकर (आनंदी गोपाळ, झोंबिवली, स्माईल प्लीज) म्हणाले की, हा चित्रपट माझ्यासाठी अत्यंत आव्हानात्मक आणि वेगळा अनुभव होता. प्रतिष्ठित पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष उल्लेख मिळणे खरोखरच भारावून टाकणारे आणि मनापासून समाधान देणारे आहे. प्रेक्षक आणि परीक्षक, दोघांचंही अभिनयाशी इतक्या खोलवर नातं जुळलं, याचा विशेष आनंद आहे. पुण्यातला हा माझा दुसरा पुरस्कार असल्यामुळे तो अधिकच खास वाटतो. विशेषतः आंतरराष्ट्रीय ज्युरीसमोर. मी जे काही केलं त्याचं श्रेय दिग्दर्शक मोहितला जातं; त्याने मला माझ्या मर्यादांपलीकडे जायला प्रवृत्त केलं. इरावतीसोबत हा माझा पाचवा चित्रपट आहे. जपानमध्ये चित्रित झालेल्या मोजक्या भारतीय चित्रपटांपैकी एका चित्रपटाचा भाग असणं हा प्रवास अजूनच संस्मरणीय बनवतं.

पटकथालेखिका इरावती कार्णिक (झिम्मा, आनंदी गोपाळ) म्हणाल्या की, PIFF सारख्या प्रतिष्ठित महोत्सवात निवड होणं हेच मोठा सन्मान आणि सौभाग्य आहे. त्यावर कळस म्हणजे पुरस्कार मिळणं.. हे खरोखरच अतिशय समाधानकारक आहे. या चित्रपटासाठी संपूर्ण टीमने केलेल्या मेहनतीची दखल घेतली गेली आहे, याचा खूप आनंद आहे. या पुरस्काराबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे.

निर्माते शिलादित्य बोरा, जे Platoon One Films या भारतातील आघाडीच्या स्वतंत्र चित्रपट निर्मिती संस्थेमार्फत ‘बयान’ (TIFF 2025), ‘घात’ (Berlinale 2023) आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘पिकासो’ यासारख्या क्रिएटर-फर्स्ट चित्रपट निर्मितीसाठी ओळखले जातात, म्हणाले की, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ललित आणि इरावतीला सन्मान मिळताना पाहणं खूप प्रेरणादायी आहे. या चित्रपटावर माझा नेहमीच विश्वास होता. तो खरा आहे, प्रामाणिक आहे आणि कुठलीही तडजोड करत नाही. ज्या प्रेक्षकांसाठी तो बनवला गेला, त्यांच्याशी तो अखेर जोडला गेला, हे पाहणं अतिशय समाधानकारक आहे. धाडसी, वेगळा दृष्टीकोन असलेल्या दिग्दर्शकांना पाठिंबा देणं, यावर माझा ठाम विश्वास आहे आणि मोहित अशा दिग्दर्शकांपैकी एक आहे. या चित्रपटामुळे मराठी सिनेमा जागतिक स्तरावर नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, याची मला खात्री आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून आधीच रस दाखवला जात आहे आणि हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास आम्ही उत्सुक आहोत.

‘तो ती आणि फुजी’मुळे ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र आली आहे. २०१७मधील सुपरहिट ‘ची व ची सौ का’नंतर हे दोघे पुन्हा एकदा पडद्यावर झळकले आहेत.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content