Homeडेली पल्सश्राद्धविधीतले तर्पण, तीलतर्पण...

श्राद्धविधीतले तर्पण, तीलतर्पण आणि पितृतर्पण!

श्राद्धविधी अंतर्गत असलेली एक महत्त्वाची कृती म्हणजे तर्पण. या लेखात तर्पण, पितृतर्पण, तीलतर्पण यांचे महत्त्व आणि पद्धत याविषयी समजून घेऊया.

  1. तर्पण-

व्युत्पत्ती आणि अर्थ- ‘तृप्’ म्हणजे संतुष्ट करणे. ‘तृप्’ या धातूपासून तर्पण हा शब्द सिद्ध झाला आहे. देव, ऋषी, पितर यांना जलांजली (उदक) देऊन तृप्त करणे, म्हणजे तर्पण होय.

उद्देश- ज्यांच्या नावांचा उल्लेख करून तर्पण केले जाते, त्या देव, पितर आदींनी आपले कल्याण करावे, हा तर्पण करण्याचा हेतू असतो.

प्रकार- ब्रह्मयज्ञांग (यज्ञाच्या वेळी करावयाचे), स्नानांग (नित्य स्नान केल्यानंतर करावयाचे), श्राद्धांग (श्राद्धात केले जाणारे), अशी अनेक विधींची अंगभूत तर्पणे असतात आणि ती त्या-त्या प्रसंगी करायची असतात.

तर्पण करण्याची पद्धत: ‘तर्पण नदीवर करावे’, असे बोधायनाने सांगितले आहे. हे तर्पण नदीमध्ये नाभीपर्यंत पाण्यात उभे राहून किंवा नदीच्या काठी बसून करावे. देव आणि ऋषी यांना पूर्वाभिमुख होऊन अन् पितरांना दक्षिणाभिमुख होऊन तर्पण करायचे असते. ‘देवांचे तर्पण सव्याने, ऋष्यादिकांचे निवीताने आणि पितरांचे अपसव्याने करावे’, असे शास्त्र आहे.

तर्पणासाठी दर्भाची आवश्यकता असते. दर्भाच्या अग्रावरून देवांचे, दर्भ मध्यावर दुमडून ऋषींचे आणि दोन दर्भांच्या मूळावरून आणि अग्रावरून पितरांचे तर्पण करावे.

हाताच्या बोटांच्या अग्रभागी असलेल्या देवतीर्थाने देवांना, अनामिका आणि कनिष्ठा यांच्या मूळांतून ऋषींना आणि तर्जनी अन् अंगठा यांचा मध्यभाग यातून पितरांना उदक द्यावे (तर्पण करावे).

देवांना प्रत्येकी एक, ऋषींना दोन आणि पितरांना तीन अंजली तर्पण द्यावे. मातृत्रयी असल्यास तीन अंजली, तर इतर स्त्रियांना एक अंजली तर्पण द्यावे. (‘अंजली’ या शब्दाचा मूळ अर्थ ‘ओंजळ’, असा होतो. येथे मात्र ‘एक अंजली तर्पण द्यावे’, म्हणजे ‘एकदाच तर्पण द्यावे’, अशा अर्थाने ‘अंजली’ हा शब्द वापरला आहे.)

  • पितृतर्पण-

व्याख्या- पितरांना उद्देशून दिलेले उदक म्हणजेच पितृतर्पण होय. जीवत्पितृकाला पितृतर्पणाचा निषेध आहे. महालय श्राद्ध याला अपवाद आहे.

का करावे?- पितरांना वंशजांकडून जशी पिंडाची आणि ब्राह्मणभोजनाची अपेक्षा असते, त्याचप्रमाणे उदकाचीही असते.

महत्त्व- तर्पण केल्याने पितर केवळ संतुष्ट होऊन निघून जात नाहीत, तर तर्पण करणार्‍याला आयुष्य, तेज, ब्रह्मवर्चस्व, संपत्ती, यश आणि अन्नाद्य (भक्षण केलेले अन्न पचविण्याचे सामर्थ्य) देऊन तृप्त करतात.

कधी करावे?- देव, ऋषी आणि पितर यांना उद्देशून नित्य (प्रत्येक दिवशी) तर्पण करावे. नित्य तर्पण हे पहाटे स्नान झाल्यावर करावे. पितरांसाठी प्रतिदिन श्राद्ध करणे शक्य नसल्यास निदान तर्पण तरी करावे. पार्वण श्राद्ध केल्यानंतर दुसर्‍या दिवशी पितृतर्पण करावे.

तीलतर्पण: पितृतर्पणात तीळ घ्यावेत. तिळांचे काळे आणि पांढरे असे दोन भेद असून, काळे तीळ श्राद्धप्रसंगी वापरावे. तीळ न मिळाल्यास त्यांच्या ऐवजी सोने किंवा रूपे वापरावे.

‘तीलमिश्रित जलाने पितरांना केलेल्या तर्पणाला तीलतर्पण म्हणतात.

जेवढ्या पितरांना उद्देशून श्राद्ध केलेले असेल, तेवढ्यांनाच उद्देशून श्राद्धांग तीलतर्पण करायचे असते.

दर्शश्राद्ध असता, त्याच्या पूर्वी आणि प्रतिसांवत्सरिक श्राद्ध असता, त्याच्या दुसर्‍या दिवशी तीलतर्पण करतात. इतर श्राद्धांत ते श्राद्धविधीनंतर लगेच करतात.

नांदीश्राद्ध, सपिंडीश्राद्ध इत्यादी श्राद्धांत तीलतर्पण करत नाहीत.’

3. तीलतर्पणाचे महत्त्व: पितरांना तीळ प्रिय आहेत. तिळांचा उपयोग केल्याने असुर श्राद्धविघात करत नाहीत.

श्राद्धाच्या दिवशी घरभर तीळ पसरावे. निमंत्रित ब्राह्मणांना तीळमिश्रित जल द्यावे आणि तिळांचे दान द्यावे.

– जैमिनीयगृह्यसूत्र (उत्तरभाग, खंड १), बौधायनधर्मसूत्र (प्रश्न २, अध्याय ८, सूत्र ८) आणि बौधायनगृह्यसूत्र

तीलतर्पण कोणाला करायचे?

देवतांना तीलतर्पण करणे-

पद्धतप्रथम देवांचे आवाहन करावे. तांब्याचे किंवा कोणत्याही सात्त्विक धातूचे तबक किंवा ताट हातात घ्यावे. ब्रह्मा किंवा श्रीविष्णू यांचे किंवा त्यांच्या एकत्रित रूपाचे, म्हणजे दत्ताचे स्मरण करून त्यांना ताटात येण्याचे आवाहन करावे. त्यानंतर ‘देवता सूक्ष्मातून तेथे आलेल्या आहेत, असा भाव ठेवावा. त्यानंतर त्यांच्या चरणांवर तीळ अर्पण करीत आहोत, असा भाव ठेवावा.

पूर्वजांना तीलतर्पण करणे-

पद्धत: पूर्वजांना तीळ अर्पण करण्यापूर्वी तिळांमध्ये श्रीविष्णू आणि ब्रह्मा यांची तत्त्वे येण्यासाठी देवतांना प्रार्थना करावी. त्यानंतर ‘पूर्वज सूक्ष्मातून आलेले आहेत आणि आपण त्यांच्या चरणांवर तीळ आणि जल अर्पण करत आहोत’, असा भाव ठेवावा. त्यानंतर दोन मिनिटांनी देवतांच्या तत्त्वांनी भारीत झालेले तीळ आणि अक्षता पूर्वजांना अर्पण कराव्यात. सात्त्विक बनलेले तीळ हातात घेऊन त्यावरून ताटामध्ये हळुवारपणे पाणी सोडावे. त्यावेळी दत्त किंवा ब्रह्मा किंवा श्रीविष्णू यांना पूर्वजांना गती देण्यासाठी प्रार्थना करावी.

संदर्भ: सनातन संस्थेचा ग्रंथ ‘श्राद्ध (महत्त्व व शास्त्रीय विवेचन)’
संपर्क: 9920015949

Continue reading

सोन्याच्या दरात होणार मोठी उलथापालथ?

भारतातील सोन्याच्या बाजारात सध्या मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. बँकांनी सोन्याच्या नव्या आयातीला पूर्णपणे स्थगिती दिली आहे. यामुळे अनेक टन सोने कस्टममध्ये अडकून पडल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यातील सोन्याची आयात गेल्या ३० वर्षांतील...

‘नीट’ परीक्षेत ‘फिजिक्स’ने केले विद्यार्थ्यांना हैराण!

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे घेण्यात आलेली 'नीट-युजी २०२६' ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा रविवारी देशभरात पार पडली. यंदा साधारण २३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. प्राथमिक विश्लेषणानुसार, यंदाचा पेपर गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसा कठीण आणि वेळखाऊ होता. विषयनिहाय...

‘तांदळाची कूटनीती’ वापरत भारताची चीन-अमेरिकेला टक्कर

जागतिक स्तरावर ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रासाठी अत्यावश्यक ठरत असलेल्या “क्रिटिकल मिनरल्स”च्या शर्यतीत भारताने आता आफ्रिकेकडे धोरणात्मक पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत भारत केवळ खनिजांसाठी गुंतवणूक करत नाही, तर “तांदळाची कूटनीती” (राईस डिप्लोमसी) वापरत आफ्रिकन देशांशी संबंध...
Skip to content