Homeकल्चर +लाख मोलाची मोहोर...

लाख मोलाची मोहोर उमटविणाऱ्या ऐतिहासिक यंत्राची यंदाही झाली पूजा!

तब्बल ५४ हजार कोटी रुपयांचे आर्थिक बजेट असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कारभारही तितकाच मोठा आणि अवाढव्य आहे. येथील प्रत्येक विकासकामे, त्यांच्यासाठी काढण्यात येणाऱ्या निविदा, कागदोपत्री कामकाजही जबाबदारीचे आहे. मात्र या सर्व निविदा, कागदपत्रे यांच्यावर जोपर्यंत एक खास ‘मोहोर’ उमटत नाही तोपर्यंत सदर कंत्राट अंतिम (Final) होत नाही. ही खास मोहोर उमटविली जाते एका वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण यंत्राने! आणि याच लाख मोलाची मोहोर उमटवणाऱ्या ऐतिहासिक यंत्राचे नित्यनेमाप्रमाणे यंदाही दसऱ्याच्या निमित्ताने मुंबई महापालिकेतर्फे पूजन करण्यात आले.

तब्बल दीडशे वर्षं वय असलेल्या ऐतिहासिक यंत्राने उमटविण्यात येणारा शिक्का आजही तेवढाच ठसठशीत आहे. मुंबई महानगरपालिका अस्तित्त्वात आली तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक निविदेवर, महत्त्वाच्या कागदपत्रांवर याच यंत्राद्वारे मोहोर उमटविली जाते. विशेष म्हणजे पालिकेच्या प्रत्येक कंत्राटाची अंतिम रक्कम अदा करण्यापूर्वी त्यावर या यंत्राद्वारे मोहोर उमटविणे आवश्यक आहे. दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने निमित्ताने या यंत्राचे पूजन करून या यंत्राप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते, अशी माहिती पालिका सचिव (प्र.) संगीता शर्मा यांनी दिली आहे.

मुंबई महापालिका मुख्यालयाची इमारत संपूर्ण भारतीयांसाठी आजही एक आकर्षण आहे. या इमारतीची बांधणी ब्रिटिशकालीन आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या इमारतीचे सौंदर्य अबाधित असून, येथे अनेक आश्चर्यकारक आणि कुतूहल वाढविणाऱ्या बाबींचा समावेश आहे. तसेच ही महापालिका आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका आहे. या पालिकेचा अर्थसंकल्प हा भारतातील काही राज्यांच्या अर्थसंकल्पांपेक्षा मोठा आहे. याद्वारे पालिकेतील आतापर्यंतचे महापौर आणि आयुक्त यांनी मुंबईकरांसाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत.

मोहोर

मुंबईकरांचे रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या शिक्षण, पाणीपुरवठा, वाहतूक, पर्यावरण, सुरक्षा, रस्ते आरोग्य आदी विविध नागरी सेवा सुविधांसह अनेक पायाभूत सुविधांबाबत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांच्या सेवेत आहे. यासाठी पालिका प्रशासनाला अनेकदा लोकाभिमुख निर्णय घ्यावे लागतात, त्यांची अंमलबजावणी करावी लागते. त्यामुळे साहजिकच पालिका प्रशासनाच्या विविध कागदपत्रांना खूप महत्त्व असते. त्यामुळे या कामगदत्रांवरील लिखाण, त्यावरील शेरे, शिक्के यांनाही खूप अर्थ असतो.

पालिका अस्तित्त्वात आल्यापासूनचे महत्त्वाचे दस्तावेज आजही पालिकेच्या सचिव विभागाने जपून ठेवले आहेत. यामध्ये सन १८७३मध्ये झालेल्या महापालिकेच्या पहिल्या सभेच्या इतिवृत्तापासून अनेक महत्त्वाच्या दस्तावेजांचा समावेश आहे. सचिव कार्यालयातील जुन्या कपाटांमध्ये हा अमूल्य ठेवा गेल्या दीडशे वर्षांपासून जपून ठेवण्यात आला आहे. या मौल्यवान ठेव्यातील अनेक कागदपत्रांवर एक मोहोर उमटलेली आपल्याला दिसते. गेल्या दीडशे वर्षांपासून ही मोहोर ज्या ‘सील’ यंत्राद्वारे उमटवली जाते, ते यंत्र सन १८७४मध्ये लंडन येथे तयार केलेले आहे. हे यंत्र अतिशय भक्कम आणि पूर्णपणे लोखंडी बनावटीचे असून, त्याद्वारे महत्त्वाच्या कागदपत्रांवर मोहोर उमटविली जाते. विशेष बाब म्हणजे जोपर्यंत ही मोहोर उमटत नाही, तोपर्यंत या कागदांना काहीच अर्थ नसतो. या यंत्राचे अनेकांना अप्रुप असून, महानगरपालिका सचिव (चिटणीस) विभागात हे यंत्र गेली तब्बल दीडशे वर्ष अव्याहतपणे कार्यरत आहे.

अशी उमटते बृहन्मुंबई महानगरपालिकेची मोहोर!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सचिव (चिटणीस) कार्यालयातील ‘सील’ यंत्र ब्रिटिशकालीन असून, त्याची बनावटही पुरातन आहे. लोखंडापासून तयार केलेले हे यंत्र एका मोठ्या लाकडी टेबलावर बसविण्यात आले आहे. हे यंत्र वापरताना सुरुवातीला एका मोठ्या लोखंडी तुळईचा वापर करण्यात येतो. या तुळईच्या दोन्ही बाजूला लोखंडाचे दोन मोठे गोळे जोडलेले आहेत. अत्यंत वजनदार असणारी ही तुळई यंत्राच्या वरती ठेवण्यात येते. त्यानंतर या यंत्राच्या खालच्या भागात असलेल्या छोट्याच्या लोखंडी फटीत ज्यावर मोहर उमटवायची आहे ते महत्त्वाचे कागद ठेवले जातात. त्यानंतर यंत्राच्या वर ठेवण्यात आलेली वजनदार लोखंडी तुळई उजवीकडून डावीकडे फिरविली की, लोखंडी फटीचे दोन्ही लोखंडी भाग एकमेकांवर दाबले जातात आणि कागदावर ठसठशीत मोहोर उमटते!

गेल्या दीडशे वर्षांपासून हे यंत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेत अविरतपणे कार्यरत असून, त्याद्वारे अनेक महत्त्वाच्या ऐवजांवर ‘शिक्कामोर्तब’ करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील प्रथेनुसार या यंत्राचे दरवर्षी दसऱ्याच्या आदल्या दिवशी पूजन करून या यंत्राप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते, अशीही माहिती यानिमित्ताने संगीता शर्मा यांनी दिली.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content