Homeब्लॅक अँड व्हाईटसदगुरु श्री वामनराव...

सदगुरु श्री वामनराव पै जन्मशताब्दीचे दुसरे पुष्प मुंबईमध्ये संपन्न!

जीवनविद्या मिशन या शैक्षणिक, सामाजिक, सेवाभावी संस्थेचे संस्थापक सदगुरु श्री वामनराव पै यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. सदगुरुंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. सदगुरुंच्या जन्मदिनी म्हणजेच २१ ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये या जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ करण्यात आला. त्याचप्रमाणे १६ आणि १७ डिसेंबरला दुसरा भव्य दिव्य समाजप्रबोधनाचा कार्यक्रम मुंबईत जोगेश्वरी पूर्व येथील राज्य राखीव पोलीस दल मैदानात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी जीवनविद्या मिशनच्या या कार्यक्रमाचे स्वरुप नेहमीपेक्षा आगळे वेगळे असे होते.

पहिल्या दिवशी सुरेल संगीताच्या साथीने सुखसंवादाच्या माध्यमातून आदरणीय सद्गुरु श्री वामनराव पै यांचा जीवनप्रवास उलगडण्यात आला. जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त आणि सदगुरुंचे सुपूत्र प्रल्हाद पै यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून सदगुरुंच्या जन्मापासून सुरू झालेला हा संपूर्ण जीवनप्रवास सर्वांसमोर अक्षरशः जसाचा तसा उभा केला. या जीवनप्रवासात विविध टप्प्यांवर आधारित सुंदर गाणी देखील यावेळी सादर करण्यात आली. यासाठी सारेगमप लिटिल चॅम्प्स् विजेती गौरी गोसावी, मी होणार सुपरस्टारचा उपविजेता राजयोग धुरी, गायिका कांचन सावंत आणि गायक सागर मेस्त्री या गायकांनी सुरेल साथ दिली.

या सुंदर वाद्यवृंदाच्या तालावर मैदानातील हजारो लोकांसह जणू काही संपूर्ण आसमंतही डोलत आहे असा भास होत होता. कार्यक्रमाच्या शेवटी प्रल्हाद पै यांनी सदगुरुंसोबत फोनवरून संवाद साधतात आणि ते पाहून उपस्थित सर्वच जण अक्षरशः भारावून गेले.

दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात हार्मोनियम वादक, ५० तबला वादक, ढोल वादक आणि गायकांच्या समुहाने वाद्यवृंदात सादर केलेल्या तालबद्ध अशा ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठ आणि संगीत जीवनविद्येने झाली. त्यानंतर वीस मिनीटे हिंदी आणि वीस मिनीटे मराठी विश्वप्रार्थना सर्वांसोबत सादर करण्यात आली. जीवनविद्येची विश्वकल्याणकारी विश्वप्रार्थना हे जीवनविद्या तत्त्वज्ञानाचे सारच आहे. ही विश्वप्रार्थना विश्वातील सर्वांच्या म्हणजेच प्रत्येकाच्या कल्याणासाठी आहे. सामूहिक पद्धतीने ही विश्वप्रार्थना म्हटल्यास तिचे अनेक आश्चर्यकारक परिणाम जाणवतात.

या कार्यक्रमात मैदानातील हजारो लोकांनी म्हटलेल्या या विश्वप्रार्थनेच्या घोषाने सारा आसमंतच जणू दुमदुमून गेला होता. व्यासपीठावरून विश्वपार्थना सादर करणाऱ्या समूहाने जीवनविद्या मिशनचे ब्रीदवाक्य प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची याला अनुसरून वेशभूषा केली होती. केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगाचे कपडे या सर्व सादरकर्त्यांनी परिधान केले होते. ज्यामुळे संपूर्ण वातावरणात राष्ट्रप्रेमाचे वारे वाहत असल्याची अनुभूती आल्याशिवाय राहिली नाही. त्यानंतर सदगुरुंच्या जन्मशताब्दीनिमित्त पै कुटुंबियांच्या हस्ते केक कापून आनंद साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी सामाजिक, उद्योग आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर आणि सोशल मीडिया स्टार आणि इंन्स्टाग्राम इनफ्लुएन्सर शांतनू रांगणेकरही कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.

प्रल्हाद पै यांनी यावेळी सर्वांमुळे मी, सर्वांमध्ये मी आणि सर्वांसाठी मी या विषयावर अतिशय सुंदर असे मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनामध्ये त्यांनी सांगितले की आपण जीवन जगत असतांना एकमेकांवर अवलंबून असतो. एकटा माणूस जगू शकत नाही, एकटा माणूस सुखी राहू शकत नाही, एकटा माणूस यशस्वी होऊ शकत नाही. सहाजिकच जोपर्यंत माणूस सर्वांसोबत असतो तोपर्यंत त्याचे अस्तित्व असते. माणसाचे एकट्याचे असे कोणतेच अस्तित्व नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस शरीर आणि चैतन्यशक्ती या दृष्टीनेही एकसमान आहे. प्रत्येकावर झालेल्या निरनिराळ्या संस्कारांमुळे आणि शारीरिक बदलांमुळे दोन माणसे एकमेकांपासून वेगळी भासतात.

शारीरिक रंग, रुप आणि संस्कार या भेदातूनच पुढे राग, द्वेष, मत्सर या भावना निर्माण होतात. वास्तविक प्रत्येकजण सुखीच असतो पण तो स्वतःच स्वतःला दुःखी करून घेतो. यासाठी प्रत्येकाने सर्वांमुळे मी, सर्वांमध्ये मी आणि सर्वांसाठी मी ही गोष्ट लक्षात ठेवून कृतज्ञतेने सर्वांशी सलोख्याचे संबध ठेवण्यातच खरे शहाणपण आहे. यासाठी एकत्र राहा आणि संघटित व्हा. सर्वांमुळे मी, सर्वांमध्ये मी, सर्वांसाठी मी हा कृतज्ञताभाव सतत मनात असणे हाच खरा स्मरणयोग आहे. संसार सुखाचा करण्यासाठी आणि परमार्थ सहज साध्य करण्यासाठी हा स्मरणयोग महत्त्वाचा आहे.

वामनराव

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content