Homeब्लॅक अँड व्हाईटस्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या विशेष...

स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या विशेष निमंत्रितांमध्ये राज्यातील तीन मच्छिमार!

नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर यावर्षीच्या स्वातंत्र्यदिन सोहोळ्यात पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवताना उपस्थित राहण्यासाठी तसेच त्यांनी देशवासियांना उद्देशून केलेले भाषण ऐकण्यासाठी देशभरातील विशेष निमंत्रित त्यांच्या जोडीदारासह आमंत्रित करण्यात आले असून त्यांच्या उपस्थितीत हा सोहोळा पार पडेल. या विशेष निमंत्रितांमध्ये व्हायब्रंट व्हिलेजेसचे  सरपंच, शिक्षक, परिचारिका शेतकरी,मच्छिमार तसेच सेन्ट्रल व्हिस्टा प्रकल्प, अमृत सरोवर, हर घर जल या आणि अशाच इतर महत्त्वाच्या सरकारी उपक्रमात काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.

मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने महाराष्ट्र राज्यातील तीन मच्छीमारांची निवड केली असून हे मच्छीमार 15 ऑगस्ट 2023 रोजी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याचे साक्षीदार बनण्यासाठी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या ऐतिहासिक  स्थळी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला उद्देशून केलेले संबोधन ऐकण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या सुमारे 1,700 व्यक्तींमध्ये पन्नास मच्छीमार आपल्या कुटुंबियांसह उपस्थित राहणार आहेत. सरकारच्या ‘जन भागीदारी’ या संकल्पनेनुसार देशभरातील सर्व स्तरातील लोकांना या सोहळ्यासाठी विशेष आमंत्रित म्हणून उत्सवात सहभागी करून घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

या उत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या 50 मच्छिमारांपैकी तीन मच्छीमार महाराष्ट्रातील आहेत. विशेष निमंत्रितांपैकी एक असलेले तुकाराम वानखेडे, जे मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील नेवपूरचे आहेत आणि गोड्या पाण्यात मासेमारी करतात, ते नवी दिल्लीतील स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी आमंत्रण मिळाल्याने अत्यानंदात आहेत. माझ्यासारखा सामान्य माणूस विमानाने प्रवास करून दिल्लीला जाणार आणि विशेष आदरातिथ्याचा मानकरी ठरणार, माझ्यासाठी हा अत्यंत गौरवास्पद क्षण आहे, अशी प्रतिक्रिया तुकाराम वानखेडे यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधानांसारखी महत्त्वाची व्यक्ती देशातील गरीबातील गरीब माणसापर्यंत कशी पोहोचते, यांचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे, असे सांगत त्यांनी आमंत्रण दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.

पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथील राजेंद्र शांताराम मेहेर नावाच्या आणखी एका मच्छीमार बांधवाला या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले आहे. सरकारने केंद्रात एक स्वतंत्र मत्स्यव्यवसाय मंत्रालय निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे मच्छीमारांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होत आहेत, तसेच किसान क्रेडिट कार्डाचा मत्स्यपालन व्यवसायात विस्तारित वापर यासह मत्स्यसंवर्धन, विविध मत्स्य प्रजातींचे रक्षण, सागरी पर्यावरण आणि इतर गोष्टींचा मत्स्य व्यवसाय क्षेत्राला खूप फायदा झाला आहे, अशा शब्दात राजेंद्र मेहरे यांनी आपला आनंद व्यक्त केला. 15 ऑगस्ट रोजी दिल्लीत या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करताना मला खूप आनंद होत आहे. असेही ते म्हणाले.

या विशेष निमंत्रितांपैकी एक असलेले अक्षय ऊईके हे गडचिरोली जिल्ह्यातील चटगावचे रहिवासी आहेत. बांबूच्या पारंपरिक वस्तूंची विक्री करण्याचा त्यांचा एक घरगुती व्यवसाय असून यामधून त्यांना दिवसाला 300 रुपये उत्पन्न मिळते. ऊईके यांनी सरकारच्या या उपक्रमाची प्रशंसा केली आणि ते म्हणाले की नवी दिल्लीमध्ये होत असलेल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होणे म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या घटनांपैकी एक आहे. हे निमंत्रण दिल्याबद्दल आपण अतिशय आनंदित झालो असून याबद्दल पंतप्रधानांचे, त्याबरोबरच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, नागपूरचे विकास आणि सुविधा कार्यालय यांचे ऋणी आहोत, असे ऊईके यांनी सांगितले.

‘अक्षय ऊईके बांबूच्या वस्तू तयार करत आहेत.’

एमएसएमई मंत्रालयाचे आणखी एक विशेष निमंत्रित शुभम सातपुते महाराष्ट्रामधील कोल्हापूरचे असून त्यांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची प्रशंसा केली आहे. ते म्हणाले, एमएसएमई विभागाने सुरू केलेल्या, चेन्नईच्या प्रतिष्ठेच्या सेंट्रल फूटवेअऱ ट्रेनिंग इन्स्टिट्युटच्या बहुमूल्य अभ्यासक्रमाचे आपण प्रशिक्षण घेतले आहे. सरकारच्या या उपक्रमामुळे कोल्हापुरी चपलांविषयीच्या माझ्या दृष्टीकोनामध्ये बदल घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. मेमरी फोम्स, आकर्षक रंग आणि घसरण्याला प्रतिबंध करणारे पायताण तळ यांसारख्या आधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश करून मी कोल्हापुरी चपलांचा प्राचीन वारसा कायम राखत पारंपरिक कारागिरीला आधुनिकतेची आणि आकर्षकतेची जोड दिली आहे.

शुभम सातपुते, कोल्हापुरी चपला तयार करताना

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना देशातील उद्यमशील युवा वर्गात कौशल्याचा विकास करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content