Homeटॉप स्टोरीलक्ष्य 2036चे तर...

लक्ष्य 2036चे तर तयारी 2029च्या युवा ऑलिंपिकची!

खेळ फक्त पदक जिंकण्यासाठी नसतात तर खेळांतून हृदय जिंकलं जातं, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2036मधल्या ऑलिंपिक स्पर्धेच्या आयोजनासाठी भारत सज्ज असल्याची निःसंदिग्ध ग्वाही दिली. त्याचवेळी त्यांनी 2029मधल्या युवा ऑलिंपिक स्पर्धेच्या संयोजनाचीही तयारी दाखवली.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या 141व्या अधिवेशनाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते काल मुंबईत दिमाखदार उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. या उद्घाटन सोहळ्यात भारतीय प्राचीनत्वाच्या खुणा आणि वैविध्यपूर्ण परंपरा आणि कला, नृत्य आणि संस्कृतींचा परिचय करून देणारा नजराणाच जगभरातील प्रतिनिधींसमोर सादर करण्यात आला. या सादरीकरणाने बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमधील ग्रँड थिएटर दुमदुमून गेले.

भारत वेगाने वाटचाल करणारी अर्थव्यवस्था आहे. आमच्याकडे उत्तम पायाभूत सुविधा आहेत. गेल्या काही वर्षांत आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक क्रीडा स्पर्धांचे यशस्वीपणे संयोजन केले आहे. भारताला जी-20चे अध्यक्षपद मिळाले. या काळात आम्ही भारतातील विविध शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे यशस्वीपणे आयोजन केले. आता कोट्यवधी भारतीय जनतेला ऑलिंपिक स्पर्धेच्या संयोजनाची संधी मिळावी अशी आस लागून राहिली आहे. आम्ही 2036मधल्या ऑलिंपिकचे यशस्वीपणे संयोजन करू शकतो असा विश्वास आहे. या दरम्यान होऊ घातलेल्या 2029मधल्या युवा ऑलिंपिक स्पर्धेच्या संयोजनाचीदेखील आमची तयारी आहे. भारतीयांच्या या आकांक्षेची, स्वप्नाची आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती दखल घेईल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.

मोदी यांनी भारतातील प्राचीन क्रीडा परंपरेचादेखील आढावा घेतला. भारतातील गावागावांत विविध खेळांची परंपरा आहे. या गावात प्रत्येक सणाला वेगवेगळ्या खेळ खेळण्यांची प्रथा आहे. आमची क्रीडापरंपरा समृद्ध आहे. प्राचीन ग्रंथामध्ये 64 विद्यांचा उल्लेख आढळतो. त्यामध्ये अश्वारोहण, धनुर्विद्या, जलतरण आणि मल्लविद्या यांचा समावेश आहे. धनुर्वेद अशी स्वतंत्र संहिता आहे. कच्छ येथील उत्खननात धौलाविरा परिसरात पाच हजार वर्षांपूर्वीचे प्रेक्षागृह आढळले आहे. राक्षीगढी येथेही असे जुने अवशेष सापडले आहेत, असेही ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या कार्यकारी मंडळाने क्रिकेटचा ऑलिंपिकमध्ये समावेश करण्याची शिफारस केली आहे आणि आम्ही त्याबाबत लवकरच सकारात्मक बातमी ऐकण्याची आशा करत आहोत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारताला 40 वर्षांनंतर दुसऱ्यांदा तर मुंबईला पहिल्यांदाच या अधिवेशनाच्या संयोजनाची संधी मिळाली आहे. 15 ते 17 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत हे अधिवेशन होत आहे. अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्यासह जगभरातील ऑलिंपिक संघटनेचे पदाधिकारी, भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा,  आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सदस्य तथा रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी तसेच रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी, याच ठिकाणी 12 ते 14 ऑक्टोबरदरम्यान आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या कार्यकारी मंडळाची बैठक संपन्न झाली.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content